शैक्षणिक संशोधन : ज्ञानविज्ञानाच्या इतर शाखांप्रमाणे शिक्षणशास्त्र ही एक महत्त्वाची शाखा आहे. बदलती सामाजिक परिस्थिती व ज्ञानाच्या रूंदावणाऱ्या कक्षा यांमुळे शिक्षणक्षेत्राच्या सर्व पैलूंवर आणि पातळ्यांवर झपाटयाने बदल घडून येत आहेत. या बदलांबरोबरच उद्‌भवणाऱ्या नवनवीन समस्यांशी संबंधित मूलभूत तत्त्वे, नियम इत्यादींचा शोध घेण्याचे काम शिक्षणशास्त्राच्या ‘ शैक्षणिक संशोधन ’या शाखेत चालते. शिक्षणक्षेत्रात काम करणारे शिक्षक वा शासनाधिकारी यांना आपापल्या कार्यात सुधारणा करता यावी व परिणामकारकता साधता यावी, हाच त्या संशोधनामागे हेतू असतो.

व्याख्या : शैक्षणिक संशोधन या संकल्पनेची सर्वमान्य व्याख्या करणे कठिण आहे. कारण मुळात ⇨ शिक्षण या शब्दाचे अनेक अर्थ संभवतात. पुढे दिलेल्या काही व्याख्यांच्या आधारे शैक्षणिक संशोधन ही संकल्पना समजण्यास मदत होईल. इंटरनॅशनल डिक्शनरी ऑफ एज्युकेशन (१९८०) यात दिलेली व्याख्या अशी : ‘सर्वसामान्य मानव्य शाखा व सामाजिक शास्त्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धतींचा वापर करून वेगवेगळ्या शाखांमधील शिक्षणसिद्धांतांच्या संदर्भात, अन्वेषणाव्दारे करण्यात येणाऱ्या शैक्षणिक पद्धती व प्रक्रिया यांच्या अभ्यासाला शैक्षणिक संशोधन असे म्हणतात ’.ट्रॅव्हर्स यांच्या मते (१९७८), ‘ अधिशिक्षकांना (एज्युकेटर) रस असणाऱ्या मुद्यांशी संबंधित अशा घटनांबाबत शास्त्रीय ज्ञानाच्या संयोजित अंगांचा विकास करण्याच्या प्रकियेला शैक्षणिक संशोधन असे म्हणतात ’. शिक्षणाशी संबंधित अशा घटनांची हाताळणी व पूर्वकथन करणे आणि वर्तमानस्थितीशी संबंधित सामान्य तत्त्वे किंवा नियम शोधून काढणे, हा शैक्षणिक संशोधनाचा हेतू असतो. डिक्शनरी ऑफ एज्युकेशन (१९७३) या कोशातील व्याख्या अशी : ‘ शैक्षणिक क्षेत्रात किंवा शैक्षणिक समस्यांशी निगडित अभ्यास व अन्वेषण यास शैक्षणिक संशोधन असे म्हणतात ’. जेकन्स् ॲरी आणि रझाविच यांच्या मते (१९७२), ज्यावेळी शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी शास्त्रीय पद्धतींचा वापर केला जातो, त्यावेळी शैक्षणिक संशोधन घडून येते.

