सेना न्हावी : (तेराव्या शतकाचा उत्तरार्ध). एक वारकरी संप्रदायी संतकवी. शेना न्हाऊ, सेनाजी, सेना महाराज ह्या नावांनीही ते ओळखले जातात. सेनापती, सैन अशीही त्यांची नावे आढळतात. ⇨ ज्ञानेश्‍वर, ⇨ नामदेव यांच्या काळातील ते एक थोर भगवद्‌भक्त. जबलपूरजवळील (मध्य प्रदेश) बांधवगड वा बांदूगड येथील राजाच्या सेवेत ते होते. या राजाने त्यांची संतवृत्ती ओळखून त्यांना आपले गुरू केले. सेना न्हावी हे महाराष्ट्रीय, की उत्तर भारतीय हिंदी भाषिक ह्याबद्दल अभ्यासकांमध्ये मतभेद आढळतात. शं. प. जोशी यांनी पंजाबातील नामदेव ह्या आपल्या ग्रंथात सेना न्हावी हे हिंदी भाषिक होते असे म्हटले आहे. उत्तरेकडे सेना न्हावी यांचे मठ, मंदिरे, अनुयायी आढळतात. रामानंदांचे प्रमुख शिष्य म्हणून उत्तर भारतात ते ख्यातकीर्त झाले तथापि रामानंदांच्या शिष्यपरिवारात त्यांचे काव्य आढळत नाही. हिंदी साहित्याचे एक अभ्यासक विनयमोहन शर्मा ह्यांच्या मते सेना न्हावी हे उत्तरेकडील नव्हते मात्र त्यांनी नामदेवांप्रमाणे उत्तर भारतात भ्रमण केले असणे शक्य आहे. त्यांची एकच हिंदी रचना उपलब्ध असून ती शिखांच्या ग्रंथसाहेब या ग्रंथात अंतर्भूत आहे. त्यांची अन्य रचना मराठीत आढळते. त्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व होते. त्यांची मराठी अभंगरचना पाहता असे दिसते, की पूर्वायुष्यात ते महाराष्ट्रात राहिले असावेत आणि नंतर त्यांनी उत्तरेकडे प्रयाण केले असावे. त्यांच्या मराठी रचनेमध्ये रामानंदांचा गुरू म्हणून कोठेही उल्लेख नाही परंतु त्यांचे शिष्य म्हणून उत्तरेकडे त्यांना ख्याती लाभली आहे. कदाचित रामानंदांच्या उत्तरेकडील वास्तव्यात सेना न्हावी तेथे असावेत व त्यामुळे त्यांच्या शिष्यपरिवारात त्यांचे नाव घेतले जात असावे.

श्रीसकलसंतगाथेत (भाग १) सेना न्हावी यांच्या नावावर अभंग व गौळणी धरून १४३ रचना असून त्यांमध्ये गुरुविषयक उत्कट आदरभाव, नाममाहात्म्य, पांडुरंगाचा ध्यास तसेच त्र्यंबकमाहात्म्य, आळंदीमाहात्म्य आणि सासवडमाहात्म्य हे तीन स्थलमाहात्म्य सांगणारे अभंगही आहेत. पंढरीचा पांडुरंग व ज्ञानदेव यांच्याबद्दलचा उत्कट जिव्हाळा त्यांच्या रचनेतून प्रत्ययास येतो. आपल्या व्यवसायातून रूपकनिर्मिती करून त्यांनी रचलेला ‘आम्ही वारिक वारिक करु हजामत बारिक बारिक । विवेकदर्पण दाऊ । वैराग्य चिमटा हालवू ।’ हा अभंग प्रसिद्ध आहे. त्यांनी रचलेल्या गौळणी अतिशय भावोत्कट आहेत.

पोळ, मनीषा.