शोभादृश्ये : (पॅजंट्स). भव्य, भपकेबाज, प्रेक्षणीय मिरवणुका विशेषतः ऐतिहासिक प्रसंगांचे देखावे. शोभायात्रा असाही त्यास मराठी शब्द रूढ आहे. ‘पॅजिना’ (प्लॅटफॉर्म, मंच) या लॅटिन शब्दापासून ‘पॅजंट’ ही संज्ञा इंग्लंडमध्ये चौदाव्या शतकापासून पुढे रूढ झाली. सुरूवातीच्या काळात फिरता मालडबा (वॅगन), चित्ररथ (फ्लोट) अशा मंचीय साधनांपुरतीच मर्यादित असलेली ही संज्ञा पुढे प्रत्यक्ष प्रयोग, नाट्यदृश्ये, सौंदर्यस्पर्धा, रंगीबेरंगी झगमगाटातील नेत्रदीपक मिरवणुका इ. अनेकविध अर्थांनी विस्तार पावली. शोभादृश्ये ही भव्य मिरवणुका, महोत्सव, पासंगिक सोहळे व प्रदर्शनीय देखावे यांच्याशी निगडित असल्याने, कालांतराने कोणत्याही आनंदजनक, खर्चिक, नेत्रसुखद, भव्य व नाट्यपूर्ण निर्मितीला अनुलक्षूनही या संज्ञेचा वापर होऊ लागला. लष्करी वा नागर शोभासंचलनेही त्यात समाविष्ट झाली.
सामूहिक ऐक्याचे किंवा कृतीचे प्रदर्शन करण्यासाठी मिरवणुका काढण्याची प्रथा प्राचीन काळापासून रूढ आहे. प्राचीन आदिवासी समाजांत सुफलताविधी, दुष्ट शक्तींचे पारिपत्य, लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन अशा अनेक कारणांनी मिरवणुका काढल्या जात. पुढे विशिष्ट ऋतुमान, घटना-प्रसंग, धार्मिक-लौकिक विधी, परंपरा, चालीरीती अशा अनेक गोष्टींशी मिरवणुकांची सांगड घातली गेली व एका संस्कृतीतून दुसऱ्या संस्कृतीत संक्रमित होत होत या प्रथा जगभर रूढ होत गेल्या.
मध्ययुगीन यूरोपमध्ये ‘ कॉर्पस ख्रिस्ती ’नामक बायबलवर आधारित धार्मिक नाटके सादर करण्यासाठी रंगमंच म्हणून फिरत्या चारचाकी मालडब्यांचा वापर प्रथमत: चौदाव्या शतकात करण्यात आला. शहरात रस्तोरस्ती व सार्वजनिक चौकांतून हे फिरते मालडबे वा मंच नाट्यप्रयोग सादर करीत. हे फिरते मालडबे दुमजली असून, खालचा मजला कपडेपट म्हणून, तर वरचा मजला रंगमंच म्हणून वापरत असत.
यूरोपमध्ये सोळावे-सतरावे शतक हा शोभादृश्यांचा उत्कर्षकाळ होता. ह्याच काळात नाटक हा प्रकारही भरभराटीला आला. शोभादृश्ये हा नाट्यात्म आविष्काराचाच एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार होता. ह्या काळात फ्रान्स, स्पेन, इटली, जर्मनी, नेदर्लंड्स इ. देशांत भपकेबाज, नेत्रदीपक व श्रीमंती थाटाची अनेक शोभादृश्ये सादर केली जात. इंग्लंडमध्ये शेक्सपिअरयुगात वैभवसंपन्न शोभादृश्यांनी कळस गाठला. प्रबोधनकाळात इंग्लंडमध्ये मुख्यतः तीन प्रकारची नागर शोभादृश्ये सादर केली जात :
(१) प्रादेशिक शोभायात्रा : इंग्लंडमध्ये एलिझाबेथपूर्व काळापासूनच राजाने अमीर-उमरावांच्या लंडनबाहेरील जहागिरींच्या मुलुखांना भेटी देण्याची प्रथा होती. राणी एलिझाबेथच्या काळात (१५५८१६०३) या प्रथेला भव्य शानदार मिरवणुकीचे स्वरूप प्राप्त झाले. प्रदेशांना भेटी देणाऱ्या राजांच्या करमणुकीखातर नाट्यदृश्ये वा तत्सम रंजनप्रकार वाटेवर जागोजाग, तसेच मुक्कामाच्या ठिकाणी सादर केले जात. लंडनमध्ये उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या अनारोग्यकारक वातावरणातून बाहेर पडणे, सरदार-उमरावांचे आदरातिथ्य उपभोगणे व पर्यायाने दरबारी खर्च वाचविणे, रयतेच्या राजनिष्ठेला चालना देणे, अशा नानाविध उद्दिष्टांनी ह्या प्रादेशिक शोभायात्रा योजिल्या जात. कित्येकदा मिरवणुकीनंतरही सरदारांच्या जहागिरीमध्ये शोभादृश्ये सादर केली जात. ती अनेक आठवडे चालत व त्यांत अनेकविध अंतर्गेहीव बहिर्गेही रंजनप्रकार राजाच्या करमणुकीखातर सादर केले जात. राजाचा बराचसा वेळ शिकारीतही जात असे. एलिझाबेथ राणीने केनिलवर्थ कॅसल (१५७५) व एल्व्हेथॅम (१५९१) येथे भेटी दिल्या. तेथील शोभायात्रा विशेष प्रसिद्घ आहेत. केनिलवर्थच्या तीन आठवडे चाललेल्या शोभा-दृश्यांतील काही भाग जॉर्ज गॅस्काइन या कवीने लिहिला होता. ह्या शोभा-दृश्यांत अनेक ऐतिहासिक, पौराणिक तसेच जानपद प्रसंगांवर रोमहर्षक नाट्यदृश्ये सादर करण्यात आली.
