शैलसमूह, भारतातील : यूरोपमधील खडकांच्या विभागांचा (शैलसमूहांचा) कालानुक्रमाविषयीचा प्रमाणभूत मापक्रम तयार झाला असून संदर्भासाठी जगभर त्याचा उपयोग करतात. तथापि, भारतातील विविध शैलसमूहांचा (मालांचा वा संघांचा) या मापकमातील विभागांशी अचूक परस्परसंबंध प्रस्थापित करणे हे अवघड काम आहे. द्वीपकल्पातील किंवा बाह्य हिमालयातील जीवाश्म (शिलाभूत जीवावशेष) नसलेल्या खडकांच्या बाबतीत परस्परसंबंध ठरविणे अधिकच अवघड ठरते. यामुळे शिलावैज्ञानिक संघटन, संरचना व रूपांतरणाची तीव्रता (मात्रा) यांसारख्या स्वैर व बेभरवशाच्या असमाधानकारक निकषांनुसारच भारताच्या द्वीपकल्पातील कँब्रियनपूर्वसारख्या (६० कोटी वर्षांहून आधीच्या) महत्त्वपूर्ण शैलसमूहांचे स्तरवैज्ञानिक वर्गीकरण करावे लागते. यासाठी स्तरांच्या अध्यारोपणातील नैसर्गिक कमाचा आधार घ्यावा लागतो. हा क्रम निश्चित करता न आल्यास भिन्न ठिकाणी आढळणाऱ्या खडकांच्या थरांमध्ये परस्परसंबंध ठरविणे शक्य होत नाही. स्तरविज्ञानात भूकवचातील गाळाच्या खडकांचे निक्षेप (थर) शोधून त्यांची त्यांच्या वयानुसार मांडणी करतात. या मांडणीत अधिक जुना थर हा त्यानंतरच्या अधिक नव्या थराखाली आढळतो. या अध्यारोपणाच्या नियमांत खडकांतील विभंगक्रिया (तडे जाणे) व घड्या पडणे यामुळे गुंतागुंत निर्माण होते आणि खडकांतील आडव्या दिशेत झालेल्या बदलांनी अडचणीत भर पडते.
अठराव्या शतकाअखेरीस ⇨ विल्यम स्मिथ यांनी स्तरांच्या एखादया गटात विशिष्ट जीवाश्म टिकून राहिलेले आढळतात, असा शोध लावला. या जीवाश्मांवरून त्या थराची ओळख पटू शकते. यातून ऐतिहासिक भूविज्ञान ही शाखा स्थापन झाली. थरांच्या अध्यारोपणाचा क्रम, जीवाश्म, शिलावैज्ञानिक वैशिष्टये, स्तरवैज्ञानिक अखंडता, विसंगती, रूपांतरणांची तीव्रता आणि भूसांरचनिक व संरचनात्मक विक्षोभ यांचा दूरवरच्या क्षेत्रांतील शैलसमूहांमधील परस्परसंबंध निश्चित करण्यासाठी उपयोग करतात. मात्र भारत व यूरोप येथील खडकांच्या थरांमध्ये निरपेक्ष समकालिकता प्रस्थापित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शिलावैज्ञानिक समतुल्यता किंवा जीवाश्म हे समकालिकतेचे निकष ठरू शकत नाहीत. कारण जीवांचा क्रमविकास (उत्कांती) जगभर एकसारखा किंवा एका साध्या सरळ रेषेत झालेला नाही. क्रमविकासाची त्वरा व एखादया जीवजातीचा तिच्या उत्पत्तिस्थानापासून होणारा प्रसार भिन्न प्रकारे व गतीने सावकाश झालेला आढळतो. थोडक्यात, दूरवरच्या दोन थरांतील जीवाश्मांमध्ये पूर्ण साम्य आढळले, तरी त्यांच्यात समकालिकता प्रस्थापित करता येत नाही, परिणामी भारताच्या विविध भागांत आढळलेल्या खडकांची त्यांच्या वयानुसार (कालक्रमानुसार) मांडणी करणे गरजेचे झाले. अशा रीतीने स्थानिक खंड, जीवाश्मविषयक पुरावे विचारात घेऊन त्यांचे वर्गीकरण करण्यात आले व त्यांना स्थानिक