एकत्र कुटुंबपद्धति : हिंदू समाजातील एक वैशिष्ट्यपूर्ण संस्था. हिंदूमध्ये एकत्र कुटुंब हे केवळ जास्त पिढ्यांचेच असते किंवा जास्त काळपर्यंत अस्तित्वात असते असे नसून, अशा कुटुंबास एक विधिमान्य दर्जा व त्यांच्या घटकांस काही वैशिष्ट्यपूर्ण अधिकार प्राप्त झालेले आहेत.
घराण्याचा अस्तित्वात असलेला समान पुरुष पूर्वज, त्याची कुठल्याही श्रेणीपर्यंत असणारी पुरुषानुवर्ती पुरुषसंतती व ह्या सर्वांच्या पात्न्या, विधवा व अविवाहित मुली या सर्वांचे मिळून एक एकत्र हिंदू कुटुंब होते. याप्रमाणे हिंदू कुटुंबहाकायद्याने नसून रक्ताने जोडलेला वरील मर्यादेत बसणारा एकगोत्री आप्तवर्ग होय. सामान्यत: हिंदू कुटुंब हे एकत्र कुटुंबच आहे, अशी कायद्याची धारणा आहे व विभाजनाचा प्रत्यक्ष पुरावा दाखविल्याखेरीज या धारणेचे खंडन होत नाही. सामायिक रहिवास, सामायिक देवता, सामायिक भोजन व सामायिक मालमत्ता ही सर्वसाधारणपणे एकत्र कुटुंबाची लक्षणे आहेत. परंतु सामायिक मालमत्ता हे मात्र एकत्र कुटुंबाच्या अस्तित्वाचे अपरिहार्य लक्षण नव्हे. त्यामुळे सामायिक मालमत्तेशिवायही एकत्र कुटुंब अस्तित्वात असू शकते.
कायद्याच्या क्षेत्रात एकत्र कुटुंबाला तदंतर्गत असणाऱ्या सहदायादवर्गामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हासहदायादवर्ग मात्र केवळ रक्ताच्या नात्यामुळे निर्माण न होता, एखाद्या नातेवाईकाच्या एका विषिष्ट प्रकारच्या संपत्तीशी उत्तराधिकारामुळे एकसमयावच्छेदेकरून निगडित होणाऱ्या गटामध्ये विधिचालनानुसार निर्माण होतो. प्रत्येक हिंदूची वडिलार्जित व स्वार्जि किंवा स्वकष्टार्जित अशी दोन प्रकारची संपत्ती असू शकते. पिता, पितामह किंवा प्रपितामह यांपासून पुत्र, पौत्र किंवा प्रपौत्र यास वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीस ‘वडिलार्जित’ असे नामाभिधान आहे. अन्य कुठल्याही व्यक्तीकडून वा कुठल्याही मार्गाने मिळवलेली संपत्ती ही सर्वसाधारणपणे स्वार्जित म्हणून गणली जाते. अर्थात पित्याची स्वार्जित संपत्ती ही वारसाहक्काने पुत्राच्या हाती पडल्यास ती पुत्राचे हाती वडिलार्जित संपत्ती बनते. या संपत्तीच्या अवस्थांतूनच सहदायादवर्ग जन्मास येतो. परंतु मिताक्षरा व दायभाग असे हिंदू कायद्याचे दोन पंय असून त्यांच्याप्रमाणे अशा सहदायादवर्गाची व्याख्या व व्याप्ती वेगवेगळी असते. मिताक्षरापंथानुसार पुत्राला जन्मतःच पित्याच्या दोन्ही प्रकारच्या संपत्तीत मालकी हक्क मिळत असला, तरी न्यायनिर्णित विधीप्रमाणे मिताक्षरापंथीय पुत्राला पित्याच्या स्वार्जित संपत्तीमध्ये जन्मसिद्ध हक्क मिळत नाही फक्त वडिलार्जितामध्येच मिळतो, असे ठरले गेले आहे. त्यामुळे उपर्युक्त उदाहरणामध्ये पित्याच्या स्वार्जितांचे वारसाहक्काने पुत्राच्या वडिलार्जितामध्ये रूपांतर झाल्याबरोबर, अशा पुत्राचे स्वतःचे पुत्र, पौत्र व प्रपौत्र हे त्या संपत्तीमध्ये जन्मसिद्ध हक्क मिळवतात व या सर्वांचा एक सहदायादवर्ग निर्माण होतो. अशा रीतीने सहदायादवर्गात फक्त पुरुषच असतात व एकावेळी एकंदरीत फक्त चार पिढ्यांचेच पुरुष त्यामध्ये मोडतात. अर्थात उपर्युक्त मूळ पुरुष निवर्तल्यावर त्याच्या पुढील चार पिढ्यांचे पुरुष सहदायादवर्गाचे सभासद होतात. हा सहदायादवर्ग विभाजन होईपर्यंत