इर्कुत्स्क : रशियाच्या पूर्व सायबीरिया भागातील इर्कुत्स्क ओब्‍लास्टचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या ४,३५,००० (१९६९). बैकल सरोवरातून निघणाऱ्या व नंतर येनिसे नदीला मिळणाऱ्या अंगारा नदीच्या पूर्व तीरावर, सरोवरापासून ६४ किमी. इर्कुत्स्क वसले आहे. पूर्वेकडील चीन-मंगोलिया देशांशी व्यापार, लीना नदीखोऱ्यातील सोन्याच्या खाणी आणि सायबीरियातील लोकर ह्यांचे केंद्र म्हणून इर्कुत्स्क झपाट्याने वाढले. १९२० मध्ये येथील लोकसंख्या फक्त ४०० होती. ट्रान्स-सायबीरिअन रेल्वे नदीपलीकडून गेल्याने इर्कुत्स्कची औद्योगिक वाढ त्याच बाजूला झाली. येथे यंत्रे, हत्यारे, विद्युत्‌ उपकरणे, अभ्रक, लाकूड व प्लायवुड, मांस, पीठ, साबण, पादत्राणे, गुरांचे अन्न, मद्य इत्यादींचे उद्योग असून मोठे जलविद्युत्‌केंद्र आहे. हे दळणवळणाचे केंद्र असून, विद्यापीठ व शास्त्र अकादमीची शाखा येथे असल्याने पूर्व सायबीरियाचे शिक्षणाचेही केंद्र समजले जाते.

लिमये, दि. ह.