शैक्षणिक संशोधनाचा विकास : शिक्षणशास्त्रातील संशोधनाचा काळ हा अगदी अलीकडचा आहे. इ. स. १९०० च्या आधीचे काही शिक्षणविषयक अभ्यास शैक्षणिक संशोधनात अंतर्भूत करता आले, तरीही या शाखेचा विकास विसाव्या शतकात घडून आला. शिक्षणविषयक संशोधनाचा आरंभ यूरोपमध्ये, प्रामुख्याने जर्मनीत झाला. ⇨ व्हिल्हेल्म व्हुंट या शास्त्रज्ञाने १८६१ मध्ये आपल्या संशोधनात्मक प्रयोगाला सुरूवात केली व १८७९ मध्ये बर्लिन विदयापीठात प्रयोगशाळा स्थापन केली. एबिंगहाऊस आणि म्यूमन यांच्या स्मरणव्यापारविषयक संशोधनालाही खूप महत्त्व दिले जाते. अमेरिकेतील टिचनर, कॅटेल इ. संशोधकांची पिढी व्हुंट आदी यूरोपीय संशोधकांच्या हाताखालीच तयार झाली होती. विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात थॉर्नडाइक व जे. एम्. राईस यांनी केलेले कार्य विशेष मौलिक मानले जाते. थॉर्नडाइकचे संशोधन ज्ञानार्जनाच्या प्रकियेसंबंधीचे आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस जी. स्टॅन्ली हॉल याने बालकांचा विकास व कुमार वयातील मुलामुलींच्या गरजा व प्रवृत्ती यांचे केलेले संशोधन असेच महत्त्वाचे आहे. अमेरिकेत शिक्षणविषयक संशोधनात विदयापीठे, शिक्षकांच्या व्यावसायिक संघटना व कार्नेजी, फोर्ड, रॉकफेलर इ. धनिकांनी निर्माण केलेली प्रतिष्ठाने या सर्वांचा पुढाकार आहे. शिक्षणाच्या अंगोपांगांसंबंधी नवनव्या समस्यांवर अमेरिकेत सदैव संशोधन सुरूच असते.

इंग्लंडमध्ये ⇨ सर फ्रान्सिस गॉल्टन याच्या आनुवंशिकतेसंबंधीच्या संशोधनाने या कार्यास आरंभ झाला. फान्समध्ये ⇨ आल्फ्रेड बीने याने बुद्धिमापन कसोट्यांसंबंधी जे संशोधन सुरू केले, त्याचा प्रसार ब्रिटनमध्ये झपाटयाने झाला. तसेच विदयार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंसंबंधी तेथे खूपच संशोधन झाले आहे. देशातील सर्व संशोधनकार्याचे संशोधन करणारी ‘ नॅशनल फाउंडेशन फॉर एज्युकेशनल रिसर्च ’ही संस्था तेथे आहे.

रशियाच्या शिक्षणपद्धतीतही संशोधनाला महत्त्वाचे स्थान आहे. तेथे ‘ ॲकॅडेमी ऑफ पेडगॉगिकल सायन्स ’या संस्थेची १९४३ मध्ये स्थापनाझाली. या संस्थेत विशेषतः मानसशास्त्र व अध्यापनपद्धती यांविषयीच्या संशोधनावर भर आहे. या अकादमीचे कार्य निरनिराळ्या नऊ संस्थांमार्फत चालते. कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण, अपंगांचे शिक्षण, भाषाशिक्षण इ. विषयांना या संस्था वाहिलेल्या आहेत.

जपानसारख्या छोट्या राष्ट्रातही राष्ट्रीय पातळीवरून संशोधनाचे कार्य चालते. शिक्षणविषयक संशोधनासाठी तेथे अनेक संस्था व नियतकालिके शैक्षणिक कार्याला वाहिलेली आहेत. इटली, कॅनडा, न्यूझीलंड इ. लहानमोठया देशांतही शिक्षणविषयक संशोधन प्रतिष्ठा पावले आहे. ऐतिहासिक दृष्टीने या विकासाचे पुढील पाच टप्पे मांडता येतील.

पहिला कालखंड (१९०० पर्यंत) : पूर्वी शैक्षणिक संशोधन प्रायोगिक अध्यापनशास्त्र या नावाने ओळखले जाई. म्यूमन, बीने, सीमोन, थॉर्नडाइक या व इतर काही संशोधकांना प्रायोगिक अध्यापनशास्त्राचे प्रवर्तक मानले जाते. या कालावधीत झालेले बरेचसे संशोधन मानसशास्त्राशी निगडित होते. अध्ययनप्रकियेतील साहचर्याचे महत्त्व (एबिंगहाऊस), मानसिक कसोट्या (कॅटेल, राईस), तापमान, थकवा यांसारख्या घटकांचा कृतीवर होणारा परिणाम इ. विषयांत संशोधनपर अभ्यास करण्यात आला.

दुसरा कालखंड (१९००-३०) : या कालावधीत झालेले बरेचसे संशोधन प्राधान्याने संख्यात्मक स्वरूपाचे होते. या काळात मानसिक कसोट्या मोठया प्रमाणावर तयार झाल्या. त्यांचा वापर सर्वेक्षणे, अभ्यासक्रम विकास व मूल्यमापन यांसारख्या क्षेत्रांत करण्यात आला.