पिढ्यान्पिढ्या चालू शकतो. परंतु दायभाग पंथाप्रमाणे सहदायादवर्ग हा चार पिढ्यांचाच असला, तरी दायभागानुसार पुत्राला पित्याच्या कुठल्याही संपत्तीमध्ये जन्मसिद्ध अधिकार नसल्यामुळे व पित्याची दोन्ही प्रकारची संपत्ती पुत्राला पित्याच्या मरणानंतरच मिळत असल्यामुळे सदरहू सहदायादवर्गामध्ये पिता असेपर्यंत पुत्राचा अंतर्भाव होऊ शकत नाही. त्यामुळे दायभागपंथीय सहदायादवर्ग हा भिन्नशाखीय वंशजाचीचा बनलेला असतो. उदा., उपर्युक्त वडिलार्जित संपत्ती मिळवणाऱ्या पुत्राबरोबर त्याचे बंधू, मृत बंधूंचे पुत्र, मृत बंधूंच्या मृत पुत्रांचे पुत्र इ. भिन्नशाखीय पुरुष वंशज त्यांच्या सहदायादवर्गामध्ये समाविष्ट होतात. हे सर्व पूर्वीपासून एकत्र कुटुंबाचे घटक असतातच परंतुत्यांच्याव्यतिरिक्त एकत्र कुटुंबामध्ये स्त्रिया व चार पिढ्यांनंतरची पुरुष संतती यांचाही समावेश होऊ शकतो. याप्रमाणे एकत्र कुटुंब व सहदायादवर्ग यामध्ये थोडा फरक असला, तरी वरील रीतीने प्राप्त झालेली सहदायादवर्गाची संपत्ती म्हणजेच तत्संबंधी एकत्र कुटुंबाची सामायिक संपत्ती हे समीकरण विधिमान्य झालेले आहे. हा बाह्यतः विरोधाभास वाटला, तरी अशा सहदाय संपत्तीवर सहदायादवर्गाचा मालकीहक्क असतो व त्या वर्गामध्ये न मोडणाऱ्या एकत्र कुटुंबाच्या इतर घटकांचे अशा संपत्तीमध्ये निर्वाहादी उपयोगासाठी लाभप्रद्र हितसंबंध असतात, असे त्याचे स्पष्टीकरण आहे.
दायभाग पंथ बंगालमध्ये रूढ असून मिताक्षरा पंथ हा भारतात इतरत्र रूढ आहे. मिताक्षरा सहदायाची काही खास लक्षणे आहेत. सहदायादवर्गाच्या चार पिढ्यांच्या मर्यादेपर्यंत जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस जन्मसिद्ध हक्क मिळतो व त्या वर्गापैकी कुठलीही व्यक्ती मृत झाल्यास तिचा सामायिक मालमत्तेमधील हक्क तिच्या वारसांकडे न जाता उत्तरजीवित्वाच्या तत्त्वानुसार उर्वरित सहदायादांकडे अनुक्रमित होतो. सहदायादवर्गापैंकी सर्वांची सहदायादावर सारखीच मालकी असल्यामुळे व नवीन सहदायाद जन्मास आल्यास इतरांचा वैयक्तिक मालकीहक्क कमी होणे आणि एखादा सहदायाद मृत झाल्यास इतरांचा मालकीहक्क त्या प्रमाणात वाढणे क्रमप्राप्तअसल्यामुळे, विभागणी होईपर्यंत कुठल्याही विशिष्ट सहदायादाला सहदायाच्या कुठल्याही विशिष्ट भागांवर आपला खास वैयक्तिक हक्क सांगता येत नाही व तोपर्यंत त्याच्या वैयक्तिक अविभक्त हितसंबंधाची व्याप्ती बदलती व अतिरिक्त स्वरूपाची असते. परंतु दायभाग पंथाने जन्मसिद्ध हक्क व उत्तरजीवित्व ही दोन्ही तत्त्वे झिडकारलेली असल्याकारणाने दायभागपंथीय सहदायादाच्या अविभक्त हितसंबंधांचे स्वरूप किंवा सहदायामधील त्याचा हिस्सा प्रथमापासूनच निश्चित स्वरूपाचा असतो व त्याच्या मृत्यूनंतर तो त्याच्या विधवा, मुलगा आदी वारसांकडे वारसा हक्काने अनुक्रमित होतो. यावरून एकत्र किंवा अविभक्त असतानासुद्धा दायभागपंथीय सहदायादाचे अविभक्त हितसंबंध हे विभक्तसदृश असतात, असे आढळून येईल. त्याचप्रमाणे काहीखास अपवाद वगळल्यास मिताक्षरापंथीय सहदायादास आपला सहदायामधील अविभक्त हितसंबंध हस्तांतरित करता येत नाही, तर दायभागपंथीय सहदायादाच्या हितसंबंधाचे स्वरूप म्हणजेच त्याचा सहदायातील हिस्सा प्रथमपासून निश्चित असल्यामुळे त्याचे त्याला सुलभतेने हस्तांतरण करता येते.
