शेषांत्र शोथ : तोंड व अन्ननलिका, जठर, लहान आतडे आणि मोठे आतडे व गुदद्वार हे मानवी पचनमार्गाचे चार मुख्य भाग आहेत. लहान आतड्याच्या शेवटच्या सु. ३/५ भागाला शेषांत्र म्हणतात व त्याच्या दाहयुक्त सुजेला शेषांत्रशोथ म्हणतात. हा चिरकारी शोथ लहान आतड्याच्या एका (उदा., मधल्या) व अनेक भागांना होतो. लहान व मोठया या दोन्ही आतड्यांशी निगडित असलेल्या विशिष्ट प्रकारच्या अधिक गंभीर शोथाला विभागीय शेषांत्रशोथ म्हणतात. अमेरिकी वैदय बरिल बर्नार्ड कॉन यांनी १९३२ साली विभागीय शेषांत्रशोथावर अभ्यासपूर्ण लेख लिहिल्यानंतर विभागीय शेषांत्रशोथाला क्रॉन विकार हेही नाव पडले.
शेषांत्रशोथ मुख्यतः २० ते ५० वर्षे या वयोगटातील स्त्रीपुरूषांना व विशेषतः पुरूषांना अधिक प्रमाणात झालेला आढळतो. या रोगाचे नेमके कारण समजलेले नाही. काहींच्या मते हा शोथ हे गंथिक रोगाचे लक्षण आहे तर काहींना हा आत्मप्रतिरक्षा प्रणालीतील दोषामुळे होणारा विकार आहे असे वाटते. काही तज्ज्ञ हा क्षयरोगाची द्वितीय अवस्था असल्याचे मानतात. काही रूग्णांच्या मलामध्ये आमांशाचे जंतू आढळल्याने हा आमांश जंतूंचा संसर्ग असावा, असा तर्क केला जातो. काहींच्या मते भावनिक ताणाव्दारे साध्या प्रकारचा शेषांत्रशोथ उद्भवू शकतो. सिलिका लवणे अन्नात मिसळून कुत्र्यांना पुष्कळ दिवस खाऊ घातल्यास त्यांना अशाच प्रकारे विकार झाल्याचे दिसून आले आहे.
संप्राप्ती : लहान व मोठया आतड्यांच्या संयोगाच्या जागी असलेल्या पुटापाशी सूज उत्पन्न होऊन शेषांत्रशोथाची सुरूवात होते. तेथून ही सूज लहान आतड्यात वरच्या बाजूस २५ ते ३० सेंमी.पर्यंत पसरते आणि त्याच्याही वरच्या भागात सूज आलेले पट्टे दिसतात. या सुजेमुळे आतड्याची श्लेष्मल त्वचा व अध:श्लेष्मल ऊतक (धातू) जाड होते. त्या ठिकाणी श्लेष्मल त्वचेत गाठीसारखा व्रण उत्पन्न होतो. ही सूज बहुधा शेषांत्रामधून खालच्या बाजूस उंडुकापर्यंत [→ आंत्र] जात नाही. ती अशी गेलीच तर त्या रोगाला तन्वंत्र-स्थूलांत्रशोथ म्हणतात. आतड्यातील हा व्रण हळूहळू वरच्या भागात चरत जाऊन भोवतीच्या अंतस्त्यांत किंवा बाहेर त्वचेपर्यंत पोहोचतो व तेथे ⇨ नाडीव्रण उत्पन्न करतो. हा नाडीव्रण त्वचेवर किंवा स्थूलांत्र, मूत्राशय, मूत्रमार्ग, योनी किंवा गर्भाशय या ठिकाणापर्यंत पोहोचून त्यातून पूमिश्रित पाणी वाहू लागते.क्वचित गुदद्वाराभोवती हा व्रण पसरून नाडीव्रण (भगंदर) निर्माण होतो व तेथूनही पू येऊ लागतो.