तिसरा कालखंड (१९३०-५०) : हा कालखंड संशोधनाच्या दृष्टीने मौलिक मानला जात नाही. या काळात जागतिक मंदीमुळे संशोधनाकरिता निधीची कमतरता होती. त्याचप्रमाणे दुसऱ्या महायुद्धामुळे यूरोपमध्ये व त्यानंतर अमेरिकेतही अशांतता होती. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात फारसे संशोधन घडून आले नाही. नंतर मात्र परिस्थिती थोडी सुधारू लागली. या कालखंडात सामाजिक विषमतेबाबत शाळेची भूमिका, पौगंडावस्थेतील विकास यांसारख्या विषयांवर संशोधन करण्यात आले.

चौथा कालखंड (१९५०-७०) : या कालावधीत शैक्षणिक संशोधनाला खरा बहर आला. अनेक देशांमध्ये शासनाने शैक्षणिक संशोधनासाठी मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यास सुरूवात केली. ज्ञानविस्फोट प्रकियेचा परिणाम इतर क्षेत्रांप्रमाणेच शिक्षणक्षेत्रावरही झाला. परिणामी शिक्षणविषयक अभ्यासाची अनेक नवीन क्षेत्रे उदयाला आली. संख्यात्मक संशोधनाला पर्याय म्हणून गुणात्मक संशोधन पद्धतींकडे पाहिले जाऊ लागले. प्याजे, क्रोनबॅक, कँपबेल यांसारख्या शास्त्रज्ञांनी संख्यात्मक पद्धतींना विरोध केला. निकष, संदर्भ कसोट्या, अध्यापक-विदयार्थी आंतरकिया विश्लेषण, अध्यापक परिणामकारकता,सामाजिक-सांस्कृतिकदृष्ट्या मागासवर्गीय गटांकरिता पूरक शिक्षण, अध्ययन अभिक्षमतेचे सामाजिक पैलू यांसारख्या विषयांत संशोधन झाले.

पाचवा कालखंड (१९७० नंतर) : या कालखंडात शैक्षणिक संशोधनाची क्षितिजे आणखी रूंदावत गेली. प्रौढ-शिक्षण, मुक्त व दूरशिक्षण, लोकसंख्या व पर्यावरण-शिक्षण यांसारखी नवी क्षेत्रे विकसित होऊन त्यांत संशोधन होऊ लागले आहे. संगणक व माहिती तंत्रज्ञानातील विकासामुळे शिक्षणक्षेत्रातही बदल घडून येत आहेत.


