ऊतके, प्राण्यांतील : उत्पत्ती, रचना, स्वरूप व कार्य या दृष्टींनी सारख्या असणाऱ्या कोशिका समूहांना (पेशी समूहांना) व त्यांच्या आधारद्रव्यांना मिळून ‘ऊतक’ असे म्हणतात.
शरीरातील सर्व ऊतकांची उत्पत्ती निषेचित (फलन झालेल्या) अंडापासून होते. त्या एककोशिक-अंडाचे विभाजन होऊन त्यापासून प्रथम दोन, त्या दोन कोशिकांपासून चार अशा प्रकाराने कोशिकांची संख्या वाढत जाऊन भ्रूण उत्पन्न होतो. भ्रूणातील कोशिकांपासून पुढे तीन थर तयार होतात. त्यांना अनुक्रमे बाह्य, मध्य आणि अंतःस्तर अशी नावे आहेत. शरीरातील सर्व कोशिकांची व त्या कोशिकांपासून तयार होणाऱ्या सर्व ऊतकांची उत्पत्ती या तीन भ्रूणस्तरांपासून होते.
ऊतकांचे प्रकार : विशिष्ट कार्य करणारे आणि विशिष्ट स्वरूप व गुणधर्म असलेले असे ऊतकांचे चार प्रकार कल्पिलेले आहेत. ते असे : (१) अधिस्तर (आच्छादक) ऊतक. (२) संयोजी (जोडणारे) ऊतक. याच प्रकारात रक्त आणि लसीका (इतर ऊतकांकडून रक्तात जाणारा व रक्तद्रवाशी साम्य असणारा द्रव पदार्थ) या ऊतकाचा अंतर्भाव होतो. (३) स्नायू ऊतक. (४) तंत्रिका (मज्जातंतू) ऊतक.
अधिस्तर ऊतक : शरीराच्या पृष्ठभागावर आणि सर्व पोकळ इंद्रियांच्या आणि नलिकांच्या आतल्या पृष्ठावर पसरलेल्या एक किंवा अनेक थरांनी बनलेल्या ऊतकाला अधिस्तर ऊतक हे नाव आहे. बहुतेक सर्व अधिस्तर ऊतके भ्रूणाच्या बाह्य आणि अंतःस्तरांपासून उत्पन्न होतात. अपवाद म्हणजे मूत्र-जननेंद्रिय तंत्रातील (व्यूहातील) अधिस्तर मात्र भ्रूणमध्यस्तरापासून उत्पन्न होतो. अधिस्तरातील कोशिकांच्या तळाशी त्यांना आधारभूत असा तंतुसदृश (धाग्यासारखा) थर असून त्या थरावर कोशिका घट्ट बसलेल्या असतात. त्या थराला आधारस्तर असे म्हणतात. अधिस्तर ऊतकांतील कोशिका एकमेकीस घट्ट चिकटलेल्या असल्यामुळे दोन कोशिकांमधील अंतर-कोशिकाद्रव्य अगदी थोडे असते.
अधिस्तर ऊतकाची तीन प्रमुख कार्ये असतात : (१) संरक्षण, (२) स्रावोत्पत्ती व (३) शोषण आणि गतिजनन (हालचाल करणे). त्वचेवरील अधिस्तर हे संरक्षण कार्याचे उदाहरण असून, स्रावोत्पादक ग्रंथी व त्यांच्या नलिका या स्रावोत्पादक अधिस्तराचे आणि आंत्रातील (आतड्यातील) व श्वसन तंत्रातील नलिकांच्या अंतःपृष्ठावरील अधिस्तर ही शोषण आणि गतिजनक अधिस्तरांची उदाहणे होत.
अधिस्तर ऊतकाचे स्वरूप आणि संरचना यांवरून त्याचे दोन प्रकार दिसतात : (अ) एक स्तरीय व (आ) अनेक स्तरीय.
(अ) एक स्तरीय अधिस्तर ऊतक : याचे उपप्रकार पुढीलप्रमाणे आहेत :
(अ१) पट्टकीय अथवा शल्की : जमिनीवर बसविण्यात येणाऱ्या फरशीप्रमाणे पातळ आणि कडा एकमेकींस चिकटलेल्या अशा कोशिकांचा पट्टकीय अधिस्तर बनतो. पर्युदर (उदरातील इंद्रियांवर पसरलेला पातळ पडदा), परिफुप्फुस (फुप्फुसांभोवतालचे नाजूक आवरण) वृक्कद्रोण (मूत्रपिंडाच्या नाभिस्थांनी असलेला खोलगट भाग) वगैरे ठिकाणी या प्रकाराचा अधिस्तर दिसतो.