(२) शाही शोभायात्रा : (रॉयल एंट्रीज). राजाच्या शहरभेटीप्रसंगी नाट्यात्म देखावे सादर करण्याची प्रथा लंडनमध्ये तेराव्या शतकापासून रूढ झाली. पुढे त्याला राजकीय-सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले. सर्वसामान्य प्रजेला राजाचे जवळून प्रत्यक्ष दर्शन घडावे, हा उद्देश यामागे असे. राज्याभिषेक, शाही विवाहसोहळे, राजघराण्यांतील परदेशी पाहुण्यांचे दौरे अशा खास प्रसंगी शोभादृश्ये आवर्जून सादर केली जात. अशा भेटीप्रसंगी कित्येकदा रस्त्यावर स्तब्धनाट्ये (टॅब्लो) सादर केली जात. शेक्सपिअरच्या आठव्या हेन्रीवरील नाटकात ॲन बुलीन राणीसाठी (१५३३) सादर केलेल्या राज्याभिषेक-सोहळ्यातील शोभादृश्याचा प्रसंग चितारला आहे. राणी एलिझाबेथच्या राज्याभिषेक-सोहळ्याच्या पूर्वसंध्येला (१४ जानेवारी १५५९) राणीची शाही मिरवणूक लंडनमध्ये काढण्यात आली. त्याप्रसंगी वाटेत ठिकठिकाणी तात्पुरते मंच उभारून त्यांवर नाट्यदृश्ये साकारण्यात आली. एका दृश्यात ‘ टाइम ’व ‘ट्रूथ ’ही पात्रे दर्शवून ती राणीचेअभीष्टचिंतन करतात, तसेच ‘ ट्रूथ ’तिला इंग्लिश बायबल ची प्रत (द वर्ड ऑफ ट्रूथ) भेट देतो, असे दाखविले होते. जेम्स राजाच्या राज्याभिषेक-सोहळ्यात (१५ मार्च १६०४) सादर करण्यात आलेल्या शोभादृश्यांची संहिता ⇨बेन जॉन्सन, ⇨टॉमस डेकर आणि ⇨टॉमस मिडल्टन ह्या तीन प्रख्यात नाटककारांनी लिहिली होती.
(३) लॉर्ड मेयरचे देखावे : लंडनच्या नव्या महापौराच्या प्रतिवर्षी होणाऱ्या अधिकारग्रहणप्रसंगी (२९ ऑक्टोबर) शोभादृश्ये सादर करण्याची प्रथा सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून सुरू झाली. महापौर व त्याचा लवाजमा लंडनच्या रस्त्यावरून जात असताना ही शोभादृश्ये सादर केली जात. निरनिराळे मेयर-संघ (गिल्ड्स) ही शोभादृश्ये पायोजित करीत. पुढे त्यांच्यांतील स्पर्धा इतकी वाढली, की तत्कालीन प्रख्यात नाटककारांना शोभादृश्यांची संहिता लिहिण्यासाठी पाचारण केले जाऊ लागले. अँथनी मंडी, टॉमस मिडल्टन, टॉमस डेकर, टॉमस हेवुड हे ‘ लॉर्ड मेयर्स शो ’साठी संहिता लिहिणारे प्रसिद्घ नाटककार होत. १५६१ मधील पौराणिक व बायबल अधिष्ठित पात्रे व प्रसंग असलेल्या ‘ लॉर्ड मेयर्स शो ’च्या संभाषणाची नोंद आढळते. १५८५ मधील ⇨ जॉर्ज पील कृत शोभादृश्याची छापील संहिता उपलब्ध आहे. शोभादृश्यातील नाटककाराच्या सहभागित्वाचे हे आद्य उदाहरण होय. टॉमस मिडल्टनची संहिता असलेले द ट्रायंफ्स ऑफ ट्रूथ (१६१३) हे सर्वांत खर्चिक व भपकेबाज शोभादृश्य असल्याचे उल्लेख आढळतात. क्वचित राजकीय हेतूंनीही शोभादृश्ये आयोजित केल्याची उदाहरणे आढळतात. उदा., पहिल्या जेम्स राजाने सर वॉल्टर रॅलीला जी मृत्युदंडाची शिक्षा फर्मावली, ती नेमकी लॉर्ड मेयरच्या वार्षिक शोभायात्रेच्या दिवशीच (१६१८). लोकांचे लक्ष त्या घटनेपासून विचलित करण्याचा सुप्त हेतू त्यामागे होता. लंडन शहरात अद्यापही प्रतिवर्षी लॉर्ड मेयरची शोभादृश्ये सादर केली जातात.
