सेनफोइन (ओनोब्रिकिस सटायव्हा ) : पानांफुलांसह फांदी.

सेनेफोइन : (इं. सेंटफोइन, होलीक्लोवर, एस्पार्सेट; लॅ. ओनोब्रिकिस सटायव्हा; कुल – लेग्युमिनोजी, उपकुल – पॅपिलिऑनेटी). मध्य व दक्षिण यूरोपीय देश, पश्चिम आशिया, फ्रान्स व ब्रिटन ह्या प्रदेशांत लागवडीत असलेली व चाऱ्यासाठी उपयोगात असलेली एक बहुवर्षायू ओषधी. सायबीरियात व अमेरिकेत ती लागवडीत आढळते. प्राचीन अरब, ग्रीक व रोमन काळांत तिची लागवड होत असावी. जॉन मॉर्टन यांच्या मते १६५१ पासून इंग्लंडमध्ये ती लागवडीत आहे. मात्र १९३९ नंतर तिच्या लागवडीचे क्षेत्र मर्यादित झाले आहे. तिचे दोन प्रकार आढळतात. मोठ्या प्रकारची वनस्पती द्विवर्षायू असून पूर्व अँग्लियात मर्यादित प्रमाणात पिकवितात, तर सामान्य प्रकार मर्यादित क्षेत्रात कॉट्सओल्ड्स व इतरत्र (पश्चिमी माळ जमिनीवर व ग्लॅमोर्गन दरीत) लावतात. सतराव्या ते एकोणिसाव्या शतकांत ब्रिटनमध्ये सेनफोइनला फिंगर ग्रास आणि होली ग्रास अशी नावे होती. फ्रेंच भाषेत ज्याला पवित्र तृण म्हणता येईल अशा अर्थाचे सध्याचे नाव आहे, तर ग्रीक भाषेत गाढवाचे अन्न असा अर्थ या वनस्पतीच्या ओनोब्रिकिस या लॅटिन प्रजातीचा आहे.

सेनफोइन वनस्पतीची उंची ३–६ मी. असून पाने संयुक्त पिसासारखी, विषमदली व ६ × २ सेंमी. असतात. दले अनेक, आयताकृती, लहान, वर गुळगुळीत व खाली लवदार असतात फुले १-२ सेंमी. व्यासाची, फिकट गुलाबी ते पांढरी असून ती कक्षास्थ त्रिकोणी कणिशावर येतात. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी कुलात (व पॅपिलिऑनेटी उपकुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. शिंबा सपाट, एकबीजी, टोकास वाकडी व कधी काटेरी असून बी पिंगट असते. नवीन लागवड बियांपासून करतात दर हेक्टरी ११०–१६४ किग्रॅ. बी पेरावे लागते. साधारणपणे ३–७ वर्षांनी पीकपालट करतात. या पिकाला चुनखडीयुक्त जमीन मानवते. ह्या पिकाचा चारा खाणारी जनावरे विशेष प्रकारे निरोगी असतात, असा समज आहे. बिया पौष्टिक असून त्या कोंबड्यांना खाऊ घालतात. मधमाशी पालनाकरिता ही वनस्पती उपयुक्त असते.

परांडेकर, शं. आ.; कुलकर्णी, सतीश वि.