(अ२) घनाकार अधिस्तर : या प्रकारातील कोशिकांची लांबी, रुंदी आणि जाडी सारखीच असते. याचे उदाहरण म्हणजे पचन तंत्रातील आणि श्वसन तंत्रातील सूक्ष्मनलिकांच्या आतल्या पृष्ठावरील कोशिका. (चित्रपत्र ७३, आ.१).
(अ३) स्तंभाकार अधिस्तर : या प्रकारातील कोशिका उंच व जाड असून त्या मानाने त्यांची रूंदी कमी असल्यामुळे त्या स्तंभाकार (खांबासारख्या) दिसतात. पचन तंत्रातील श्लेष्मावरणातील (आतील पृष्ठभागावरील बुळबुळीत अस्तरातील) कोशिका-अधिस्तर या प्रकारचा असतो.
(अ४) पक्ष्माभिकी अधिस्तर : या अधिस्तरातील कोशिका स्तंभाकार अथवा घनाकार असतात. त्यांच्या वरच्या कडांपासून सूक्ष्म असे केस (पक्ष्माभिका) निघाल्यासारखे दिसतात. श्वसन तंत्रातील नलिकांच्या आतील पृष्ठभागावर आणि नाकाच्या आतल्या श्लेष्मावरणाच्या काही भागात हा प्रकार दिसतो. (चित्रपत्र ७३, आ. २).
(अ५) ग्रंथिल अधिस्तर : या अधिस्तरातील कोशिका त्रिकोणाकृती अथवा घनाकार असून त्यांच्या मध्यभागी असलेल्या पोकळीची नलिका बनलेली असते. स्तन, यकृत, धर्म ग्रंथी, अवटू ग्रंथी आणि पोष ग्रंथि या ठिकाणी या प्रकारचा अधिस्तर दिसतो.
(आ) अनेक स्तरीय अधिस्तर ऊतक : याचे उपप्रकार पुढीलप्रमाणे आहेत :
(आ१) परिवर्ती (विविध आकारांच्या कोशिकांचा) अधिस्तर : या अधिस्तरातील कोशिकांचे एकावर एक असे तीन चार थर असून तळातील कोशिका घनाकार वा स्तंभाकार असतात वरच्या थरांतील कोशिका चपट्या असतात. मूत्राशय आणि मूत्रवाहिकांच्या आतल्या पृष्ठावर या प्रकारचा अधिस्तर दिसतो.
(आ३) शृंगित अधिस्तर : या प्रकारातील कोशिका वरच्याप्रमाणेच असून त्याचे वरचे थर कोंढ्यासारखे दिसतात. त्वचेमधील अधिस्तर या प्रकारचा असतो. (चित्रपत्र ७३,आ. ३)
(आ४) स्तरित स्तंभाकार अधिस्तर : या प्रकारातील कोशिका स्तंभाकार असून त्यांचे एकावर एक असे अनेक थर असतात. पुरुष मूत्रमार्गातील मधल्या विभागात हा अधिस्तर दिसतो.
(२) संयोजी ऊतक : कार्यकारी कोशिकांना आधार देऊन त्यांना एकत्र ठेवण्याचे काम करणाऱ्या ऊतकाला संयोजी ऊतक असे म्हणतात. संयोजी ऊतक भ्रूणाच्या मध्यस्तरापासून उत्पन्न होते. कोशिकांच्या विविध कार्यानुरूप या ऊतकाचे अनेक प्रकार दिसतात, तथापि त्यांचे कार्य म्हणजे आधार आणि बंधन हेच असते. बाह्यतः विविधस्वरूप असलेल्या सर्व प्रकारांच्या संयोजी ऊतकांमध्ये पुढील गोष्टी कमीअधिक प्रमाणात सामान्यतः असतात : (अ) आंतरकोशिकाद्रव्य, (आ) ऊतकद्रव्य, (इ) कोशिका, (ई) तंतू.
