उन्हाळे : गरम पाण्याच्या नैसर्गिक झऱ्याला उन्हाळे अथवा उन्हेरे म्हणतात. उन्हाळ्यांच्या पाण्याचे तापमान ४०से. ते क्‍वचित १००से. इतके असू शकते. पृथ्वीच्या कवचातील हालचालींमुळे जटिल (गुंतागुंतीच्या) घड्या पडलेल्या, विभंग असलेल्या किंवा नुकतीच ज्वालामुखी क्रिया संपली आहे अशा प्रदेशांत उन्हाळी आढळण्याची शक्यता असते. उन्हाळी निर्माण होण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी विभंग पावलेल्या किंवा घड्या पडलेल्या खडकांतील विभंगास किंवा थरांना अनुसरून तसेच संधिरेषा व त्यासारख्या इतर भेगांतून खूप खोलपर्यंत जाते. भूपृष्ठापासून खोल जावे तसतसे तापमान वाढत जाते. ज्वालामुखी क्रिया नुकतीच संपली असलेल्या प्रदेशात असे तापमान वाढण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे खूप खोलवर गेलेले पाणी तापविले जाते. ते पुन्हा भूपृष्ठावर झऱ्याच्या रूपात बाहेर पडले म्हणजे उन्हाळी निर्माण होतात. दुसरे कारण म्हणजे भूपृष्ठाखाली शिलारसाचे स्फटिकीभवन होऊन अग्‍निज खडक तयार होत असताना स्फटिकीभवनाच्या क्रियेच्या अखेरच्या काळात शिलारसातील उच्च तापमान व मोठा दाब असलेले अवशिष्ट पाणी गोळा होते. हे नवजात पाणी खडकातील भेगांतून झऱ्याच्या रूपात बाहेर पडते व उन्हाळी निर्माण होतात. कधीकधी हे उच्च तापमानाचे पाणी भूपृष्ठाजवळच्या भूमिजलात मिसळून ते पण गरम होते व त्यापासूनही उन्हाळी निर्माण होतात.

बऱ्याच उन्हाळ्यांच्या पाण्यात गंधक, लोहाचे कार्बोनेट, मॅग्‍नेशियमाची लवणे, सिलिका व इतर लवणे असतात. गंधकयुक्त गरम पाणी काही त्वचारोगांवर औषधी असते. म्हणून ते स्‍नानासाठी वापरतात [→ खनिज जल].

जगातील बहुतेक सर्व भागांत उन्हाळी आढळतात. अमेरिकेतील यलोस्टोन नॅशनल पार्क, न्यूझीलंड, आइसलँड, इंडोनेशिया इ. भागात उन्हाळी विपुल आहेत. भारतात दोनशेहून अधिक उन्हाळी आहेत. त्यांपैकी महाराष्ट्राखेरीज इतर बरीच उन्हाळी काश्मीर, उत्तर प्रदेश, हिमालयाचा पायथा, बिहार व गुजरात या भागांत आहेत. महाराष्ट्रात रत्‍नागिरीपासून दक्षिणोत्तर ओळीत गुजरातपर्यंत अनेक उन्हाळी आहेत. ती पश्चिम किनाऱ्याला समांतर असणाऱ्या दक्षिणोत्तर विभंगाची निदर्शक असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी, कुलाबा जिल्ह्यात पाली व महाड, रत्‍नागिरी जिल्ह्यात राजेवाडी, खेड, संगमेश्वर व राजापूर, नाशिक जिल्ह्यात टाकेद व कळवण, धुळे जिल्ह्यात शहादे व शिरपूर आणि जळगाव जिल्ह्यात चोपडे येथे उन्हाळी आहेत.

सोवनी, प्र. वि.