ऊटकमंड : (ऊटी). तमिळनाडू राज्यातील निलगिरी जिल्ह्याचे मुख्य ठाणे आणि हवा खाण्याचे प्रसिद्ध ठिकाण. लोकसंख्या ६३,३१० (१९७१). पश्चिम घाटाच्या दोडाबेट्टा फाट्यांनी बनविलेल्या पठारावर, समुद्रसपाटीपासून २,२८७ मी. उंचीवर हे वसले आहे. ऊटी सडकेने म्हैसूरहून १६१ किमी. दक्षिणेस व कोईमतूरहून ८८ किमी. वायव्येस आहे. दक्षिणरेल्वेच्या मेट्टुपलायम स्थानकापासून ऊटीपर्यंत छोटी रेल्वे असून ह्या मार्गावरील सृष्टिशोभा विलोभनीय आहे. गर्द झाडीच्या पर्वतशिखरांनी वेढलेल्या या पठाराचा शोध १८१२ मध्ये इंग्रज भूमापकांना लागला. तपमान कमाल २०० से., किमान ९० से., वार्षिक पर्जन्य ६०–७० सेंमी., पठाराच्या दक्षिणेकडील भाग इंग्‍लंडच्या ससेक्स परगण्यातील डाउन्ससारखा असल्यामुळे इंग्रजांनी ह्या ठिकाणाला ‘दक्षिणची राणी’ बनविले. ऊटीचे तीन किमी. लांबीचे सरोवर १८२३–२५ दरम्यान बांधले गेले. सेंट टॉमस व सेंट स्टीफन चर्च, राजभवन, गोल्फ व टेनिस मैदाने, रेसकोर्स, वनस्पतिउद्यान, शिकारीसाठी राखीव जंगले, नौकाविहार, श्रीमंत लोकांचे आलिशान बंगले, सर्व सोयींनी युक्त हॉटेले, १८५८ मध्ये स्थापन झालेले लव्हडेलचे विद्यालय, १९५५ मध्ये स्थापन झालेले महाविद्यालय इ. सुखसोयींमुळे ऊटीचे महत्त्व वाढले. कुन्नूर, केटी, कोटागिरी आणि वेलिंग्टन ही ऊटीच्या परिसरातील आणखी हवा खाण्याची ठिकाणे. निलगिरीवरील कोयनेलसाठी वाढविण्यात येणारी सिंकोना झाडे आणि निलगिरी झाडे यांसाठी ऊटी-परिसर उद्योगकेंद्रही बनला आहे. मानवशास्त्रदृष्ट्या महत्त्वाच्या तोडा जमातीचे राहण्याचे निलगिरी हे एक ठिकाण असल्यामुळे ऊटीला त्या दृष्टीनेही महत्त्व आहे. आसपासच्या डोंगरांवरून पाण्याचे अनेक ओहळ येतात म्हणून या ठिकाणाला उदधिमंडल-उदकमंडल म्हणत, त्यावरून ऊटकमंड हे नाव पडले असावे.

शाह, र. रू.