(अ) आंतर-कोशिकाद्रव्य : हे द्रव्य सर्व प्रकारांच्या संयोजी ऊतकांत असून ते घट्टसर आणि आकाररहित असते. ऊतकातील कोशिका आणि तंतू या घट्ट द्रव्यात बसविल्यासारखे दिसतात. अस्थी आणि उपास्थी (सांध्यांच्या ठिकाणी असलेल्या अस्थींच्या पृष्ठभागावर असणारा लवचिक पदार्थ) या ऊतकांत या द्रव्याचे प्रमाण अधिक असते. हे द्रव्य क्षारीय (अल्कलाइन) रंजकद्रव्ये अल्पप्रमाणात शोषून घेत असल्यामुळे सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने करावयाच्या रंजकपरीक्षेमध्ये ते द्रव्य फिकट निळसर दिसते. संयोजी ऊतकात असलेल्या परिभ्रामी कोशिका या द्रव्यातूनच संचार करतात.
(आ) ऊतकद्रव : सर्व संयोजी ऊतकांमध्ये अगदी थोड्या प्रमाणात द्रव पदार्थ पसरलेला असून रक्त आणि लसीकामार्गाने येणारे पोषक पदार्थ आणि चयापचयामुळे (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक-रासायनिक घडामोडींमुळे) उत्पन्न होणारे निरुपयोगी पदार्थ यांची देवघेव या ऊतकद्रवामार्फतच चालते.
(इ) कोशिका : विविध कार्ये करणाऱ्या अनेक प्रकारांच्या कोशिका संयोजी ऊतकांत असतात. त्यांपैकी काही महत्त्वाच्या कोशिकांचे येथे त्रोटक वर्णन केले आहे.
(इ१) तंतुजनक कोशिका : या कोशिका सर्व प्रकारच्या संयोजी ऊतकांत प्रकर्षाने आढळतात. या कोशिका अगदी पातळ असून त्यांच्या कडा वेड्यावाकड्या असतात. या लंबगोलाकृती असून त्यांतील जीवद्रव्य कणयुक्त असते. या कोशिका विविधाकारी आणि शाखित असून शेजारच्या कोशिकांच्या शाखा एकमेकींस मिळतात. श्लेष्मजन (एक प्रकारच्या बुळबुळीत पदार्थापासून म्हणजे श्लेष्मापासून तयार झालेले) आणि प्रत्यास्थ (लवचिक) तंतूंची उत्पत्ती या कोशिकांपासून होते. कोशिकांचे जीवद्रव्य रंजकद्रव्ये शोषून घेऊ शकत असल्यामुळे सूक्ष्मदर्शकाने ह्या कोशिका स्पष्ट दिसू शकतात.
(इ२) भ्रमणक्षम कोशिका : या प्रकारच्या कोशिकांना जालिकाजनक अथवा बृहत्कोशिका असेही म्हणतात. या कोशिकांना संयोजी ऊतकांत फार महत्त्वाचे स्थान आहे. या कोशिका मोठ्या आकारमानाच्या आणि शाखित असतात. त्यांची केंद्रके गोल किंवा लंबगोल असून त्यांतील जीवद्रव्य क्षारीय रंजकद्रव्ये शोषून घेऊ शकते. त्याशिवाय जीवद्रव्यामध्ये अनेक कण असून ते कणही रंजकद्रव्ये अधिक प्रमाणात शोषून घेऊ शकतात. या कोशिका चलनक्षम असून जरूरीप्रमाणे त्या एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकतात. त्यांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे निरुपयोगी आणि हानिकारक पदार्थाचे भक्षण करून ते नाहीसे करणे हे होय. शरीरात अनेक ठिकाणी दिसणाऱ्या जालिका अंतःस्तरीय तंत्रातील कोशिका या जातीच्या असतात.
(इ३) नीलरंजकाकर्षी (निळा रंग शोषणाऱ्या) कोशिका : रक्तात नेहमी दिसणाऱ्या नीलरंजी कोशिकांसारख्याच या कोशिका दिसतात. जेथे जेथे वसा (भेद) संचय अधिक प्रमाणात होतो तेथे तेथे या प्रकारच्या कोशिका अधिक प्रमाणात दिसतात. या कोशिका गोल किंवा लांबट आकाराच्या असून त्यांच्या जीवद्रव्यातील कण नीलरंजक द्रव्ये शोषून घेऊ शकतात.
