एपिक्यूरस : (३४१ – २७० इ. स. पू.). एक ग्रीक तत्त्वज्ञ. ॲरिस्टॉटलनंतरच्या काळात सुखवादी तत्त्वज्ञानाची शिकवण देणारा हा ग्रीक तत्त्वज्ञ, आशिया मायनरमधल्या सेमॉस नावाच्या बेटावर ॲथीनियन मातापितरांच्या उदरी जन्मला. त्याचे वडील शिक्षक होते. विद्यार्जनासाठी त्याने बरेच देशाटन केले. नॉसिफेनिस नावाच्या विचारवंताकडून त्याला डीमॉक्रिटसच्या (४६०–३७० इ. स. पू.) परमाणुवादाची ओळख झाली. या वादाचा त्याच्या विचारसरणीवर चिरस्थायी प्रभाव पडला. बारा वर्षे एकांतवासात स्वतंत्र्य रीत्या तत्त्वचिंतन केल्यावर, अखेर त्याने अथेन्स शहरात स्थायिक होऊन तेथे आपले स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केले. त्याचे विद्यापीठ म्हणजे एक उपवन होते आणि तेथील वातावरण अत्यंत प्रसन्न-मनोहर होते. ‘लताकुंजामधील तत्त्वज्ञानी’  अशी त्याच्या अनुयायांना उपाधी लाभली ती अन्वर्थकच होती. त्याच्या पंथाविषयी पुढे नाना प्रवाद प्रचलित झाले आणि कालांतराने ‘एपिक्यूरियन’ या शब्दास अधिक्षेपात्मक अर्थ चिकटला. तथापि खुद्द एपिक्यूरसचे व्यक्तिमत्त्व उदात्त, प्रेमळ,  संयमी आणि आकर्षक होते. अनुयायांना तर त्याचे जीवन देवतुल्य वाटे. त्याच्या अनुयायांत मुख्यत्वेकरून स्त्रिया आणि गुलाम यांचाच भरणा अधिक होता.

एपिक्यूरसचे विद्यापीठ सु. पाच शतके अस्तित्वात होते. या दीर्घ काळात एपिक्यूरसची शिकवण जशीच्या तशी जतन करून ठेवण्यात आली. ती शिकवण संक्षिप्त स्वरूपात, चाळीस सूत्रांत ग्रथित करून ठेवलेली होती आणि ती सूत्रे विद्यापीठवासी मुखोद्‌गत करीत असत. त्यामुळे एपिक्यूरसच्या शिकवणीत कालांतरानेही बदल झाला नाही. तत्कालीन दुसर्‍या कोणत्याही पंथाच्या अनुयायांनी आपल्या आद्य गुरूची शिकवण इतक्या दक्षतेने जतन करून ठेवली नाही.

एपिक्यूरसने अनेक ग्रंथ लिहिले परंतु त्यांतील फारच थोडे परिच्छेद त्रुटित स्वरूपात सध्या उपलब्ध आहेत. त्याची शिकवण प्रसिद्ध रोमन कवी लुक्रीशिअस (९१–४१ इ. स. पू.) याने आपल्या काव्यात मांडलेली आहे.

संदर्भ : Oates, W. J. The Stoic and Epicurean Philosophers, New York, 1957.

केळशीकर, शं. हि.