लक्षणे : शेषांत्रशोथ आशुकारी (तीव्र) किंवा चिरकारी (कायम स्वरूपाचा) असू शकतो. पहिल्या प्रकारात थंडी भरून ताप येतो. पोटाच्या खालच्या उजव्या बाजूस जास्त दुखत राहते. अतिसार हे कायमचे लक्षण असते. पोट फुगते. पोटाच्या त्या भागातील स्नायू दडदडीत (ताठर) होतात. त्यामुळे ही सर्व लक्षणे आंत्रपुच्छशोथासारखी वाटतात. चिरकारी प्रकारात पोटदुखी, अतिसार, अशक्तपणा आणि शेषांत्राची वेटोळी एकमेकांना चिकटल्याने शेवटी आतड्याचा रोध ही लक्षणे दिसतात. दिवसातून चारपाच वेळा शौचास होते व त्या वेळी पोटात मुरडा होतो. मलात रक्तमिश्रित आव व पू पडतो. हाताने पोट तपासल्यास खाली उजव्या भागात दुखरी गाठ लागते. आतड्यातून अन्नरस शोषला न गेल्याने अशक्तपणा, पांडुरोग (रक्तक्षय) व वजनातील मोठी घट ही लक्षणे उद्भवतात. तसेच पोटाच्या उजव्या भागात नाडीव्रण व पुढे आंत्ररोध ही लक्षणेही दिसतात. कित्येकदा आतड्याच्या चिकटलेल्या वेटोळ्यांत वणाने भेद होऊन त्यांच्यात प्रत्यक्ष संबंध उत्पन्न होतो. अशा आंत्रभेदातून पर्युदरशोथ व पर्युदरात स्थानिक विद्रधी (पूयुक्त फोड) उत्पन्न होतो.
निदान : प्रयोगशाळेतील तपासणीत मलामध्ये तांबड्या व पूमिश्रित कोशिका (पेशी) आढळतात. बेरियम अशन वा बस्ती देऊन क्ष-किरण तपासणी केल्यास रोगगस्त भागात लहान आतडे आकुंचन पावलेलेदिसते. गुदद्वारातून आत घालता येण्याजोगे लांब, पोकळ, अवगहकारी नलिकाकार उपकरण वापरूनही तपासणी करतात. या परीक्षणाचा रोगाचे निदान व चिकित्सा यांसाठी आणि छायाचित्र काढण्यासाठी उपयोग होतो.
आंत्रपुच्छशोथ, आंत्रपुच्छशोथ विद्रधी, उंडुकाचा क्षयरोग व कर्करोग, अमीबाजन्य विकार, बृहदांत्रशोथ इ. रोगांतही शेषांत्रशोथासारखी लक्षणे आढळतात. त्यामुळे निदान करणे अवघड असते. यामुळे क्ष-किरण तपासणीव्दारेच शेषांत्रशोथाचे व्यवच्छेदक निदान करावे लागते. कधीकधी शस्त्रक्रियेच्या वेळी पोट उघडल्यावरच निश्चित निदान होते.
चिकित्सा : सौम्य प्रकारात रूग्णास पूर्ण विश्रांती, मऊ व पचनास हलका प्रथिनयुक्त आहार आणि जीवनसत्त्वयुक्त व लोहयुक्त औषधे देऊन उपचार करतात. ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉफिक हॉर्मोने (एसीटीएच) व कॉर्टिकोसोन या औषधांचा फार चांगला परिणाम होतो. जंतुसंसर्ग झालेला असल्यास प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे देतात. सल्फोनामाइड सॅलिसिलॅझोसल्फापिरिडीन यासारखी सल्फा औषधे दिल्याने पुष्कळ रूग्ण बरे होतात. विकार तीव्र स्वरूपाचा असल्यास म्हणजे आतड्यास छिद्र पडले असता किंवा आतड्यात अंतर्गत रक्तस्राव होत असल्यास रूग्णावर शस्त्रक्रिया करावी लागते. अर्थात अत्यावश्यक असल्यासच शस्त्रक्रिया करतात. शस्त्रक्रियेत आतड्याचा रोगगस्त खराब भाग काढून टाकून त्याची उरलेली दोन्ही टोके एकमेकांना जोडतात. शस्त्रक्रियेने पुष्कळ रूग्ण पूर्ण बरे होऊन त्यांचे आयुर्मान वाढते.
पहा : आंत्रपुच्छशोथ आंत्रशोथ जठरांत्र मार्ग बृहदांत्रशोथ शोथ.
फाटक, अविनाश पु.