(इ४) लसीका कोशिका : या कोशिका रक्तातील लसीका कोशिकांसारख्याच गोल आकाराच्या असतात. त्यांची केंद्रकेही गोल असून मोठी असतात व त्यांच्याभोवती जीवद्रव्य पसरलेले असते. जीवद्रव्यात कण नसतात.
(इ५) रंगद्रव्ययुक्त कोशिका : त्वचा, डोळ्यातील कनीनिका (स्वच्छ मंडळाच्या पाठीमागे असलेले गोलाकार रंगद्रव्ययुक्त पटल) वगैरे ठिकाणी या जातीच्या कोशिका आढळतात. या कोशिकांमध्ये असलेले रंगद्रव्य प्रकाश, हवेतील आर्द्रता वगैरे कारणांमुळे एका जागी गोळा झाल्यासारखे दिसते. अन्यथा ते जीवद्रव्यात सर्वत्र पसरलेले असते. खालच्या वर्गातील प्राण्यांच्या त्वचेचा रंग ऋतुमानाप्रमाणे बदलतो त्याला या रंगद्रव्ययुक्त कोशिकाच कारणीभूत असतात.
(इ६) वसासंचयी कोशिका : शरीरात जेथे वसा साठून राहते तेथे या कोशिका प्रामुख्याने दिसतात. या कोशिकांच्या जीवद्रव्यामध्ये प्रथम वसेचे बारीक बारीक थेंब जमतात. हे थेंब एकत्र आल्यानंतर कोशिकाद्रव्य वसेने भरल्यासारखे दिसू लागून कोशिकांची केंद्रके आणि जीवद्रव्य एका बाजूला दामटून बसल्यासारखे दिसते. बाकीचा सर्व भाग वसेने व्यापिलेला असतो.
संयोजी ऊतकांचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत : (अ) अवकाशी, (आ) वसात्मक, (इ) जालिकात्मक (जाळीसारखे) (ई) प्रत्यास्थ, (उ) शुभ्रतंतुमय, (ऊ) अस्थी, (ए) उपास्थी, (ऐ) रक्त आणि लसीका.
(अ)अवकाशी ऊतक : त्वचेच्या खाली आणि सैल इंद्रियांच्या ठिकाणी हे ऊतक आढळते. या ऊतकात आंतर-कोशिकाद्रव्य, ऊतकद्रव, कोशिका आणि तंतू हे चारही प्रकार एकमेकांपासून दूरदूर असल्यामुळे या ऊतकाला पोकळपणा आल्यासारखा वाटतो.
(आ) वसात्मक ऊतक : या प्रकारच्या ऊतकातील कोशिकांत वसा भरून राहिल्यासारखी असते त्यामुळे कोशिकेचे जीवद्रव्य आणि केंद्रक एका बाजूस ढकलल्यासारखे दिसतात. या वसायुक्त कोशिकांना आधारभूत असे विणलेल्या टोपलीसारखे जाळे असून ते श्लेष्मजन तंतूंचे बनलेले असते. वसात्मक ऊतक उदरभित्तीच्या पुढच्या भागात त्वचेखाली तसेच अस्थिमज्जा (लांब अस्थींच्या मधल्या पोकळ्यांत असणारे संयोजी ऊतक). हृदय आणि वृक्क यांच्याभोवती अधिक प्रमाणात आढळते. या वसात्मक ऊतकाच्या थरामुळे व त्यामध्ये होत असलेल्या रक्तप्रवाहामुळे शरीराचे तपमान नियंत्रित होऊ शकते. शरीरातील अस्थी वगैरे कारणांनी उंच दिसणाऱ्या भागावर या ऊतकांचा थर असल्यामुळे शरीराला सौष्ठव प्राप्त होते. या ऊतकातील कोशिका अतिसूक्ष्म नीला आणि केशिका (केसासारख्या बारीक सूक्ष्म नलिका) यांच्या सान्निध्यात असतात.
