ऊतकमृत्यु : (नेक्रोसीस). सजीव शरीरात असतानाच ऊतकाच्या (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या म्हणजे पेशींच्या समूहाच्या) काही भागांतील कोशिकांचा नाश झाल्यास त्या अवस्थेला ‘ऊतकमृत्यू’ असे म्हणतात. अशा मृत झालेल्या भागातील कोशिका आणि प्रयोगशाळेत पहाण्यात येणार्‍या कोशिका यांमध्ये काही स्वरूपभेद दिसत नाही. कारण दोन्ही प्रकारांच्या कोशिका मृत झाल्यानंतरच पाहण्यात येतात. ऊतकमृत्यू झालेल्या कोशिका शरीरात असतानाच मृत होऊन त्यांच्या स्वरूपात झालेली विक्रिया त्या कोशिका सजीव शरीरात असतानाच झालेली असते. जिवंत स्थितीत शरीराबाहेर काढलेल्या आणि नंतर मृत झालेल्या कोशिकांमध्येही अशीच विक्रिया झालेली असते. अशी विक्रिया कोशिकांमध्ये असणार्‍या एंझाइमांमुळे (सजीवांमध्ये रासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणार्‍या प्रथिनयुक्त पदार्थांमुळे) होते. प्राकृतावस्थेत (सामान्य अवस्थेत) ही एंझाइमे कोशिकांना मिळणार्‍या अन्नपदार्थावर विक्रिया करून ते पदार्थ कोशिकांना उपयुक्त करण्याचे कार्य करतात, परंतु कोशिका असमर्थ अथवा मृत झाल्यास तीच एंझाइमे अशा कोशिकाशरीरातील भागांवर विक्रिया करू लागतात. त्यामुळे कोशिकाशरीर विरघळू लागते. हे विरघळण्याचे कार्य कोशिकांतर्गत एंझाइमेच करीत असल्यामुळे त्याला आत्मविलयन असे म्हणतात.

एंझाइमांची ही विक्रिया मुख्यत : कोशिकाकेंद्रकातील रंजकशील (रंगविता येणार्‍या) द्रव्यामध्ये असलेल्या केंद्रकप्रथिनांवर होते. हे द्रव्य कोशिकांमधील अत्यंत महत्त्वाचा भाग असून त्यामध्ये झालेल्या विक्रियेचा परिणाम कोशिकेच्या सर्व भागांवर होतो. कोशिकांचे आत्मविलयन झाल्यामुळे जे पदार्थ उत्पन्न होतात ते संचरणशील असतात म्हणून ते आजूबाजूच्या द्रवांत मिसळून शेवटी कोशिका दिसेनासी होते.

कारणे : (१) रक्तपुरवठ्याचा लोप : काही कारणाने ऊतकाला मिळणार्‍या रक्ताचा पुरवठा बंद पडला तर कोशिकांना जरूर असलेले अन्नपदार्थ आणि ऑक्सिजन बंद होऊन कोशिकांचा ऊतकमृत्यू होतो. रक्ताचा पुरवठा बंद पडल्यानंतर विविध ऊतकांतील कोशिकांची जिवंत राहण्याची शक्ती कमी-अधिक काळपर्यंत असते. उदा., वृक्काचा (मूत्रपिंडाचा) रक्तपुरवठा बंद पडला, तर वृक्ककोशिकांचा ऊतकमृत्यू त्वरित होतो तर संयोजी (कार्यकारी कोशिकांना आधार देऊन त्यांना एकत्र ठेवणार्‍या) ऊतकांतील कोशिका पुष्कळ वेळ तग धरू शकतात.

(२) जंतुजन्य विषे : जंतुविष हे ऊतकमृत्यूचे सर्वाधिक महत्त्वाचे कारण आहे. जंतुविषांचा कोशिकांवर विपरीत परिणाम होतो तसाच त्या कोशिकांना रक्ताचा पुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांवरही होतो. त्यामुळे रक्तवाहिन्या बंद पडून कोशिकांना अन्नपदार्थ आणि ऑक्सिजन मिळणे बंद पडते. जंतुविषे अतितीव्र असतील तर कोशिकांचा त्वरित ऊतकमृत्यू होतो, परंतु ती सापेक्षतया सौम्य असतील तर कोशिकांचा मृत्यू न होता तेथे शोथ (दाहयुक्त सूज) उत्पन्न होतो.

