शेल तेल : एक खनिज तेल. हे ऑइल शेल या गाळाच्या खडकापासून भंजक ⇨ ऊर्ध्वपातन पद्धतीने मिळविले जाते. या प्रक्रियेत या खडकांतील केरोजेन या मेणयुक्त जैव द्रव्याचे बारीक तुकडे होऊन वायू, पाणी आणि अवशिष्ट कार्बन सुटे होतात. कच्च्या (कूड) तेलासाठी वापरल्या जाणाऱ्या विकसित पद्धतीने शेल तेलाचे शुद्धीकरण करता येत नाही कारण शेल तेलात हायड्रोजनाचे प्रमाण कमी आणि नायट्रोजनयुक्त व गंधकयुक्त संयुगांचे प्रमाण जास्त असते. शेल तेल वापरण्यायोग्य करण्यासाठी त्याचे ⇨ हायड्रोजनीकरण करून रासायनिक प्रक्रियेने त्यातील नायट्रोजन व गंधकयुक्त अशुद्धी काढून टाकतात.

ऑइल शेलाची बकपात्रक्रिया (रिटॉर्टिंग) ज्या तापमानाला केली जाते, त्यांवर तेल उत्पादनाची मात्रा अवलंबून असते. उदा., महॉगनी झोनमधील ऑइल शेल खडक झपाटयाने ५०० से.ला तापवून ते तापमान स्थिर ठेवले, तर विक्रिया पूर्ण होण्यास सु. दहा मिनिटांचा अवधी लागेल तथापि ३४० से. तापमानाला शंभर तासांपेक्षा जास्त, तर ६६० से. तापमानाला काही सेकंदच लागतील.

सांप्रत प्रगत तंत्रपद्धतींपैकी एका पद्धतीने शेल तेल मिळविले जाते. या पद्धतीत शेल खडकाचे खनन व दलन (कशिंग) करतात आणि त्यानंतर तो प्रक्रिया संयंत्रापर्यंत वाहून नेतात. तेथे तो विशेष बकपात्रात सु. ५०० से.ला तापवितात. भरपूर उष्णतेमुळे खडकातून तेलाची वाफ निघते व संघनकाच्या मालिकेत तिचे द्रवीभवन होते. दुसऱ्या पद्धतीत असेल त्या स्थितीत निष्कर्षण करतात. या तंत्रात स्फोटकांच्या साहाय्याने ऑइल शेलाच्या साठ्यात स्फोट करून तुकडे करतात. त्यानंतर वायू व हवा यांचे मिश्रण पंपाच्या साहाय्याने साठ्यामध्ये सोडतात आणि पेटवून देऊन खडक तापवितात. शेलाचे ताप-अपघटन होऊन तेलाची वाफ निर्माण होते. तिचे संघननाने द्रवण होऊन कच्च्या तेलाप्रमाणे पंपाच्या साहाय्याने शेल तेल बाहेर काढतात.

उत्पादित शेल तेलाच्या स्वरूपावर तापमानाचा परिणाम होतो. नीच तापमानाला शेल तेलात ओलेफिनांपेक्षा पॅराफिनांचे प्रमाण जास्त असते. मध्यम तापमानाला ओलेफिनांचे प्रमाण जास्त असते. उच्च् तापमानाला उत्पादित शेल तेले संपूर्णत: सुगंधी (ॲरोमॅटिक) असतात म्हणजे त्यात ओलेफिनांचे प्रमाण अत्यल्प असते. दर मिनिटाला १०० से.पेक्षा जास्त तापन त्वरा वाढविली, तर ओलेफिन व पॅराफिनांची प्रमाणे कमी होतात आणि सुगंधीपणाचे प्रमाण वाढते.

शेल तेल निष्कर्षण प्रक्रियां ची एकस्वे प्रथम गेट ब्रिटनमध्ये १६९४ मध्ये घेण्यात आली. शेल तेलाचे व्यापारी प्रमाणावरील उत्पादन १८३८ साली फ्रान्समध्ये आणि १८५० साली स्कॉटलंडमध्ये सुरू झाले. शेल तेल पुन:प्रापण प्रक्रिया एकोणिसाव्या शतकात छोट्या प्रमाणावर ऑस्ट्रेलिया, बाझील व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत सुरू करण्यात आली तर विसाव्या शतकाच्या सुरूवातीला चीन, एस्टोनिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, स्पेन, स्वीडन व स्वित्झर्लंड या देशांमध्ये ती सुरू करण्यात आली. विसाव्या शतकाच्या मध्यास शेल तेलाचे उत्पादन झपाटयाने घटले. प्रक्रियेची महागडी पद्धती व कच्च्या तेलाची मोठया प्रमाणात उपलब्धता हे त्याचे कारण होय. शेल तेलाच्या वाजवी किंमतीसाठी त्याच्यानिर्मिति-उत्पादनाच्या पद्धतींवर विशेष संशोधन चालू असते.

जमदाडे, ज. वि.