(इ) जालिका ऊतक : या प्रकारच्या ऊतकात जालिकातंतूंचे प्रमाण अधिक असून तेथे भक्षिकोशिका (निरुपयोगी व हानिकारक पदार्थ पचवून टाकणाऱ्या कोशिका) जास्त असतात. प्लीहा, लसीका ग्रंथी, अस्थिमज्जा वगैरे ठिकाणी हे ऊतक अधिक असून भ्रमणक्षम अशा भक्षिकोशिकांमुळे हानिकारक बाह्य व निरुपयोगी पदार्थ गिळून पचवून टाकण्याचे कार्य या ऊतकात होत असते. (चित्रपत्र ७३, आ. ४).
(ई) प्रत्यास्थ ऊतक : रक्तवाहिन्या, श्वासनालिका, फुप्फुसे आणि कंडरा (दोरी, पट्टा वा पटल अशा स्वरूपाच्या ज्या तंतुमय ऊतकाने स्नायू हाडांच्या सांगाड्याला जोडलेले असतात) या ठिकाणी प्रत्यास्थ ऊतक अधिक प्रमाणात दिसते. या ऊतकातील प्रत्यास्थ तंतूंच्या आकुंचन प्रसरणामुळे त्या इंद्रियातील हालचाल होऊ शकते. विशेषतः रक्तवाहिन्यांच्या भित्तींमध्ये प्रत्यास्थ तंतू अधिक प्रमाणात असल्यामुळे, हृदयाच्या आकुंचनामुळे रक्त मूलरोहिणीमध्ये गेल्याबरोबर ती रोहिणी व तिच्या शाखा विस्तारित होतात, परंतु प्रत्यास्थ तंतूंच्या स्थितिस्थापक गुणामुळे ह्या हळूहळू आकुंचित होऊन पूर्वस्थितीवर येतात. या ऊतकाला ‘पीत-तंतू ऊतक’ असेही म्हणतात. (चित्रपत्र ७३, आ. ५)
(उ) शुभ्रतंतुमय ऊतक : शरीरातील सर्व इंद्रियांत या ऊतकाचे प्रमाण सर्वाधिक दिसते. या उतकातील पांढऱ्या तंतूंचे जुडगे बनून त्यांच्यामुळे विविध इंद्रियांना आधार मिळतो व टणकपणा येतो. कंडरा, परिहृदय (हृदयाभोवतील आवरण), परिफुप्फुस, संधिबंध, परिमस्तिष्क (मेंदू आणि मज्जारज्जू यांना आच्छादणारे संयोजी ऊतक) वगैरे ठिकाणी या ऊतकामुळे आवरणाला घट्टपणा व काठिण्य येते.
(ऊ) अस्थिऊतक : अस्थि अतिशय कठीण असल्या तरी त्या संयोजी ऊतक प्रकारच आहेत. या ऊतकांतील तंतू आणि कोशिका यांमध्ये कॅल्शियमाचे निक्षेपण झाल्यामुळे (साचल्यामुळे) अस्थी कठीण बनतात. सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने अस्थींची सूक्ष्म रचना दिसू शकते. केंद्राजवळ एक सूक्ष्म नलिका असते. तीतून अस्थीचे पोषण करणारी रक्तवाहिनी जाते. यामध्यभागी असलेल्या पोकळ जागेभोवती अनेक वलयाकार पटलिका (पापुद्यांचे थर) असतात. त्या पटलिकांमध्ये अनेक रिक्तीका म्हणजे मोकळ्या जागा दिसतात. या रिक्तिकांमध्ये जिवंतपणी अस्थिकोशिका असून लहानलहान नलिकांमार्गे त्यांचा एकमेकींशी संबंध येतो. ही सर्व रचना दंडगोल आकाराची असून अस्थीच्या लंब कक्षेत व एकमेंकींशी शाखांच्या योगे त्या संयुक्त असतात [→ अस्थि].
(ए) उपास्थि-ऊतक : उपास्थी टणक पण लवचिक असल्यामुळे सांधे, वक्षस्थल, स्वरयंत्र, श्वासनाल, नाक, कान वगैरे ठिकाणी आढळतात. उपास्थींच्या कोशिका दोन, चार अथवा आठ अशा समूहांनी दिसतात. उपास्थींच्या आधार द्रव्यावरून त्यांचे (१) काचाभ (काचेसारख्या), (२) श्वेततंतुमय आणि (३) प्रत्यास्थ असे तीन प्रकार कल्पिलेले आहेत [→ उपास्थि].
