सेठी, नजम : ( ? १९४८). एक पाकिस्तानी परखड पत्रकार व संपादक. त्यांचा जन्म लाहोर येथील एका सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. जन्मगावी सुरुवातीचे शिक्षण घेऊन गव्हर्नमेन्ट कॉलेजमधून (लाहोर) त्यांनी पदवी संपादन केली (१९६७). नंतर इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठाची एम्.ए. पदवी घेऊन (१९७०) तिथेच एक वर्ष पीएच्.डी.साठी संशोधन केले (१९७१–७२) आणि पुढील संशोधनासाठी पाकिस्तानात आले; मात्र बलुचिस्तानातील लष्करी कारवाईवर टीका केल्याबद्दल त्यांना अटक झाली (१९७५–७७). सर्वक्षमा जाहीर होताच त्यांची मुक्तता झाली. दरम्यान त्यांचा मोहसीन जुगनू या सुविद्य युवतीशी विवाह झाला. नंतर त्यांनी पत्नीच्या सहकार्याने ‘व्हॅनगार्ड बुक्स’ नावाची प्रकाशन संस्था काढली (१९७८). या संस्थेने सु. चारशेपेक्षा जास्त ग्रंथांचे प्रकाशन केले. त्यांनी पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश मोहम्मद मुनीर यांचे फ्रॉम जिना टू झिया हे पुस्तक प्रकाशित केले. त्यात झिया उल् हक यांच्यावर टीका केली होती; म्हणून त्यांनी सेठींना स्थानबद्ध केले (१९८४); परंतु अल्पकाळातच त्यांची निर्दोष सुटका झाली. लाहोर येथे त्यांनी पत्नीच्या सहकार्याने द फ्रायडे टाइम्स हे स्वतंत्र राष्ट्रीय साप्ताहिक सुरू केले (१९८९). धर्मनिरपेक्षता, आंतरराष्ट्रीयवाद, मानवाधिकार, प्रादेशिक शांतता व लोकशाही या तत्त्वांना ते वाहिलेले होते. सेठी यांनी संपादकीयांतून अनेक गैरव्यवहार—विशेषतः भ्रष्टाचार—उघडकीस आणले. त्यात पंतप्रधान नवाज शरिफांच्या कौटुंबिक व्यवहारांचा समावेश होता. तेव्हा शरिफ यांनी प्रथम राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना अटक केली. नंतर अर्थखात्याला फसविल्याचा आरोप केला. तुरुंगातील छळामुळे त्यांना हृदयरोग जडला आणि शस्त्रक्रिया करावी लागली (२०००). पुढे त्यांच्याविरुद्धचे सर्व आरोप निराधार ठरले.
सेठी यांनी स्वतःचे डेली टाइम्स हे दैनिक लाहोर, कराची व इस्लामाबाद या तीन ठिकाणांहून प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली (२००२). त्यांच्या संपादकीयांतून त्यांनी भारताबरोबर शांतता, तालिबान-अल्-कायदा विरुद्धच्या संघर्षास पाठिंबा व धार्मिक मूलतत्त्ववाद व धर्मांधता यास कडवा विरोध या तत्त्वांचा पुरस्कार केला. चार वर्षांनी त्यांनी आजकल हे उर्दू दैनिक काढले (२००८); तथापि या दोन्ही वृत्तपत्रांचे संपादन त्यांनी २०१२ मध्ये सोडून ‘जिओ’ वृत्तवहिनीला वाहून घेतले आहे. तत्पूर्वी त्यांनी २००७ मध्ये ‘बियाँड बॉर्डर्स’ ही दक्षिण आशियातील देशांच्या सांस्कृतिक विषयांना वाहिलेली चित्रनिर्मिती कंपनी काढली. तीद्वारे दूरदर्शनवाहिनी (टून्या) व १३ माहितीपट काढण्यात आले. हिंदुस्थानच्या फाळणीवरील हे लघुपट विशेष गाजले. याशिवाय अनेकांच्या मुलाखती ‘ रूट्स ’ या नावाखाली प्रक्षेपित करण्यात आल्या. त्यांना खुनाच्या धमक्या आल्या. काफीर ठरविण्यात आले. तेव्हा त्यांना पाकिस्तान सरकारने संरक्षण पुरविले. बी.बी.सी.सह अनेक पाश्चात्त्य व आशियाई दूरदर्शन वाहिन्यांवर ते आपले विचार परखडपणे मांडतात. एकाच दशकात आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पत्रकार व्यवसायातील तीन पुरस्कार प्राप्त करणारे नजम सेठी हे आशियातील एकमेव पत्रकार होत. ॲम्निस्टी इंटरनॅशनलचा (ग्रेट ब्रिटन) जर्नेलिझम अंडर थ्रेट अवॉर्ड (१९९९), पत्रकार संरक्षण समितीचा (न्यूयॉर्क) इंटरनॅशनल प्रेस फ्रीडम अवॉर्ड (१९९९), जागतिक पत्रकार संघटनेचा गोल्डन पेन ऑफ फ्रीडम पुरस्कार (२००९), तसेच ‘हिलाल इ पाकिस्तान’ हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना मिळाला. याशिवाय ते अनेक संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आहेत : अध्यक्ष, आफ्रो-आशियाई कफ कौन्सिल (नवी दिल्ली) उपाध्यक्ष, कौन्सिल ऑफ पाकिस्तान न्यूजपेपर एडिटर्स मंत्री, फेडरल गव्हर्नमेन्ट ऑफ पाकिस्तान (इंटेरिम रूल, १९९६–९७) सचिव, साऊथ एशिया मीडीया कमिशन (२००८) उपाध्यक्ष, साऊथ एशिया फाऊंडेशन (पाकिस्तान) इत्यादी पदे त्यांनी भूषविली आहेत. त्यांची पंजाब प्रांताच्या (पाकिस्तान) काळजीवाहू मुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली (मार्च २०१३).
त्यांना अली व मीरा अशी दोन अपत्ये असून अली कादंबरीकार आहेत; तर मीरा ह्या न्यूयॉर्क येथील द वॉल स्ट्रीट या वृत्तपत्र संस्थेत सहसंपादक आहेत. इंटरनॅशनल हेराल्ड ट्रिब्यून ते इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्रापर्यंत जगभरातील अनेक नियतकालिकांतून त्यांनी स्तंभलेखन केले आहे. सेठी यांचा सध्याचा जीओ वृत्तवाहिनीवरील ‘आपस की बात नजम सेठी के साथ’ हा राजकीय घडामोडींवर आधारीत असलेला चर्चात्मक कार्यक्रम खूप गाजत आहे. त्यांनी अद्यापि आपला तात्त्विक लढा लोकशाही पद्धतीने चालू ठेवला आहे.
गेडाम, आनंद