नावे देण्यात आली. नंतर या भिन्न शैलसमूहांत परस्परसंबंध प्रस्थापित करण्यात येतात. जीवाश्म व शिलावैज्ञानिक पुरावे यांच्यानुसार त्यांची जागतिक प्रमाणभूत स्तरवैज्ञानिक मापक्रकमातील विभागांशी समतुल्यता ठरवितात. जीवाश्म एकसारखे असले, तरी दूरवरच्या क्षेत्रांतील खडक एकाच वेळी साचलेले असतात असे नाही. यामुळे टी. एच्. हक्स्ली यांनी भूवैज्ञानिक समकालिकतेसाठी मांडणीतील साम्य (होमोटॅक्सिस) ही संज्ञा वापरली. शैलसमूहांचे कॅल्शियमयुक्त, मृण्मय, प्रवाळयुक्त, सागरतटीय इ. भिन्न शिलावैज्ञानिक प्रदेश (विभाग) पाडले. भारताचे विशाल क्षेत्र व भिन्न प्रकारची भौतिकीय परिस्थिती यांमुळे एकाच मालेतील व काळातील खडक अगदी भिन्न अशा दोन वा अधिक प्रदेशांनी दर्शविले जातात (उदा., ⇨ गोंडवनी संघातील तटीय, खोल सागरी, जमिनीवरील किंवा ज्वालामुखीय). मात्र त्यांच्यातील जीवाश्म भिन्न असू शकतात. अर्थात जीवाश्मरहित खडकांचे वय ठरविण्यासाठी त्यातील किरणोत्सर्गी क्षयाचे मापन करतात. [→ खडकांचे वय].
शैलसमूहाच्या वर्णनात त्यातील खडक व जीवाश्म यांच्या वस्तुस्थितींविषयीचा केवळ सारांश नसतो. त्यांच्या निर्मितीच्या वेळच्या क्रिया- प्रकियांची हहल्लीच्या तशा क्रियाप्रकियांशी तुलना करून चित्र स्पष्ट होते. वाळूचा कण वा गोटा हा खडकाचा केवळ एक निर्जीव भाग नसतो, तर तो पृथ्वीच्या इतिहासातील एक शब्द किंवा वाक्यांश असतो. त्याच्यावरून त्याच्या निर्मितीशी निगडित असलेल्या क्रियांच्या साखळीची माहिती होते. तसेच कवचाच्या रूपातील जीवाश्म हा योगायोगाने सापडलेला भूतपूर्व जीवाचा केवळ एक अवशेष नसतो, तर पृथ्वीच्या इतिहासाचा तो एक दस्तऐवज असतो कारण एखादया जीवाश्माने पृथ्वीवरील जीवांच्या कमविकासाचा एक टप्पा वा कालखंड सूचित होतो. पुष्कळदा त्याच्यावरून इतर माहितीही मिळते उदा., त्या वेळचा भूगोल किंवा जलवायुमान. स्तरवैज्ञानिक भूविज्ञानात गतिकीय व संरचनात्मक भूविज्ञानाची तत्त्वेही विचारात घेतात. भूकवचाचे विरूपण, ज्वालामुखी क्रिया, तसेच जीवजातींमधील बदल, त्यांचे स्थलांतर व विलुप्तीभवन यांसारख्या खडकांत नोंदल्या गेलेल्या असंख्य घटनांचा अर्थ लावावा लागतो.
सोयीसाठी केलेल्या भारताच्या भौगोलिक विभागांतील खडकांच्या अध्ययनाचे एकत्रीकरण करून भारताचा समग भूवैज्ञानिक इतिहास रचतात. डी. एन्. वाडिया यांनी भारतातील खडकांचे केलेले वर्गीकरण आपल्या जिऑलॉजी ऑफ इंडियाया पुस्तकात दिले होते (१९१६). मात्र या वर्गीकरणात १९५२ नंतर फार मोठे फेरफार होऊन त्याचे स्वरूप जवळजवळ पूर्णपणे बदलले जात आहे. मराठी विश्वकोशा त सुरुवातीपासूनच या वर्गीकरणाचा वापर व निर्देश जागोजागी केलेला आहे. म्हणून या पुस्तकाच्या १९६१ सालच्या आवृत्तीत दिलेल्या भारतातील शैलसमूहांच्या कोष्टकावरून या लेखातील कोष्टक तयार केले आहे.
ठाकूर, अ. ना.