(ऐ) रक्त आणि लसीका : हे संयोजी ऊतकप्रकारच आहेत मात्र या ऊतकांतील आंतरकोशिकाद्रव्य द्रवरूप असल्यामुळे ती दोन्ही ऊतके प्रवाही असतात [→ रक्त लसीका तंत्र].
(३) स्नायू ऊतक : स्नायू हे महत्त्वाचे ऊतक असून त्याचा मुख्य गुणधर्म आकुंचन –प्रसरण हा आहे. या ऊतकामुळेच शरीराची आणि अंतस्त्यांतील (छाती आणि उदर यांमध्ये असलेल्या हृदय, यकृत, आतडी इ. इंद्रियांतील) सर्व हालचाली होऊ शकतात. स्नायूलाच मांस असे म्हणतात. मानवी शरीराच्या एकूण वजनापैकी जवळजवळ निम्मे वजन स्नायूंमुळे असते.
डोळ्यातील कनीनिकेतील स्नायू आणि त्वचेतील स्नायू यांखेरीज शरीरातील सर्व स्नायू भ्रूणमध्यस्तरापासून उत्पन्न होतात. स्नायूंचे तीन प्रकार आहेत : (अ) रेखित, (आ) अरेखित आणि (इ) हृद्यस्नायू
(अ) रेखित स्नायू : या प्रकारच्या स्नायूंच्या प्रत्येक तंतूवर आडव्या रेखा असल्यासारख्या दिसतात. या स्नायूवर इच्छाशक्तीचे नियंत्रण असल्यामुळे त्यांना इच्छानुवर्ती, रेखित अथवा कंकालीय स्नायू असे म्हणतात. या स्नायूंचे मूलघटक म्हणजे सूक्ष्म आणि लांबट आकाराचे तंतू असून त्या तंतूंची लांबी ०·५ मिमी. पासून ३० सेंमी. पर्यंत असू शकते. हा प्रत्येक तंतू म्हणेज स्नायुकोशिका असून त्याला अनेक केंद्रके असतात. या कोशिकांचे जीवद्रव्य प्रथिनात्मक असून त्याच्याभोवती पातळ असे आवरण असते. अनेक तंतूंचे जुडगे बनलेले असून प्रत्येक जुडग्याभोवती संयोजी ऊतकाचे आवरण असते. अनेक जुडगे एकत्र बांधले जाऊन त्या सर्वांचा मिळून स्नायू होतो. सर्व स्नायूंच्या भोवतीही तंत्वात्मक जाड आवरण असते. प्रत्येक स्नायूच्या दोन्ही टोकांवर कंडरा असून या कंडरांमुळे स्नायू अस्थीला घट्टले बांधलेले असतात. स्नायूच्या आकुंचनामुळे सांध्यांची हालचाल तरफांच्या तत्त्वाप्रमाणे होते. (रेखित स्नायूंच्या सूक्ष्म रचनेकरिता चित्रपत्र ७३, आ. ६ पहा). रेखित स्नायू जाड, लांब अथवा आखूड व चपटे असू शकतात.
(आ) अरेखित स्नायू : ह्या प्रकारच्या स्नायूंवर रेखा दिसत नाहीत व त्यांच्यावर काही अपवाद सोडल्यास इच्छेचे नियंत्रण चालू शकत नाही म्हणून या स्नायूंना अरेखित, अनिच्छावर्ती अथवा अंतस्त्य स्नायू म्हणतात. या स्नायूंचे मूळ घटक लांबट आकाराचे असून त्यांच्या मध्यभागी लंबाकृती केंद्रक असते. दोन्ही टोके निमुळती असतात. या स्नायूंचे लांब व गोलाकार असे एकावर एक थर असतात. त्यांच्या आकुंचनामुळे रक्तवाहिन्या, सर्व स्राववाहिन्या, आंत्र, अन्ननलिका आणि श्वासनलिका यांमधील हालचाली होतात. या हालचाली संथपणे होतात व त्यामुळे पोकळ इंद्रियातील पदार्थ क्रमसंकोचाने (क्रमाक्रमाने होत जाणाऱ्या आकुंचनाने) पुढे ढकलले जातात.
