सेजब्रश : ( सेजबुश ). फुलझाडांपैकी ⇨कंपॉझिटी अकॅन्थेसी कुलातील आर्टेमिसिया (इं. वर्मवुड) प्रजातीतील अनेक क्षुपीय वनस्पतींना परंतु विशेषेकरून आर्टेमिसिया ट्रायडेंटॅटा या जातीला हे नाव दिलेले आढळते. या सर्व वनस्पतींचे मूलस्थान उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागातील मैदानी प्रदेश व पर्वतांच्या उतरणी होय. सेजब्रश हेच नाव कधीकधी पश्चिम अमेरिका व कॅनडा येथील अर्धरुक्ष प्रदेशातील याच वनस्पतींच्या समावासाला वापरतात. येथील जमीन अल्कधर्मी पण फार लवणयुक्त नसते. आ. ट्रायडेंटॅटा या क्षुपाचे स्वरूप परिस्थितीनुसार बदललेले आढळते. खुरट्या क्षुपापासून ते लहान वृक्षापर्यंत त्याचा आकार वाढतो, त्यावेळी त्याचा बुंधा पिळवटलेला व गाठाळ बनतो आणि त्यावर फिकट करड्या रंगाची व तुकड्यांनी सोलून जाणारी साल आढळते. या बहुशाखी झुडपाची उंची ०.९-१·८ मी. क्वचित ३·६ मी.पर्यंत जाते. याचा पर्णसंभार चंदेरी-करडा, कडू व सुगंधी असून पाने साधी व त्यांचा आकार शंक्वाकृती असतो. ती टोकास त्रिदंती असतात. फुलोरे (स्तबक) लहान असून त्यांवर सर्वच पुष्पके पूर्ण असून पुष्पासन केसाळ नसते. सर्व पुष्पके नलिकाकृती, हिरवट-पिवळी, दोन प्रकारांची (द्विलिंगी व स्त्रीलिंगी) व वायुपरागित असतात. पिच्छ संदलाचा येथे अभाव असतो. इतर सामान्य शारीरिक लक्षणे कंपॉझिटी (अकॅन्थेसी) कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. या प्रजातीतील काही जाती औषधी आहेत.
पहा : ओवा किरमाणी गाठोणा दवणा.
परांडेकर, शं. आ. कुलकर्णी, सतीश वि.
“