जोशी, चिंतामण विनायक : (१९ जानेवारी १८९२–२१ नोव्हेंबर १९६३). सुप्रसिद्ध मराठी विनोदी लेखक. जन्म पुणे येथे. सुधारक  या पत्राचे संपादक वि. रा. जोशी हे यांचे वडील. पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण. फर्ग्युसन कॉलेजातून बी. ए. (१९१३), एम्. ए. (१९१६) झाले. पाली भाषेचा विशेष व्यासंग.

आरंभी चार वर्षे सरकारी शिक्षणखात्यात माध्यमिक शिक्षक. पुढे १९२० पासून बडोद्यात नोकरीच्या निमित्ताने वास्तव्य. प्रथम आठ वर्षे बडोदा कॉलेजात पाली, इंग्रजी आणि मराठी या भाषांचे प्राध्यापक. १९२८ पासून बडोदा सरकारचे दप्तरदार. १९४९ मध्ये निवृत. बडोद्याच्या वास्तव्यात गुजराती भाषेशी त्यांचा उत्तम परिचय झाला. तेथील ‘सहविचारणी सभे’च्या व निवृत्तीनंतर पुण्यास आल्यावर मराठी साहित्य परिषदेच्या कार्यात सहभाग. बडोद्याच्या ‘सहविचारणी सभे’च्या विद्यमाने निघणाऱ्या सहविचार  ह्या नियतकालिकाचे एक संपादक.

अ मॅन्युअल ऑफ पाली सद्धम्मप्पकासिनी (संपादक), पाली कंकॉर्डन्स (कोश), जातकांतील निवडक गोष्टी … (१९३०), शाक्यमुनि गौतम (१९३५), बुद्धसंप्रदाय व शिकवण (१९६३) ही त्यांची ग्रंथनिर्मिती त्यांच्या पालीच्या व्यासंगाची द्योतक आहे पण याहीपेक्षा चाळीसांवर पुस्तके लिहून त्यांनी मराठी  विनोदाच्या क्षेत्रात जी कामगिरी बजावली ती विशेष महत्त्वाची होय. विनोदी लेखनाची प्रेरणा त्यांना कोल्हटकर-गडकऱ्यांच्या कोटित्वयुक्त लेखनातून मिळाली व त्याचा ठसा आपणास त्यांच्या प्रारंभीच्या एरंडाचे गुऱ्हाळ.… (१९३२) मधील लेखन व चिमणरावांचे चऱ्हाट….(१९३३) मधील विवाहविषयक लेख यांवर स्पष्ट दिसतो. या मराठी लेखकांबरोबरच मार्क ट्‍वेन, डब्ल्यू.  डब्ल्यू. जेकब्स, जेरोम के जेरोम, हर्बर्ट जेकिन्स, स्टीफन लीकॉक यांच्या विनोदी लेखनाचे संस्कार त्यांच्यावर झाले. पूर्वीच्या विनोदकारांप्रमाणे त्यांनीही चिमणराव व गुंड्याभाऊ अशी मानसपुत्रांची जोडगोळी जन्मास घातली आणि तिला विविध लोकव्यवहारांतून फिरवून आणले. पण त्यांच्या चित्रणात अतिशयोक्तीपेक्षा स्वभावोक्तीवर आणि समाजसुधारणेच्या मंडनापेक्षा मानवी स्वभावातील साध्यासुध्या विसंगतींच्या दर्शनावर भर राहिला. त्यांची निवेदनशैलीही मर्मभेदक कोटित्वापेक्षा मार्मिक व स्वाभाविक संवादांनी नटलेली आहे. त्यामुळे त्यांचे लेखन निबंधरूप होण्याऐवजी त्याला ललित कथेचा घाट प्राप्त झाला व त्यातून मध्यम वर्गीयांचे एक अस्सल व स्वयंपूर्ण विश्व साकार झाले. वर उल्लेखखिलेल्या पुस्तकांशिवाय वायफळाचा मळा.… (१९३६), आणखी चिमणराव (१९४४), ओसाडवाडीचे देव (१९४६), गुंड्याभाऊ (१९४७), लंकावैभव (१९४७), रहाटगाडगं (१९५५), हास्यचिंतामणी (१९६१), बोरीबाभळी (१९६२) हे त्यांचे विनोदी लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘चिमणराव स्टेट गेस्ट’ ह्या त्यांच्या एका कथेवरून काढण्यात आलेला सरकारी पाहुणे  हा चित्रपट महाराष्ट्रात विलक्षण गाजला होता. मुंबई येथे ते निधन पावले.

मालशे, स. गं.