एडवर्ड, पहिला : (१७ जून १२३९ – ७ जुलै १३०७). इंग्लंडमधील सॅक्सनांपैकी एक प्रसिद्ध राजा. तिसरा हेन्री याचा जेष्ठ पुत्र. एडवर्ड १२७२ ते १३०७ ह्या काळात इंग्लंडच्या गादीवर होता. आपल्या वडिलांच्या कारकीर्दीत त्याने ईव्हशामच्या वेल्स लोकांबरोबरच्या लढाईत महत्त्वपूर्ण विजय मिळविला होता. त्याने न्यायदान पद्धतीत अनेक सुधारणा करून राजसत्ता प्रबल करण्यासाठी विविध कायदे केले. स्कॉटलंड जिंकण्याचे त्याचे प्रयत्न फसले, तरी वेल्स इंग्लंडला जोडण्यात तो यशस्वी झाला. योध्दा व मुत्सद्दी म्हणून त्याची योग्यता वादातीत आहे. १२९५ मध्ये नमुनेदार संसद (मॉडेल पार्लमेंट) भरवून त्याने इंग्लंडमध्ये संसदीय शासनाची पद्धत सुरू केली. ही त्याची महत्त्वाची भरीव कामगिरी होय.
ओक, द. ह.