उस्मान : (सु. ५७६–१७ जून ६५६). इस्लामी परंपरेतील तिसरा खलीफा. त्याचा जन्म मक्का येथे कुरैश जमातीतील प्रसिद्ध बानू उमय्या कुलात झाला. त्याचे पूर्ण नाव उथ्मान (उस्मान) बिन अफ्फान हे असले, तरी तो उस्मान ह्या नावानेच प्रसिद्ध आहे. मुहंमद पैगंबरांची मुलगी रुकय्या हिच्याशी त्याचा विवाह झाला. ⇨ उमर ह्या दुसऱ्या खलीफानंतर सहा उमेदवारांतून त्याची खलीफा म्हणून निवड झाली. त्याची कारकीर्द बारा वर्षांची (६४४–६५६) होती. कुराणाची एकच एक अधिकृत अशी प्रत निश्चित व प्रचलित करण्याचे श्रेय त्याला दिले जाते [→ खिलाफत].
त्याचा बारा वर्षाच्या कारकीर्दीत नव्यानेच एकत्रित झालेल्या अरबांनी सिरिया, ईजिप्त, उत्तर आफ्रिका, सायप्रस, आर्मेनिया आणि पर्शियाचा बराच भाग आपल्या स्वामित्वाखाली आणला. पुढे स्वाऱ्या बंद झाल्यामुळे आर्थिक चणचण सुरू झाली. सैन्याचे उत्पन्न कमी झाले. तशात पूर्वीचे ठिकठिकाणचे राज्यपाल काढून टाकून त्यांच्या जागी आपल्या नातेवाईकांची नेमणूक केल्यामुळे, ईजिप्तच्या पदच्युत राज्यपालाच्या नेतृत्वाखाली ६५६ मध्ये बंड झाले. बंडखोर सैनिकांनी खलीफाच्या राजवाड्याला वेढा घातला. तेव्हा मुहंमदांचा कनिष्ठ जावई ⇨ अली याने शिष्टाई केली परंतु तडजोडीच्या अटीप्रमाणे पूर्वीच्या राज्यपालांना न नेमल्यामुळे, वेढा घातलेल्या सैनिकांनी संतापून उस्मानचा खून केला.
करंदीकर, म. अ.