शैक्षणिक संशोधनाचा विकास, भारतातील : स्वातंत्र्यपूर्व काळात येथील ब्रिटिश सरकारने शिक्षणक्षेत्रातील संशोधनाला फारसे महत्त्व दिले नव्हते. त्यामुळे भारतामध्ये शैक्षणिक संशोधन हे सापेक्षत: नवीनक्षेत्र आहे. स्वातंत्र्योत्तर काळात शैक्षणिक संशोधनाच्या आवश्यकतेची जाणीव निर्माण झाली. त्याचप्रमाणे समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र यांसारख्या सामाजिक विज्ञानांचा विकास झाल्याने त्यांतील सिद्धांतांचे शिक्षणक्षेत्रातील उपयोजन लक्षात आले. स्वातंत्र्यपूर्व काळात संशोधन केवळ विदयापीठांच्या अखत्यारीत होते. १९१७ साली कलकत्ता विदयापीठ आयोगाने प्रत्येक विदयापीठामध्ये एक प्राध्यापक व अधिव्याख्याता नेमून शिक्षणविभाग सुरू करण्याची शिफारस केली. १९३६ साली मुंबई विदयापीठात एम्.एड्.चा वर्ग सुरू करण्यात आला. उत्तरोत्तर अनेक विदयापीठांमध्ये हा अभ्यासक्रम चालू झाला. या अभ्यासक्रमात संशोधनकार्य आवश्यक करण्यात आले. १९४१ साली मुंबई विदयापीठाने शिक्षणशाखेत पीएच्.डी.चा अभ्यासक्रम सुरू केला. १९४३ साली शिक्षणशाखेतील पहिली डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. तोपर्यंत शिक्षणक्षेत्रात झालेले संशोधन फारसे पद्घतशीर झालेले नव्हते, असे १९४९ मध्ये विदयापीठ-शिक्षण-आयोगाने सादर केलेल्या अहवालानुसार दिसते. निधीच्या उपलब्धतेवर मर्यादा असल्याने संशोधनविषयाची व्याप्तीही मर्यादित होती. शिक्षणविषयक संशोधनाला चालना मिळावी, या हेतूने १९४७ मध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर‘ सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन ’ही संस्था केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्थापन केली. १९५० नंतर शैक्षणिक संशोधनात मोठया प्रमाणावर प्रगती झाली. शिक्षणशाखेत संशोधन करणाऱ्या संस्था स्थापन होऊ लागल्या. १९५४ मध्ये ‘ सेंट्रल ब्यूरो ऑफ टेक्स्टबुक रिसर्च ’(पाठ्यपुस्तकांच्या संशोधनासाठी) व ‘ सेंट्रल ब्यूरो ऑफ एज्युकेशन अँड व्होकेशनल गाइडन्स ’या संस्थांची स्थापना झाली. १९६१ साली ‘ नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग ’(एन्‌सीईआर्‌टी.) ही संस्था सुरू झाली. या संस्थेच्या समित्या वा शाखा असून शिक्षणाच्या विविध अंगांचे संशोधनकार्य त्यांमार्फत चालते. कोठारी शिक्षण आयोगाच्या (१९६४-६६) अहवालामध्ये विदयापीठांतून मोठया प्रमाणावर संशोधन होण्यासाठी शिफारशी करण्यात आल्या. विदयापीठांच्या मार्गदर्शनाखाली तीन-चार स्थानिक महाविदयालयांनी सहकारी पद्धतीने संशोधन करावे, यासाठी आवश्यक त्या सुविधा असणाऱ्या महाविदयालयांची निवड करावी, विदयापीठांनी ८० टक्के संशोधनाची जबाबदारी घ्यावी, यासाठी शिष्यवृत्त्या देण्यात याव्यात, यांसारख्या महत्त्वपूर्ण शिफारशींमुळे शैक्षणिक संशोधनक्षेत्रात कांतिकारक बदल घडून आले. १९६९ मध्ये स्थापन झालेल्या ‘ इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च ’(आय्‌सीएस्एस्आर्) या संस्थेतही शिक्षणशाखेतील विषयांवर संशोधन केले जाते. १९८६ सालच्या शिक्षणविषयक राष्ट्रीय धोरण व कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीनुसार १९९३ साली ‘नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन ’या संस्थेची स्थापना झाली.

शैक्षणिक क्षेत्रातील आंतरशाखीय दृष्टिकोन : शिक्षणक्षेत्रातील अनेक घटनांचा अभ्यास सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या संदर्भात करणे आवश्यक असते. यासाठी इतर सामाजिक शास्त्रांचे ज्ञान व सिद्धांत यांचा उपयोग आवश्यक ठरतो. म्हणूनच शैक्षणिक संशोधनाचे स्वरूप आंतरशाखीय असणे आवश्यक आहे. भारतात आंतरशाखीय शैक्षणिक संशोधनावर कोठारी आयोग आणि एन्सीईआर्टी यांचा बराच प्रभाव दिसून येतो. १९६०च्या सुमारास एम्. एस्. गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाचे समाजशास्त्र या विषयात संशोधन झाले. त्याचप्रमाणे शिक्षणाचे अर्थशास्त्र या विषयात तापस मुजुमदार, नल्ल गौडेन, पी. आर्. पंचमुखी यांसारख्या संशोधकांनी काम केले. आय्‌सीएस्एस्आर्‌च्या स्थापनेनंतर आंतरशाखीय संशोधनाला अधिक वाव मिळाला.

