सेंट-ड्यर्ड्यी फोन नॉडीरॉपोल्ट, ऑल्बेर्ट : (१६ सप्टेंबर १८९३-२२ ऑक्टोबर १९८६). हंगेरियन जीवरसायनशास्त्रज्ञ. त्यांना कोशिकेमार्फत (पेशीमार्फत) होणाऱ्या पोषक द्रव्यांच्या ऑक्सिडीभवनातील विशिष्ट कार्बनी संयुगांच्या विशेषतः क जीवनसत्त्वाच्या कार्यांविषयीच्या शोधासाठी १९३७ सालचे वैद्यकाचे किंवा शरीरक्रियाविज्ञानाचे नोबेल पारितोषिक मिळाले.
सेंट-ड्यर्ड्यी यांचा जन्म बूडापेस्ट (हंगेरी) येथे झाला. १९१७ मध्ये त्यांनी बूडापेस्ट विद्यापीठातून वैद्यकाची (एम्.डी.) पदवी संपादन केली. पहिल्या महायुद्धात भाग घेतल्याने त्यांच्या शिक्षणात खंड पडला. लढताना जखमी झाल्याने ते लष्करी सेवेतून मुक्त झाले. या युद्धात शौर्य दाखविले म्हणून त्यांना रौप्यपदक मिळाले. पुढे जीवरसायनशास्त्रात रुची निर्माण झाल्याने त्यांनी जर्मनी व नेदर्लंड्स या देशांत जीवरसायनशास्त्राचे अध्ययन केले. केंब्रिज विद्यापीठ (१९२७, १९२९) आणि रॉचेस्टर (मिनेसोटा, अमेरिका) येथील मेयो फाउंडेशन (१९२८) या ठिकाणी संशोधन करीत असताना त्यांनी एक कार्बनी क्षपणकारक [⟶ क्षपण ] शोधून काढला व अलग केला. त्यांनी त्याला ‘ हक्सुरॉनिक अम्ल’ हे नाव दिले. या संयुगाला आता ⇨ ॲस्कॉर्बिक अम्ल म्हणतात. हे अम्ल त्यांनी वनस्पतींचे रस आणि प्राण्यांतील अधिवृक्क ग्रंथीचे अर्क यांपासून मिळविले होते. यानंतर चार वर्षांनी हंगेरीतील झेगेड विद्यापीठात प्राध्यापक असताना (१९३१-४५) त्यांनी हे अम्ल ⇨स्कर्व्ही रोग बरा करणाऱ्या क जीवनसत्त्वाशी समरूप असल्याचे सिद्ध केले. १९०७ मध्ये क जीवनसत्त्वाचा शोध ॲक्सेल होल्स्ट व आल्फ्रेड फ्रॉलिख यांनी लावला होता.
नंतर सेंट-ड्यर्ड्यी विशिष्ट कार्बनी संयुगांच्या अभ्यासाकडे वळले. कार्बोहायड्रेटांचे विघटन होऊन त्यांचे कार्बन डाय-ऑक्साइड, पाणी व कोशिकेमार्फत वापरण्यायोग्य अशी ऊर्जा तयार करण्यासाठी आवश्यक असलेली द्रव्ये यांमध्ये रूपांतरण होते. या रूपांतरणात सदर कार्बनी संयुगे मोलाचे कार्य करतात. यानंतर दोन वर्षांनी या रूपांतरणाच्या पूर्ण चक्राचे स्पष्टीकरण ⇨ सर हान्स आडोल्फ क्रेब्ज यांनी दिले, त्याला ‘क्रेब्ज चक्र’ म्हणतात. अशा प्रकारे या क्रेब्ज चक्राच्या स्पष्टीकरणाचा पाया सेंट-ड्यर्ड्यी यांच्या संशोधनाद्वारे घातला गेला होता.
पुढील काळात सेंट-ड्यर्ड्यी यांनी स्नायुक्रियेतील जीवरसायनशास्त्राच्या अध्ययनाला वाहून घेतले. स्नायूंमध्ये आढळलेल्या प्रथिनाला त्यांनी ॲक्टिन हे नाव दिले. स्नायूंतील मायोसीन या प्रथिनाबरोबर ॲक्टिन हे प्रथिन स्नायूंच्या आकुंचनाला जबाबदार असते, असे त्यांनी दाखविले. तसेच त्यांनी स्नायूंच्या आकुंचनासाठी आवश्यक असलेला ऊर्जेचा तात्कालिक स्रोत ॲडिनोसीन ट्रायफॉस्फेट (एटीपी) हे संयुग असल्याचेही दाखवून दिले. त्यांची १९४७ मध्ये अमेरिकेतील वुड्स होल, मॅसॅचूसेट्स येथील इन्स्टिट्यूट फॉर मसल रिसर्च या संस्थेमध्ये संचालक म्हणून नेमणूक झाली. तेथे त्यांनी कोशिका-विभाजनाच्या कारणांविषयीचे व पुढे कर्करोगाविषयीचे संशोधन केले.
पृथ्वीवर माणूस टिकून राहण्याविषयीचे विज्ञान व माणसाचे भवितव्य यांवरील चिकित्सक मात्र निराशावादी विवेचन असलेले सेंट-ड्यर्ड्यी यांचे द क्रेझी एप हे पुस्तक १९७० मध्ये प्रसिद्ध झाले. याशिवाय त्यांनी विज्ञानावरील पुढील पुस्तके लिहिली : ऑन ऑक्सिडेशन, फर्मेंटेशन, व्हिटॅमिन्स, हेल्थ अँड डिसीज (१९४०), केमिकल फिजिऑलॉजी ऑफ कॉन्ट्रॅक्शन्स इन बॉडी अँड हार्ट मसल (१९५३), बायोएनर्जेटिक्स (१९५६), इंट्रॉडक्शन टू सबमॉलेक्युलर बायॉलॉजी (१९६०) इत्यादी.
सेंट-ड्यर्ड्यी यांचे वुड्स होल येथे निधन झाले.
ठाकूर, अ. ना.
“