ऱ्हॅम्नेसी : (बदरी कुल बोर कुल). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ऱ्हॅम्नेलीझ (बदरी गण) या गणात ऱ्हॅम्नेसी व व्हायटेसी (द्राक्षा कुल) यांचा अंतर्भाव असून सी. ई. बेसी यांनी हा गण सेलॅस्ट्रेलीझमध्ये (ज्योतिषमती गणात) घातला आहे. ⇨व्हायटेसीचे ऱ्हॅम्नेसी कुलाशी आप्तभाव असल्याने दोन्हींचा अंतर्भाव एकाच नैसर्गिक गणात होतो. ऱ्हॅम्नेलीझ व सेलॅस्ट्रेलीझ यांचेही आप्तभाव असून सेलॅस्ट्रेलीझपासून ऱ्हॅम्नेलीझ ह्या गणाचा उगम झाला असावा असे मानतात. बेसी व एच्. व्हॅलियर यांनी ⇨ रोझेलीझपासून (गुलाब गणापासून) वरील दोन्ही गणांचा उगम व विकास मान्य केला आहे. जे. सी. विलिस यांच्या अंदाजाप्रमाणे या कुलात सु. ५८ प्रजाती व ९०० जाती (ए. बी. रेंडेल : ४५ प्रजाती व ५०० जाती) आहेत त्यांचा प्रसार जगभर असून विशेषतः उ. गोलार्धात त्यांचे प्रमाण जास्त आहे. ऱ्हॅम्नेसी कुलातील वनस्पती काटेरी, आरोही (वर चढणारी) झुडपे वा वृक्ष असून पाने साधी, एकाआड एक, सोपपर्ण (तळाशी लहान उपांगे असलेली), क्वचित समोरासमोर असतात काहींची उपपर्णे काटेरी असतात. फुले लहान, द्विलिंगी, क्वचित एकलिंगी व नियमित आणि फुलोरा वल्लरीय [⟶ पुष्पबंध] असतो. संदले (पाकळ्यांखालची पुष्पदले) ४-५, जुळलेली व प्रदले (पाकळ्या) ४-५, सुटी किंवा कधी ती नसतात. केसरदले (पुं-केसर) ४-५ सुटी व पाकळ्यांसमोर असून त्यांच्या तळाशी (अंतःकेसरी) बहुधा बिंब असते किंजदले (स्त्री-केसर) जुळून त्यांचा बहुधा तीन कप्प्यांचा अर्धवट किंवा पूर्ण अधःस्थ किंजपुट (स्त्री-केसराचा तळभाग) बनतो [⟶ फूल]. फळ शुष्क किंवा रसाळ आणि मृदू किंवा अश्मगर्भी (आठळीयुक्त) असते. गर्भ सरळ व मोठा पुष्क (दलिकेबाहेरचा अन्नांश) फार कमी किंवा मुळीच नसते. पानांत व खोडातील नरमटॅ ऊतकाने [पेशींच्या समूहात ⟶ ऊतके, वनस्पतींतील] नीन व श्लष्मल द्रव्य (म्युसिलेज) असते. बोरीच्या ऱ्हॅम्नस प्रजातीतील जातीच्या खोडांत व फांद्यात ⇨परिरंभ (मध्यवर्ती वाहक घटकांभोवती असलेले पेशींचे वलय) दृढसूत्रमय [कठीण व तंतुयुक्त ⟶ दृढोतक] असते.

बोर, जंगली थोर आणि ⇨ तोरण यांची फळे खाद्य आहेत. ⇨कॅस्करा-सॅग्रेडा हे रेचक ऱ्हॅम्नस पुर्शियानापासून मिळते. ⇨ रक्तरोहिडा ही जातीही (ऱ्हॅ. वाइटाय) औषधी आहे तसेच ⇨कानवेल व ⇨खांडवेलही औषधोपयोगी आहेत. रेसिन ट्रीचे (होबेनिया डल्सीस) लाल देठ मांसल व खाद्य असतात पर्शियन बेरी (ऱ्हॅ. इन्फेक्टोरिया) आणि यूरोपीय बक्यॉर्न  (ऱ्हॅ. कॅथर्टिकस) यांच्या फळांपासून हिरवा रंग काढतात. ऱ्हॅ. फ्रँग्यूला या स्कॉटलंडातील जातीपासून काढलेला कोळसा बंदुकीच्या दारूकरिता उपयुक्त असतो. काही जाती शोभेकरिता बागांतून लावतात.

पहा : सेलॅस्ट्रेसी.

संदर्भ : 1. Hill, A. F. Economic Botany, Tokyo, 1952.

           2. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

           3. Mitra, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta. 1964.

जोशी, रा. ना. परांडेकर, शं. आ.