शिक्षणक्षेत्रात संशोधन करणाऱ्या महत्त्वाच्या संस्था : श्री. रा. वि. परूळेकर यांच्या प्रयत्नाने ‘ इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन ’या नावाची एक संस्था १९४८ मध्ये मुंबई येथे स्थापन झाली होती. ‘ नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग’या संस्थेची स्थापना १ सप्टेंबर १९६१ रोजी झाली. ही एक स्वायत्त संस्था असून तिच्या मार्फत देशातील शालेय शिक्षणातील सर्व समस्यांबाबत अभ्यास केला जातो. केंद्र शासनाचे शिक्षण आणि समाजकल्याण खाते या संस्थेला अर्थसहाय्य करते. शालेय शिक्षणासंदर्भात शिक्षण व समाजकल्याण खात्याची प्रमुख सल्लगार म्हणून ही संस्था काम करते. त्याचप्रमाणे या मंत्रालयाची धोरणे राबविण्याची जबाबदारी तिच्यावर असते. माध्यमिक शाळांतील शिक्षकांकरिता प्रशिक्षण व संशोधन करणे, हेही या संस्थेचे काम आहे. या कामांकरिता नऊ विभाग स्थापन केलेले आहेत. शिक्षक-प्रशिक्षणाशी संबंधित सर्व पैलूंचा अभ्यास करण्यासाठी ‘नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर्स एज्युकेशन ’(एन्‌सीटीई) या संस्थेची स्थापना झाली. संपूर्ण देशात शिक्षक-प्रशिक्षणाचा विकास नियोजनबद्घ व सुसूत्रपणे घडवून आणणे व शिक्षक-प्रशिक्षण क्षेत्रातील नियामके व प्रमाणे यांचे नियंत्रण व अंमलबजावणी करणे, ही या संस्थेची कार्ये आहेत. या दोन संस्थांशिवाय इतर अनेक शासकीय व बिगर शासकीय संस्था शिक्षणक्षेत्रात संशोधन करतात. त्यांपैकी काही संस्था अशा : इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च, विदयापीठ अनुदान आयोग, सेंटर फॉर ॲडव्हान्स स्टडीज इन एज्युकेशन (बडोदा), भारतीय शिक्षण संस्था (पुणे), सर्व राज्यांमधील स्टेट सेंटर फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, साउथ इंडियन टीचर्स असोसिएशन इत्यादी.

शैक्षणिक संशोधनाचे क्षेत्र : शिक्षणक्षेत्राची विविध अंगे आणि त्याच्याशी संबंधित घटक, हे शैक्षणिक संशोधनासाठी योग्य अभ्यास- विषय होऊ शकतात. १९७२ सालापर्यंत शिक्षणक्षेत्रात झालेले संशोधन डॉ. एम्. बी. बुच यांच्या संपादनाखाली ए सर्व्हे ऑफ रिसर्च इन् एज्युकेशन च्या पहिल्या भागात संकलित केले आहे. बुच यांनीच संपादितकेलेले पुढील चार भाग एन्सीईआर्टीने प्रकाशित केले आहेत. पाचव्या भागात १९९२ पर्यंतच्या संशोधनाच्या नोंदी आहेत. या भागात एकंदर ७२९ नोंदी असून त्यांचे एकंदर ३८ क्षेत्रांमध्ये वर्गीकरण केले आहे. शैक्षणिक तत्त्वज्ञान, शिक्षणाचे समाजशास्त्र, मानसिक आरोग्य, सर्जनशीलता आणि अन्वेषण, सामाजिक प्रक्रिया, पूर्वप्राथमिक-प्राथमिक-माध्यमिक व उच्च शिक्षण, शैक्षणिक नियोजन आणि धोरण, व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण, तपासणी व मूल्यमापन, शैक्षणिक व्यवस्थापन ही त्यांपैकी काही क्षेत्रे आहेत. शिक्षण संचालनालयात व राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातही संशोधन विभाग उघडण्यात आलेले असून संख्यात्मक संकलन व त्यावरून निष्कर्ष काढण्याचे कार्य सुरू असते. यूनेस्कोच्या सहकार्यानेही काही संशोधनात्मक प्रकल्प हाती घेतले जातात. तसेच सर्वसामान्य शिक्षकांनी दैनंदिन कार्यातील समस्यांबाबत संशोधन करावे, असेही प्रयत्न सातत्याने केले जात आहेत.

देहाडराय, वृषाली