एक्झॅकम प्युलिलम : (कुल-जेन्शिएनेसी). सु. १०–२२ सेंमी. उंचीच्या या लहान पण आकर्षक व वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) ओषधीचा प्रसार भारतात पश्चिम द्वीपकल्पात, सामान्यत: गवताळ रानात सर्वत्र आहे. खोड चौकोनी पाने साधी, लहान, समोरासमोर, पातळ, खालची रेषाकृती व वरची भाल्यासारखी, बिनदेठाची फुले निळसर, जांभळट, लहान व शोभादायक असून विरळ वल्लरीत ऑगस्ट-डिसेंबरमध्ये येतात. संदले चार, पातळ व सपक्ष प्रदले चार, खाली जुळलेली, वर पसरट व गोलसर केसरदले चार परागकोश पिवळे व टोकाशी तडकून परागकण बाहेर येतात [→ फूल] बोंड तडकून दोन शकले होतात व अनेक बारीक बिया बाहेर पडतात. बागेत लावण्यास चांगली.
पहा : उडिचिराइत जेन्शिएनेलीझ.
जमदाडे, ज. वि.