आधुनिक शोभादृश्ये : व्हिक्टोरिया राणीच्या कारकीर्दीच्या सुवर्ण (१८८७) व हीरक (१८९७) महोत्सव प्रसंगी भव्य व भपकेबाज शोभायात्रा काढण्यात आल्या पण त्यांत नाट्यदृश्ये नव्हती. विसाव्या शतकातील शोभायात्रांचा सर्वसाधारण साचा असाच राहिला मात्र या शतकाच्या सुरूवातीला लूईस एन्. पार्करप्रभृतींनी इंग्लंडमध्ये स्थानिक इतिहास व परंपरा यांच्या गौरवपर चित्रणावर आधारित लोकप्रिय नागर शोभादृश्यांची निर्मिती केली. अमेरिकेमध्ये पॉल गीननिर्मित ‘ सिंफनिक ’नाट्याविष्कार खुल्या मैदानात सादर केले जात, त्यांत अमेरिकेच्या इतिहासातील ठळक घटनांचे दृश्यीकरण असे. ‘ मिस् अमेरिका ’, ‘ मिस् यूनिव्हर्स ’यांसारख्या सौंदर्यस्पर्धा जलतरण स्पर्धा, ‘ टूर्नामेंट ऑफ रोझ ’संचलन अशा विशेषप्रसंगी सादर होणाऱ्या आधुनिक शोभादृश्यांत पारंपरिक शोभादृश्यांची झाक क्वचितच दिसते. मात्र बाझीलमधील रीओ दे जानेरो येथे कार्निव्हल महोत्सवात होणाऱ्या ‘ मार्दी गास ’सोहळ्यात दृश्यात्मक नाट्यपूर्ण विषय व प्रसंगोचित गाणी यांची रेलचेल असलेली शोभादृश्ये सादर होतात ती शोभादृश्यांची परंपरा पुनरूज्जीवित करणारी आहेत.
मध्ययुगात केवळ दरबारी जीवनापुरती व उच्चभ्रू प्रतिष्ठित वर्गापुरती मर्यादित असलेली शोभायात्रा विसाव्या शतकात बहुजन समाजाला खुली झाली. आता कार्निव्हलसारख्या उत्सवप्रसंगी निघणाऱ्या शोभायात्रांत हजारोंच्या संख्येने सामान्य स्त्री-पुरूष, मुले रंगीबेरंगी वेशभूषा व साजशृंगार करून सहभागी होतात. त्यांत आकर्षक चित्ररथ, पुष्पसजावट, नाचगाणी असे आनंदाचे, जल्लेषाचे वातावरण असते. राष्ट्राच्या इतिहासातील गौरवशाली घटना तसेच थोर नेते यांच्या सन्मानार्थही शोभायात्रा आयोजित केल्या जातात. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन, युद्धातील विजयदिन तसेच इतरही ऐतिहासिक महत्त्वाच्या प्रसंगी राष्ट्रीय शोभायात्रा काढल्या जातात.
भारतात दरवर्षी प्रजासत्ताकदिन सोहळ्यानिमित्त सांस्कृतिक शोभायात्रा आयोजित केल्या जातात. त्यांत निरनिराळ्या राज्यांचे रंगीबेरंगी, आकर्षक चित्ररथ सामील होतात, तसेच स्तब्धनाट्ये, लोकनृत्ये इ. कलाप्रकारही सादर केले जातात. महाराष्ट्राच्या चित्ररथांना उत्कृष्ट कलात्मक मांडणीसाठी अनेकदा पारितोषिके देऊन गौरविण्यात आले आहे. गोव्यामध्ये कार्निव्हलप्रसंगी भपकेबाज, चित्ताकर्षक शोभायात्रा काढल्या जातात. महाराष्ट्रात गणेशोत्सव, शिवजयंती यांसारख्या उत्सवप्रसंगी ज्या मिरवणुका निघतात, त्यांत कित्येकदा ऐतिहासिक, पौराणिक तसेच राष्ट्रीय विषयांवरचे नाट्यमय देखावे सादर केले जातात.
इनामदार, श्री. दे.
“