एजवर्थ, फ्रान्सिस इसीड्रो : (८ फेब्रुवारी १८४५- १३ फेब्रुवारी १९२६). नामवंत ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ. तो एजवर्थस्‌टाउन, आयर्लंड येथे जन्मला. शिक्षण डब्लिन व ऑक्सफर्ड येथे. लंडनमध्ये काही वर्षे वकिली. त्यानंतर किंग्ज कॉलेज, ऑक्सफर्ड या ठिकाणी प्रथम तर्कशास्त्र व नंतर अर्थशास्त्र विषयांचे अध्यापन. ऑल सोल्स कॉलेजचा अधिछात्र म्हणून नियुक्ती झाल्यावर अविवाहित एजवर्थने उर्वरित आयुष्य त्या कॉलेजमध्ये काढले. १८९१ मध्ये सुरू झालेल्या द इकॉनॉमिक जर्नलचे संपादकपद त्याने आयुष्याच्या अखेरपर्यंत भूषविले.

गणिताधिष्ठित अर्थशास्त्र विकसित करण्यास एजवर्थने बराच हातभार लावला. एजवर्थ समतुष्टी वक्रतंत्राचा प्रणेता समजला जातो. त्याने करभार व मक्तेदारी यांसंबंधीचे विवेचन गणितीय पद्धतीने मांडले व द्वयधिकार पद्धतीवर नवा प्रकाश टाकला. सीमांत फल व सरासरी फल या दोन कल्पनांच्या अनुरोधाने त्याने उत्पादनफल सिद्धांताविषयी केलेले विश्लेषण, ही त्याची अर्थशास्त्राला एक महत्त्वाची देणगी समजली जाते. मॅथेमॅटिकल सायकिक्स (१८८१) हा ग्रंथ व त्याच्या निबंधांचे पेपर्स रिलेटिंग टू पोलिटिकल इकॉनॉमी हे १९२५ मध्ये प्रसिद्ध झालेले संपादित तीन खंड, यांतून त्याच्या विवेचनाचा मागोवा घेता येतो. तो वयाच्या एक्याऐंशीव्या वर्षी ऑक्सफर्ड येथे निधन पावला.

संदर्भ : 1. Bowley, Arthur L. F. Y. Edgeworth’s Contributions to Mathematical Statistics, London, 1928.

           2. Keynes, John Maynard, Essays in Biography, New York, 1963.

गद्रे, वि. रा.