(इ) हृद्स्नायू : या स्नायूचे मूलघटक जाड आणि शाखित असून त्यांच्यावर रेखा दिसतात. शाखा एकमेकींत इतक्या गुंतलेल्या असतात की, या ऊतकाचे स्वरूप बहुकेंद्रकी (अनेक केंद्रके असलेल्या परंतु ओळखण्याजोग्या कोशिका भित्ती नसलेल्या) कोशिकांसारखे दिसते. या स्नायूचा विशेष गुण म्हणजे त्याचे आकुंचन –प्रसरण स्वयंनियंत्रित असते. हृदयाचे स्पंदन आणि रक्तपरिवहन हे या स्नायूंचे विशेष कार्य आहे. हृदयाच्या अलिंद (अशुद्ध रक्ताचा कप्पा) आणि निलयाच्या (शुद्ध रक्ताच्या कप्प्याच्या) भित्तींमध्ये विशिष्ट अशी संवाहक ऊतकांची योजना असल्यामुळे हृदयाचा आकुंचन तरंग त्याच्या उगमापासून सर्व हृद्स्नायूंपर्यत पसरतो. हृद्स्नायू जरी स्वयंनियंत्रित असला, तरी त्याच्यावर अनुकंपी व परानुकंपी तंत्रिकांच्या [→ तंत्रिका तंत्र] उत्तेजनाचा परिणाम होऊ शकतो. (चित्रपत्र ७३, आ. ७) [→ स्नायु तंत्र].
(४) तंत्रिका ऊतक : संवेदना (बाह्य परिस्थितीचे ज्ञान मेंदूकडे पोहोचविणे) आणि प्रेरणावहन (स्नायूंना योग्य ते कार्य करण्याची प्रेरणा देणे) ही कार्ये करणाऱ्या ऊतकाला तंत्रिका ऊतक असे म्हणतात. तंत्रिका तंत्राचे एकक म्हणजे तंत्रिका कोशिका तंत्रिका कोशिका व त्यांना आधार देणाऱ्या तंत्रिकाधार कोशिकांचे मिळून तंत्रिका ऊतक होते. शरीराच्या बाह्य स्थितीनुरूप शरीराच्या क्रिया करण्याचे नियंत्रण या ऊतकामुळे होते. बाह्य परिस्थितीचे ज्ञान करून देणाऱ्या तंत्रिका कोशिकांना अभिवाही (मेंदूकडे जाणाऱ्या) कोशिका असे म्हणतात आणि त्या परिस्थितीनुरूप शरीराची चलनवलनादी कार्ये घडविण्यासाठी मस्तिष्काकडून (मेंदूकडून) प्रेरणा नेणाऱ्या तंत्रिका कोशिकांना अपवाही (मेंदूकडून स्नायूंकडे जाणाऱ्या) कोशिका असे म्हणतात. ज्या तंत्रिका कोशिकांच्या दोन्ही बाजूंपासून प्रवर्ध (फाटे) निघतात त्यांना द्विध्रुवी आणि ज्या कोशिकांच्या एकाच बाजूपासून प्रवर्ध निघतात त्यांना एकध्रुवी कोशिका असे म्हणतात.
सर्व तंत्रिका कोशिकांची संरचना सारखीच असते. या कोशिकांचे दोन भाग दिसतात म्हणजे कोशिकाकाय (शरीर) आणि दुसरा कोशिकातंतू, तंत्रिका कोशिकाकाय हे बहुधा मस्तिष्कातील, मेरुरज्जूतील (मेंदूच्या मागील बाजूने पाठीच्या कण्यातून जाणाऱ्या तंत्रिकांच्या दोरीसारख्या जुडग्यातील, मज्जारज्जूतील) आणि तंत्रिका पुंजातील धूसर क्षेत्रात असून तंत्रिका कोशिकातंतू तेथील पांढऱ्या क्षेत्रात असतात.
तंत्रिका कोशिकांचे आकार आणि परिमाण विविध प्रकारांचे असतात. काही कोशिका प्रचंड आकाराच्या, तर काही अगदी लहान असतात. काही गोलाकार, तर काही त्रिकोणाकृती असतात. प्रत्येक कोशिकेपासून निदान एक तरी मोठा प्रवर्ध निघतो. त्याला अक्षदंड असे म्हणतात. या अक्षदंडामार्फत कोशिकाकायेतून प्रेरणा बाहेर जाते. याशिवाय बहुतेक सर्व कोशिकांना दुसरे लहान लहान असे प्रवर्ध असून त्यांना अनेक शाखोपशाखा असतात. त्यांना अभिवाही प्रवर्ध असे म्हणतात.