सहदायादांची सहदाय मालमत्ता म्हणजेच एकत्र किंवा अविभक्त कुटुंबाची सामायिक मिळकत. ही नाना प्रकारची असू शकते व तिच्यामध्ये वडिलार्जित संपत्ती, एखाद्या सहदायादाने सामायिक संपत्तीमध्ये संमिश्रित केलेली त्याची वैयक्तिक स्वार्जित संपत्ती तसेच सहदायादांनी वडिलार्जित संपत्तीच्या मदतीने व सामायिक प्रयत्नांनी मिळवलेली संपत्ती या सर्वांचा समावेश होऊ शकतो.
अविभक्त असेपर्यंत सहदायाच्याबाबतीत सर्व सहदायादांना उपभोगाचा सारखाच हक्क असतो. सहदायातून आपल्या निर्वाहाची व्यवस्था करून घेणे व सर्व सहदायावर ताबा असणे, हे प्रत्येक सहदायादाचे महत्त्वाचे आहेत. सहदायादवर्गामध्ये प्रथमत: समान पूर्वज व त्यांच्या मृत्यूनंतर उर्वरितांमधील सर्वसाधारणत: जेष्ठ पुरुष हाकर्ता म्हणून समजला जातो. या कर्त्यास इतर सहदायादांचे सर्वसामान्य अधिकार असतातच. त्याशिवाय सामायिक मालमत्तेची व्यवस्था पाहणे, कुटुंबाचे उत्पन्न स्वमतानुसारकुटुंबाच्या गरजांसाठी खर्च करणे, एकत्र कुटुंबाचे वादामध्ये वादी वा प्रतिवादी या नात्याने भाग घेणे, संविदेत सहभागी होणे, अशा कुटुंबाचा सामायिक धंदा चालवणे व त्यासाठी प्रसंगविशेषी कर्ज उभारणे इ. अनेक हक्क त्याला कर्ता या नात्याने प्राप्तहोतात. परंतु विशेष म्हणजे विधिमान्य गरजेसाठी किंवा सहदायलाभासाठी कर्त्याला इतर सहदायादांच्या संमतीशिवाय किंवा त्यांच्या मनाविरुद्धसुद्धा मालमत्तेचे किंवा तिच्या विशिष्ट भागाचे हस्तांतरण करण्याचा आहे. असे सबळ कारण नसताना त्याने केलेले हस्तांतरण शून्यनीय असते व त्यास इतर सहदायादांपैकी कोणीही आक्षेप घेतल्यास कोर्ट ते रद्दबातल करतो.
