उष्णकटिबंधी वातावरणविज्ञान : सामान्यतः उष्णकटिबंध या संज्ञेत कर्क व मकरवृत्त यांच्यामध्ये असणाऱ्या प्रदेशाचाच समावेश होतो, पण वातावरणविज्ञानात ही संज्ञा ३० उ. व ३० द. या अक्षांशाजवळ जे उच्च दाबाच्या हवेचे पट्टे आहेत त्यांच्यामधील सर्व प्रदेशांस उद्देशून वापरली जाते. हे पट्टे सूर्याच्या उत्तर व दक्षिण अयनांस अनुसरून अनुक्रमे अधिक उत्तरेकडे व दक्षिणेकडे, सु. ५ अक्षांशाने सरकत असतात. या उच्च दाबाच्या पट्ट्यांमधील प्रदेशातल्या वातावरणाच्या वळोवेळीच्या स्थितीचे, त्या वातावरणात होणाऱ्या ढग, पाऊस, वारे इ. घडामोडींचे निरीक्षण करणे व पृथ्वीच्या पृष्ठाजवळच्या व अधिक उंचीच्या वातावरणातील घडामोडींचे व त्यांच्या परस्पर संबंधांचे अध्ययन करणे आणि अशा रीतीने मिळालेल्या माहितीचा उपयोग करून पुढील काही दिवसांच्या हवामानाच्या परिस्थितीचे भाकित करणे या गोष्टींचा विचार उष्णकटिबंधी वातावरणविज्ञानात केला जातो. या विषयाचा अभ्यास करण्यासाठी भारताच्या वातावरणविज्ञान खात्याने पुणे येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिटिऑरॉलॉजी ही एक खास संस्था १९६० मध्ये सुरू केली. या संस्थेत कृत्रिम पर्जन्य, सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या प्रारणाचे वितरण, हवामानाचे संख्यात्मक पूर्वकथन, वर्षणाचे विश्लेषण, जलवायुविज्ञान इ. विषयांचा अभ्यास केला जातो.

उष्णतेचा पुरवठा : या प्रदेशावर सूर्याचे किरण वर्षभर लंब किंवा उच्च कोन करून पडत असल्यामुळे त्यांचा सर्वांत अधिक प्रभाव याच प्रदेशावर होत असतो आणि वातावरणाचे व सागरांतील परिवहन चालू ठेवण्यासाठी जी ऊर्जा लागते ती याच प्रदेशापासून मिळत असते. वातावरणाच्या व सागराच्या परिवहनाचा परिणाम उष्णकटिबंधाच्या बाहेरही व विस्तृत प्रदेशात होत असल्यामुळे या कटिबंधातील उष्णताविषयक घटनांचा परिणाम केवळ त्याच्यापुरताच मर्यादित रहात नसून बाहेरील विस्तीर्ण प्रदेशावरही होत असतो. उष्णकटिबंधी प्रदेश म्हणजे एक अखंड चालू असलेली जणू काही भट्टीच असून तिच्यामुळे वातावरण व सागर ही तापविली जातात व परिवहनामुळे उष्णता विस्तीर्ण क्षेत्रात वाटली जाते. ही भट्टी मंद गतीने पण सतत चालू असते. तिच्या क्रियेची तीव्रता विशेषशी बदलत नाही अशी समजूत सु. तीस वर्षांपूर्वी प्रचलित होती. मध्यम किंवा किंचित उच्च कटिबंधातल्या वातावरणात होणारे संक्षोभ (खळबळाट) हे ध्रुवीय प्रदेशाच्या वातावरणात होणाऱ्या फेरफारांमुळे होत असतात अशी तेव्हा कल्पना होती. हायड्रोजनाने भरलेल्या फुग्यांच्या साहाय्याने अधिक उंच जागेतील हवेची माहिती मिळविण्याचे प्रयोग दुसऱ्या महायुद्धानंतर फार मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. त्या माहितीवरून असे दिसून आले की, उष्णकटिबंधी प्रदेशापासून मिळणाऱ्या ऊर्जेचे परिमाण अचर (स्थिर) नसून त्याच्यात बरेच चढउतार होणे व ते एखादा आठवडा किंवा काही आठवडे टिकणे शक्य असते. त्या चढउतारांचा परिणाम मध्यम कटिबंधातील वातावरणावर होतो व त्या प्रदेशांतील हवामानाचे भाकित करण्यासाठी त्यांच्याविषयी मिळालेल्या माहितीचा उपयोग होतो.

