उन्मंडल : (कोलूर). ज्योतिषशास्त्रात खगोलावार काढलेल्या दोन काल्पनिक वर्तुळांना दिलेले नाव. ही वर्तुळे खगोलीय ध्रुवांतून जाणारी दुय्यम प्रकारची दोन होरावृत्ते किंवा मध्यमंडले (रेखावृत्ते) आहेत. संपातबिंदू (सूर्य आपल्या वार्षिक भासमान गतीमध्ये जेथे खगोलीय विषुववृत्त ओलांडतो तो बिंदू) व खगोलीय ध्रुव यांतून जाणाऱ्या वर्तुळास संपाती उन्मंडल आणि दोन्ही संस्तंभ (विषुववृत्तापासून सूर्य जास्तीत जास्त दूर असण्याचे) बिंदू व खगोलीय ध्रुव यांतून जाणाऱ्या वर्तुळास संस्तंभी उन्मंडल असे म्हणतात. संपाती उन्मंडल हे काहीसे भौगोलिक ग्रिनिच मध्यमंडलासारखे असते. विषुववृत्तीय सहनिर्देशक पद्धतीत, विषुववृत्त व संपाती उन्मंडल यांचा प्रमुख संदर्भ वर्तुळे म्हणून उपयोग केला जातो. या दोन उन्मंडलांची प्रतले (पातळ्या) एकमेकांना लंब असतात. संस्तंभी उन्मंडल कदंबाग्रांतून (क्रांतिवृत्ताच्या ध्रुवांतून) जाते. सस्तंभी मंडलाचे संपातबिंदू हे ध्रुव होत. पूर्वी काही तज्ञांनी खगोलीय ध्रुवांऐवजी क्रांतिवृत्तीय ध्रुवांमधून जाणारी वर्तुळे अशी उन्मंडलांची व्याख्या केली होती, ती बरोबर नाही. या मंडलांचा काही भाग ग्रीस व विषुववृत्ताच्या उत्तरेकडील प्रदेशात नेहमी अदृश्य म्हणजे क्षितिजाखाली असतो. कोलूर म्हणजे तुटलेले हा अर्थ ग्रीक भाषेत आहे म्हणून हे नाव पडले असावे. उन्मंडल ही संज्ञा आता प्रचारात नाही.
ठाकूर, अ. ना.