एकत्र कुटुंबाच्या सामायिक मालमत्तेचे स्वार्जित संपत्तीमध्ये रूपांतर करण्याचा एक सर्वसाधारण मार्ग म्हणजे विभाजन. विभाजन हे दरडोई तत्त्वावर नसून दरशाखा तत्त्वानुसार होते. हिस्सेदार समदायादास पुत्रपौत्रादी असल्यास पुन्हा त्यांच्याबरोबर विभागणी होईपर्यंत त्यांच्या हातातील हिस्सा हा त्याच्या पुत्रापौत्रदिकांच्या बाबतीत सामायिकच राहतो. त्याचप्रमाणे अविवाहित किंवा निपुत्रिक असणार्या हिस्सेदाराचा हिस्सा हातात्पुरता स्वार्जितासारखा हस्तांतरणीय असला, तरी त्याचे मूळचे स्वरूप वडिलार्जित असल्यामुळे सदरहू दायादास पुढे पुत्र झाल्यास किंवा त्याने पुत्र दत्तक घेतल्यास सदरहू पुत्राच्या जन्मसिद्ध अधिकारामुळे पुन्हा पितापुत्रांमध्ये सहदायादवर्ग निर्माण होतो व उपरोक्त हिस्सा सामायिक मालमत्ता बनते. विभाजनामध्ये सर्व सहदायाबादांना हिस्सा मिळतोच. त्याशिवाय विभाजन पितापुत्रांमध्ये असल्यास पित्याची पत्नी, केवळ पुत्रांमध्ये असल्यास त्यांची विधवा माता व पुत्रपौत्रांमध्ये असल्यास त्यांची विधवा आजी ह्या स्त्रियांनासुद्धा खास अपवाद म्हणून हिस्सा मिळतो. त्याशिवाय १९३७ चा ‘हिंदू संपत्तिविषयक हक्क’ या अधिनियमान्वये एखादा मिताक्षरा सहदायाद मृत झाल्यास त्याचे सामायिक मालमत्तेमधील अविभक्त हितसंबंध वारसाहक्काने त्याच्या विधवेस मिळण्याची तरतूद केली आहे व तिला तत्संबंधी विभाजन मागण्याचाही हक्क देण्यात आला आहे. मिताक्षरा सहदायादवर्गास लागू असलेल्या उत्तरजीवित्वाच्या अनुक्रमणपद्धतीस सांविधिक कायद्याने दिलेला हा पहिलाच व मोठा धक्का होय.
एकत्र कुटुंबपद्धती १९५६ च्या हिंदु-उत्तराधिकार अधिनियमाने बाह्यतः जरी नष्ट केलेली नसली, तरी अस्तित्वात असलेल्या सहदायादवर्गाचे क्रमशः परंतु निश्चितपणे विघटन होण्याची व नवीन सहदायादवर्ग उत्पन्न होण्यास प्रतिबंध करण्याची भरपूर तरतूद त्यातील कलम ६ व कलम १९ (ब) या अन्वये करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तिसाव्या कलमान्वये आपल्या अविभक्त हितसंबंधांची मृत्युपत्रान्वये विल्हेवाट लावण्यIचा अधिकार सहदायादास देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या चाळीस-पन्नास वर्षात एकत्र कुटुंबपद्धती ही कायद्याच्या उपाययोजनेमुळे पार नष्ट होईल, असे अनेकांचे मत आहे, सामायिक जमीन कसणे हाकुटुंबाच्या उत्पन्नाचा एकमेव मार्ग राहिला नसल्यामुळे व त्याला नोकरी, धंदा इ. व्यक्तिगत पर्याय उपलब्ध झाल्यामुळे तसेच औद्योगिकीकरण, लोकसंख्येचे नागरीकरण, सामाजिक परिवर्तन इ. कारणांमुळे एकत्र हिंदू कुटुंब हे दिवसेंदिवस आईबाष व अज्ञान मुले एवढ्यांपुरते संकुचित होत आहे व काहीअंशी लयाला जाऊ पहात आहे, ही गोष्ट खरी आहे. परंतु सगोत्र बंधूंना एकमेकांविषयी विलक्षण ओढ अजूनहीवाटते, ही गोष्ट तितकीच खरी आहे. त्याशिवाय १९६१ च्या आयकर अधिनियमान्वये व्यक्तिगत उत्पन्नापेक्षा अविभक्त हिंदू कुटुंबास आयकरांतून जास्त सूट मिळत असल्यामुळे, तसेच धंदा करताना परक्या लोकांबरोबर भागीदारी करण्यापेक्षा आपापसात एकत्र कुटुंब या नात्याने धंदा करणे जास्त चांगले आहे, असे अनेक धनिक पितापुत्रांना आढळून आल्यामुळे हिंदू समाजामध्ये विशेषत: व्यापारी वर्गामध्ये, एकत्र कुटुंबपद्धतीला चिकटून राहण्याची, एवढेच नव्हे, तर संमिश्रणाच्या मार्गाने नवनवीन सहदायादवर्ग निर्माण करण्याची प्रवृत्ती दिसून येत आहे. त्यामुळे एकत्र कुटुंबाच्या भवितव्याविषयी निश्चित अंदाज वर्तवणे कठीणच आहे.
पहा : कुटुंबसंस्था.
संदर्भ : 1. Aiyer, N. Chandrasekhahra, Ed. Mayne’s Treatise on Hindu Law and Usage, Madras, 1953.
2. Desai. Sunderial T. Ed. Mulla: Principles of Hindu Law, Bombay, 1966.
रेगे, प्र. वा.
“