उष्णकटिबंधाची वैशिष्ट्ये : उष्णकटिबंधातील हवा वर्षभर अतिशय उष्ण किंवा उष्ण असते. खरा हिवाळा नसतोच. तापमानाचे दैनंदिन फेरफार हे उष्ण व थंड ऋतूंतील फेरफारांपेक्षा अधिक असतात.

या प्रदेशातील महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे विषुववृत्तावरील कमी दाबाचा ‘प्रशांत’ पट्टा (अतिमंदगती वाऱ्यांचे क्षेत्र) व ईशान्य व आग्‍नेय जागतिक (व्यापारी) वारे व दक्षिण व आग्‍नेय आशियातील मॉन्सून वारे हे होत.

या प्रदेशातील हवा सामान्यतः आर्द्र व अस्थिर (स्थितिबदल घडवून आणण्याच्या परिस्थितीत) असते. पाऊस सतत न पडता अधूनमधून सरींच्या स्वरूपात पडतो. कित्येक भागात पाऊस पुष्कळ पडतो परंतु बाष्पीभवनाचे मान उच्च असल्यामुळे पाण्याचे मोठे साठे तयार होणे विरळाच. शिवाय मॉन्सून जलवायुमान (दीर्घावधीची सरासरी हवामान परिस्थिती) असणाऱ्या प्रदेशात वर्षातील २ ते ४ महिन्यांतच पाऊस पडून जातो व उरलेला काल कोरडाच जातो. यदृच्छ्या होणाऱ्या वादळामुळे मात्र एरव्ही कोरड्या असणाऱ्या ऋतूतही पाऊस पडणे शक्य असते.

संक्षोभ : उष्णकटिबंधी वातावरणाच्या सामान्य स्थितीत वारंवार संक्षोभ घडून येत असतात. अल्पसे संक्षोभ म्हणजे ‘तरंग’. ईशान्येकडून किंवा आग्‍नेयीकडून वाहत येणाऱ्या व्यापारी वाऱ्यांच्या प्रवाह रेखांना तरंगाकार प्राप्त होतो. समभार रेषा (सारखा वातावरणीय भार असलेल्या ठिकाणांतून जाणाऱ्या रेषा) किंचित वाकविल्या जाऊन त्या वाकणालगत कमी दाबाचे विस्तीर्ण क्षेत्र तयार होते. ह्या क्षेत्रात मोठ्या संख्येने गडगडाटी वादळे निर्माण होणात.

वरील प्रकारच्या संक्षोभापेक्षा अधिक तीव्र प्रकार म्हणजे अवदाब क्षेत्रे, अभिसारी चक्रवात व उष्णकटिबंधी चक्री वादळे ही होत. त्या सर्वांच्या मध्यभागी एक कमी दाबाचे निश्चित क्षेत्र तयार होते व त्याच्या भोवताली वारे वेगाने वाहत केंद्राकडे जात असतात. कमी दाबाच्या मध्याभोवती फिरणाऱ्या वाऱ्यांचा वेग ताशी ४० किमी. पर्यंत असल्यास त्या वादळास उष्णकटिबंधी अवदाब, तो ताशी ४० ते १२० किमी. असल्यास उष्णकटिबंधी अभिसारी चक्रवात व ताशी १२० किमी. पेक्षा अधिक असल्यास त्याला उष्णकटिबंधी चक्री वादळ (सायक्लोन) म्हणतात. उष्णकटिबंधी चक्री वादळांना उत्तर अमेरिकेत व कॅरिबियन बेटांत हरिकेन, अतिपूर्वेकडील देशांत टायफून, फिलिपीन्स बेटांत बॅग्विओ व ऑस्ट्रेलियात विली-विली म्हणतात.

पहा : जलवायुविज्ञान मॉन्सून वारे वातावरणविज्ञान वादळ वारे.

संदर्भ : Riehl, H. Tropical Meteorology, New York, 1954.

मुळे, दि. आ.