शैलेंद्र वंश : आग्नेय आशियातील एक प्राचीन बलाढय् वंश. आठव्या शतकात सुवर्णद्वीप म्हणून ज्ञात असलेल्या जावा, सुमात्रा, मलाया ह्या प्रदेशांत शैलेंद्रांचे विस्तृत साम्राज्य होते. ह्या वंशाचा मूळ पुरूष कोण होता किंवा ह्यांतील राजे ह्यांच्याविषयी सुसंगत माहिती मिळत नाही. ह्यांचे मूळ राज्य किंवा स्थान श्रीविजय (सुमात्रातील पालेंबांग) असावे, असे काही इतिहासकारांचे मत आहे पण त्यातही मतभेद असल्यामुळे निश्चित स्थानाचा ठावठिकाणा लागत नाही तथापि आठव्या शतकापासून अकराव्या शतकापर्यंत ह्या सामाज्याचे उल्लेख अनेक ऐतिहासिक साधनांतून मिळतात.

ह्या वंशाची माहिती त्यांचे कोरीव लेख व तत्कालीन इब्न खोर्दादबाह, सुलेयमान, अबु झेदे हसन, मसुदी, अल् बीरूनी, इब्न रोस्तेह इत्यादींच्या प्रवासवर्णनांतून उपलब्ध होते. अरबी लेखकांनी ह्या सामाज्याचा उल्लेख ‘झाबग ’ म्हणून वारंवार केलेला आढळतो.

काही राजांची नावे त्यांच्या कोरीव लेखांतून मिळतात. त्यांपैकी राजाधिराज विष्णू हा एक महत्त्वाचा असून धरणींद्र ह्या राजाचे वर्णन ‘ शैलेंद्र वंशाचे भूषण ’ असे केले आहे. ह्याने सर्व बाजूंच्या शत्रूंवर विजय संपादिला होता, असे वर्णन आढळते. दुसरा एक राजा संग्रामधनंजय ह्याचाही उल्लेख आढळतो परंतु त्याचा वरील राजांशी काय संबंध होता, हे त्याच्या कोरीव लेखावरून स्पष्ट होत नाही. नालंदा येथील पालराजा देवपाल याच्या कोरीव लेखात शैलेंद्रांच्या तीन पिढ्यांचा उल्लेख आढळतो. त्यात त्यांच्या यवभूमीचा उल्लेख आहे पण त्यात पहिल्या पिढीतील राजाचे नाव नाही, फक्त ‘ वीरवैरिमथन ’या बिरूदाचा उल्लेख आहे. हा राजा धरणींद्र असावा. नंतर धरणींद्राच्या मुलाचा उल्लेख समराग्रवीर म्हणून केला असून त्याने तारा ह्या धर्मसेतू राजाच्या राजकन्येशी लग्न केले होते. हा धर्मसेतू कोण ह्याविषयीही माहिती नाही पण काहीजण ह्यास बंगालचा धर्मपाल समजतात. समराग्रवीराचा बालपुत्रदेव हा मुलगा पुढे सुवर्णद्वीपावर राज्य करीत होता. त्याने नालंदा येथे बौद्घ विहार बांधला होता. त्याच्या विनंतीवरून देवपालाने त्या विहाराला तीन गावे दान दिली होती, असा त्या नालंदा लेखात उल्लेख आहे. शैलेंद्रांनी नेगापटम् येथेही बौद्घ विहार बांधले होते. शैलेंद्रांचे राज्य सर्व सुवर्णद्वीपावर पसरले होते. ह्याच्याविषयी आणखी बरीचशी माहिती अरब इतिहासकारांकडून व प्रवाशांकडून मिळते. शैलेंद्र-साम्राज जसे विस्तृत होते, तसेच ते समृद्घही होते. इब्न खोर्दादबाह म्हणतो, ‘‘ या राजाचा महसूल दोनशे मण सोने आहे ’’, तर इब्न रोस्तेहच्या मते एवढे बलाढ्य आणि श्रीमंत राज्य दुसरे नाही. या समृद्घीमुळे जावा, सुमात्रा, मलाया द्वीपकल्प इत्यादिकांना ‘ सुवर्णद्वीप ’ असे नाव पडले होते.

ह्या काळात शैलेंद्र राजे हे नाविक दलातही पुढारलेले होते. त्यांचे सागरी आरमार होते आणि काही देशांशी व्यापारही होता. ह्या संदर्भात सिराफ, ओमान, कलाह इ. व्यापारी बंदरांचा उल्लेख आढळतो. चीनशी तर त्यांचे राजनैतिक संबंधही होते. शैलेंद्रांनी आपली एक वकिलात चीनमध्ये स्थापिलेली आढळते. ह्या सर्व व्यापारांतून शैलेंद्रांना अपरिमित लाभ होई. ह्याविषयी एक कथा प्रसिद्घ आहे. ‘‘ राजा रोज एक सोन्याची वीट राजवाड्याजवळच्या तळ्यात टाकी. त्या सर्व विटा राजा मेल्यानंतर त्याच्या नातेवाईकांत, सरदारांत व इतर गोरगरिबांत प्रत्येकाच्या इतमामाप्रमाणे वाटण्यात येत ’’.

शैलेंद्रांच्या काळात कला व वाङ्‌मय ह्यांत बरीच प्रगती झाली. ह्या काळात जावामध्ये एक नवे युग सुरू झाले. राजकीय एकात्मता तर निर्माण झालीच पण ह्याहून महत्त्वाचे म्हणजे एक समृद्घ सांस्कृतिक जीवन बहरले. शैलेंद्रांनी महायान बौद्घ धर्माचा स्वीकार केला व त्याचा प्रसार केला. ⇨बोरोबूदूर (बरबुडर) व चंडी कलशनसारखी सुंदर स्मारके यांच्याच काळात बांधली गेली. त्यांनी नागरी लिपीचा पुरस्कार केला व वाङ्‌मयाला उत्तेजन दिले. नाटय्शास्त्र, काव्यशास्त्र, ज्योतिष, व्याकरण, पुराणे, स्थापत्य, शिल्प इ. शास्त्रांना व कलांना त्यांनी आश्रय दिला. बोरोबूदूरसारखी चैतन्यमय व चिरस्मरणीय कलाकृती त्यांनीच निर्माण केली. त्यांनी बौद्घ धर्म स्वीकारला, तरी हिंदु-वाङ्‌मयाला त्यांचा आश्रय होताच.

शैलेंद्रांची सत्ता निश्चित केव्हा संपुष्टात आली, ह्याबद्दल इतिहासतज्ज्ञांत एकमत नाही. काहींच्या मते हे सामाज्य तेराव्या शतकापर्यंत अस्तित्वात होते. त्या शतकात थाई व जावा या ठिकाणांहून त्यावर आकमण झाले आणि त्याचा नाश झाला. याच्या उलट चोल व शैलेंद्र ह्यांची युद्घे झाली. त्यामुळे शैलेंद्र सत्ता खिळखिळी झाली असावी, असाही एक तर्क आहे. उपलब्ध पुराव्यांवरून असे दिसते की, त्यांचे साम्राज अकराव्या शतकाच्या पूर्वार्धात संपुष्टात आले.

पहा : बृहद्‌भारत.

संदर्भ : 1. Mujumdar, R. C. Hindu Colonies, Calcutta, 1963.

2. Mujumdar, R. C. Ed. The Age of Imperial Kanauj, Bombay, 1990.

३. गुप्ते, र. शं. बृहत्तर भारत, औरंगाबाद, १९६०.

देशपांडे, सु. र.