ऊरुक : (ईरेक). प्राचीन सुमेरियन नगर. हे आग्नेय इराकमधील मुंतफिक प्रांतात, युफ्रेटीसच्या डाव्या तीराजवळ, नासिरिया शहरापासून वीस किलोमीटरवर वसले असून, सध्या ते वरकॅ नावाने ओळखले जाते. प्राचीन सुमेरियातील हे सर्वांत मोठे शहर असून याच्या सभोवती विशिष्ट प्रकारच्या विटांचा भक्कम तट उभारलेला होता. नंतरच्या कालखंडात ही दक्षिण बॅबिलोनियाची राजधानी होती. येथील उत्खननात निघालेले इ. स. पू. ४,००० मधील श्वेतमंदिर, मातीची व दगडाची भांडीकुंडी, लाकडी वस्तू, मीनाकाम, सोने, चांदी, तांबे, वगैरे धातंचे ठसे, प्राण्यांचे व देवदेवतांचे मुखवटे, संगमरवरावरील नक्षीकाम, विटांवरील लेखन इ. बाबी याच्या पुरातनकालीन प्रगतीची साक्ष पटवितात.
जोशी, चंद्रहास