(३) भौतिक आणि रासायनिक पदार्थ : अनेक भौतिक आणि रासायनिक क्षोभकांमुळेही ऊतकमृत्यू होऊ शकतो. अतिशय उष्ण तापमान, आघात, वीज, क्ष-किरण, रेडियम व इतर किरणोत्सर्गी (कण वा किरण बाहेर टाकणारी) द्रव्ये, दाब वगैरे भौतिक कारणे आणि तीव्र अम्‍ले व क्षार (अल्कली), विषे वगैरे रासायनिक कारणे ऊतकमृत्यू घडवू शकतात. साधारणपणे ४५० से. इतक्या तापमानामुळे ऊतकमृत्यू होतो. त्यामानाने अतिशय थंडीने ऊतकमृत्यूचा संभव कमी असतो. उपचार म्हणून केलेल्या किरणोत्सर्गामुळेही ऊतकमृत्यू होतो.

ऊतकमृत्यूमुळे दिसणारी रचनात्मक विक्रिया : कोशिकाशरीर आणि कोशिकाकेंद्र यांमध्ये दिसणार्‍या विक्रियेमुळे ऊतकमृत्यू झालेल्या कोशिका ओळखता येतात. कोशिकाशरीरातील जीवद्रव्याचे मूळचे जालिकासमूह (जाळीसारखे) स्वरूप नाहीसे होऊन ते सारवल्यासारखे दिसते. कोशिकाभित्ती अस्पष्ट होऊन कोशिका फुगल्यासारख्या दिसू लागतात. कोशिकाकेंद्रकात तीन प्रकारांचे बदल दिसतात : (१) केंद्रकातील रंजकशील द्रव्य विरघळून जाते व त्यामुळे केंद्रक हळूहळू दिसेनासे होते. या प्रकाराला केंद्रक-विलयन असे म्हणतात. (२) केंद्रकाचे लहानलहान तुकडे पडल्यासारखे दिसतात. या प्रकाराला केंद्रक-विभजन असे म्हणतात. (३) या प्रकारात केंद्रकातील सर्व द्रव्य एकत्र गोळा झाल्यासारखे होऊन तो गोळा अतिरंजकशील होतो, या प्रकाराला केंद्रक-घनरंजन असे म्हणतात.


ऊतकमृत्यू झालेल्या ऊतकाचे स्थूलस्वरूप मुख्यतः चार प्रकरांचे दिसते : (१) क्लथनस्वरूपी, (२) द्रवस्वरूपी, (३) पनिरीस्वरूपी आणि (४) वसास्वरूपी.

(१) क्लथनस्वरूपी : या प्रकारात ग्रस्त भाग कोरडा, एकस्वरूपी आणि थिजल्यासारखा दिसतो. कोशिकांतर्गत जीवद्रव्य गोठल्यासारखे दिसते. वृक्क, प्लीहा वगैरे इंद्रियांत एंझाइमांच्या विक्रियेमुळे कोशिका नाहीशा होऊन त्यांचा फक्त सांगाडाच कायम दिसतो. हे स्वरूप पुष्कळ काळापर्यंत राहते परंतु हळूहळू एंझाइमांच्या विक्रियेमुळे तो सर्व भाग शोषिला जातो.

(२) द्रवस्वरूपी : या प्रकारात कोशिका द्रवस्वरूपी होऊन तो द्रव नंतर शोषिला जातो, क्वचित त्या ठिकाणी द्रव साठलेल्या द्रवार्बुदासारखे (द्रवयुक्त गाठीसारखे) दिसू लागते, अशी क्रिया तंत्रिका तंत्रात (मज्‍जासंस्थेत) विशेषत्वाने दिसून येते.

(३) पनिरीस्वरूपी : सर्व ग्रस्त कोशिकांचा मिळून घट्ट, रवाळ असा रूपहीन पदार्थ बनतो. त्यातील विविध भाग वेगवेगळे दिसत नाहीत. अशा स्वरूपाचा ऊतकमृत्यू क्षय, फिरंग (उपदंश) वगैरे रोगांत दिसतो. हा पनीरसद्दश पदार्थ पुष्कळ काळ तसाच राहू शकतो. मात्र जंतुसंसर्ग झाला तर पांढर्‍या कोशिका आणि भक्षिकोशिका (सूक्ष्मजीव वा इतर कोशिका व शरीरबाह्य कण यांचे भक्षण करणार्‍या कोशिका) तेथे आल्यामुळे त्याचे द्रवात रूपांतर होते.  क्षयरोगाच्या तिसर्‍या अवस्थेमध्ये फुप्फुसांत होणारी विवरे या पद्धतीने उत्पन्न होतात.

(४) वसास्वरूपी :अग्निपिंडाला शोथ अथवा इजा झाली, तर अग्‍निपिंडात उत्पन्न होणारा पाचकरस त्या अंतस्त्याच्या (इंद्रियाच्या) बाहेर पडून आजूबाजूच्या वसेवर त्याची क्रिया झाल्यामुळे वसाकोशिकांचा ऊतकमृत्यू होऊन ती पांढरट व थिजल्यासारथी दिसते. त्वचा, स्तन वगैरे भागांत असाच वसास्वरूपी ऊतकमृत्यू झालेला दिसतो.

बापट, श्री. ह.