(अ) तंत्रिका कोशिकाकाय : तंत्रिका कोशिका गोलाकार, त्रिकोणाकृत्री अथवा तर्कूच्या आकाराच्या असून त्यांच्या मध्यभागी ठळक असे केंद्रक असते.
(अ१) केंद्रकाच्या मध्यभागी केंद्रिका (एक गोलाकार पिंड) असून कोशिकेच्या जीवद्रव्यात पुष्कळ कण दिसतात. त्यांना निस्ल कण (निस्ल या शास्त्रज्ञांच्या नावावरून) असे नाव असून हे कण तंत्रिकाप्रवर्धांतही गेलेले दिसतात मात्र अक्षदंडाच्या उगमापासूनच ते नाहीसे होतात.
(अ२) याशिवाय कोशिकाद्रव्यात तंत्रिका तंतूंचे जाळे दिसते. हे तंतू अक्षदंड आणि कोशिकाप्रवर्धातून कोशिकाकायेमध्ये गेल्यासारखे दिसतात व त्या ठिकाणी त्यांचे जाळेच बनलेले असते.
(अ३) कोशिकेच्या जीवद्रव्यात इतस्ततः पसरलेले बारीक सूत्ररूपी (सुतासारखे बारीक) कण दिसतात त्यांना सूत्र कण असे नाव असून त्यांच्यामुळे कोशिकेतील रासायनिक घडामोडी होत असाव्या असेमानले जाते.
(अ४) कोशिकाद्रव्यामध्ये केंद्रकाच्या भोवती आणि तंत्रिकाप्रवर्धापर्यंत जाणाऱ्या या संरचनेला गॉल्जी यंत्रणा (गॉल्जी या शास्त्रज्ञांच्या नावावरून) म्हणतात. या यंत्रणेचे कार्ये काय असावे याबद्दल अद्यापि शास्त्रज्ञांत एकमत झालेले नाही.
(अ५) काही तंत्रिका कोशिकांच्या केंद्रकाच्या एका बाजूस रंगद्रव्यकण दिसतात. त्यांच्या संरचनेमध्ये वसात्मक पदार्थ असावे असे मानतात. वयोमानाप्रमाणे हे रंगद्रव्यकण वाढत जातात.
(आ) तंत्रिकाप्रवर्ध : अक्षदंडाभोवती वसावरण असून त्याच्या बाहेर तंत्रिकाकला असून अक्षदंडाची लांबी काही मायक्रो (दशलक्षांश) मिमी. पासून १-२ मी. पर्यंत असू शकते. या अक्षदंडाच्या पृष्ठाभागावर संकुचित स्थाने दिसतात त्यांना ‘रांव्ह्ये पर्वसंकोच’ असे नाव आहे.
या पर्वसंकोचस्थली तंत्रिकाप्रवर्धाची पुनर्निर्मिती होऊ शकते. तंत्रिका कोशिकाच जर नष्ट झाली, तर पुनर्निर्मिती होऊ शकत नाही.
तंत्रिकाप्रवर्ध तंत्रिका कोशिकेपासून निघाल्याबरोबर त्याच्या अनेक शाखा-उपशाखा होतात व त्या शेजारच्या तंत्रिका कोशिका अक्षदंडाशी समागम करतात. त्या समागमस्थानाला ‘उपागमस्थान’ असे म्हणतात. या मार्गाने संवेदना आणि प्रेरणा एका तंत्रिका कोशिकेपासून दुसऱ्या कोशिकेपर्यंत पोहोचविण्यात येते व त्यामुळे तंत्रिका कोशिकेचे उद्दीपन होऊन संवेदना अथवा प्रेरणा उत्पन्न होऊन परिस्थितीसापेक्ष हालचाली घडून येतात [→तंत्रिका तंत्र].
संदर्भ : 1. Keele, C.A. Neil, E. (Revised by), Samson Wright’s Applied Physiology, London, 1962.
2. Morrison, T.F. Cornet, F.D. Tether, J, E. Human Physiology, New York, 1959.
ढमढेरे, वा.रा. आपटे, ना. रा.
“