उतरणी : (हिं. उतरण; सं. फलकंटका; गु. नागल दुदली; क. उगरन सुतु, हाल कोटिंगे; लॅ. पर्गुलॅरिया एक्स्टेन्सा, डेमिया एक्स्टेन्सा, कुल- ॲस्क्लेपीएडेसी). ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) वेल भारतात सर्वत्र उष्ण ठिकाणी, श्रीलंकेत व अफगाणिस्तानात आढळते. ती चुरगळल्यावर दुर्गंध व पांढरा चीक येतो. पाने साधी, पातळ, समोरासमोर, अंडाकृती, टोकदार व तळाशी हृदयाकृती; फुलोरा चामरकल्प किंवा गुलुच्छासारखा असतो [→ पुष्पबंध]. फुले लहान, पिवळसर हिरवी किंवा पांढरट असून ऑगस्ट-जानेवारीत येतात तोरण दोन मंडलांचे [→ फूल]; पेटिकाफळांची जोडी लांबट, बाकदार, टोकास किंचित वाकडी असून त्यांवर मऊ काटे असतात. बी शिखालू (केसाळ). इतर सामान्य लक्षणे ⇨ ॲस्क्लेपीएडेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे. खोडापासून बारीक व मजबूत धागा काढतात तो अंबाडीच्या धाग्याप्रमाणे उपयुक्त असतो. ही वेल कफोत्सारक, वांतिकारक व कृमिनाशक असते. पानांचा काढा मुलांना दम्यावर व पानांचा रस अतिसारावर देतात. तसेच हा रस घशाच्या विकारांवर उपयुक्त पानांचा रस व चुना किंवा आले यांचे मिश्रण संधिवाताने आलेल्या सुजेवर लावतात. प्रसूतीकरिता, गर्भाशयाच्या तक्रारींवर व आर्तवदोषांवर (पाळीच्या दोषांवर) या वनस्पतीचा अर्क उपयुक्त ठरला आहे. काळपुळीवर पानांचा लेप लावतात.
हर्डीकर, कमला श्री.