एंटोप्रॉक्टा : एक्टोप्रॉक्टा (ब्रायोझोआ) संघातील प्राण्यांशी असलेल्या बाह्य साम्यामुळे यांचा समावेश पूर्वी त्या संघात केला होता. परंतु यांची मूलभूत संरचना वेगळी असल्यामुळे यांचा एंटोप्रॉक्टा हा स्वतंत्र संघ केला आहे. या संघाला कॅलिसोझोआ व कॅप्टोझोआ ही नावेही दिलेली आहेत, पण ती मागे पडून एंटोप्रॉक्टा हे नाव हल्ली रूढ झाले आहे.
हे प्राणी सूक्ष्म असून एकएकटे असतात किंवा त्यांचे निवह (समूह) असतात. ध्रुवीय प्रदेशापासून उष्णकटिबंधापर्यंतच्या सर्व समुद्रांत किनाऱ्याजवळील उथळ भागापासून खोल भागापर्यंत ते आढळतात. फक्त अर्नटेला ग्रॅसिलीस हा गोड्या पाण्यात राहणारा असून दगडांना चिकटलेला असतो. या संघात लोक्झोसोमॅटिडी, पेडिसेलिनिडी व अर्न लिडी ही कुले, १२ वंश आणि सु. ९० जाती आहेत.
पेडिसेलिना आणि बॅरेनसिया हे नेहमी आढळणारे निवहप्राणी समुद्राच्या उथळ पाण्यात शंखावर किंवा शैवलांवर वाढतात. ते पक्ष्माभिकांच्या (हालचाल करणाऱ्या बारीक केसां सारख्या तंतूंच्या) साहाय्याने पाण्यातील सूक्ष्मजीव व जैव अन्नकण खातात. पुष्कळ जाती समुद्री ॲनेलिड प्राणी, स्पंज किंवा ॲसिडियन प्राण्यांच्या शरीरावर सहभोजी (दुसऱ्या प्राण्यांबरोबर राहून त्यांच्या अन्नात वाटेकरी होणारे) म्हणून राहतात.
एंटोप्रॉक्टांचे जीवक (निवहातील व्यक्ती) सूक्ष्म असून प्रत्येकाला कटोर (पेल्यासारखा भाग), वृंत (देठ) आणि रूंद तळ असतो. कटोराच्या अग्रभाची लोफोफोर (घोड्याच्या नालाच्या आकाराचे इंद्रिय) असतो. लोफो-फोराच्या आतल्या बाजबस पक्ष्माभिकामय संस्पर्शकांचे ( लांब किरकोळ स्पर्शेद्रियांचे) एक वलय असते. मुख व गुदद्वार या वलयात उघडतात. पचनमार्ग इंग्रजी U अक्षराच्या आकाराचा, पूर्ण व पक्ष्माभिकामय असून त्याचे ग्रसिका (घशापासून निघून जठरात उघडणारी नळी), आमाशय (जठर) व मलाशय असे भाग असतात. आदिवृक्ककांची (आद्य उत्सर्जन-नलिकांची) एक जोडी असते. कूटदेहगुहा (खोटी देहगुहा) असून ती श्लेषी (बुळबुळीत) मृदूतकाने (मऊ, स्पंजासारख्या समान रचना न कार्य असलेल्या पेशींच्या समूहाने म्हणजे ऊतकाने) भरलेली असते. परिसंचारी (रुधिराभिसरणाची अथवा त्यासारखी दुसरी) व श्वसन अंगे नसतात. तंत्रिका गुच्छिका (मज्जातंतु-कोशिकांचा पुंज) असते. हे प्राणी एकलिंगी (नर, मादी वेगळी असणे) किंवा उभयलिंगी (एकाच व्यक्ती त पुं-आणि स्त्री-जननेंद्रिये असणे) असतात. जनन मुकुलनाने (प्राण्याच्या शरीरावर बारीक अंकुरासारखे उंचवटे उत्पन्न होऊन त्यांपासून नवीन प्राणी तयार होणे) किंवा लैंगिकरीत्या होते. अंड्यांचा व डिंभांचा (अळीसारख्या अवस्थांचा) विकास अंडाशयात (स्त्री-जननपेशीत) होतो. डिंभ पक्ष्माभिकामय असतो. कटोराचे वृंतापासून पुनरुत्पादन होते.
जोशी, मीनाक्षी
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..