इरिडेसी : (केसर-कुल). फुलझाडांपैकी एकदलिकित वनस्पतींतील ⇨ लिलिएलीझ (लिलिफ्लोरी) गणात ह्या कुलाचा अंतर्भाव केला जातो. यामध्ये सु. ६० वंश व १,५०० जाती आहेत; त्यांचा प्रसार जगभर उष्ण व शीत कटिबंधांत आहे. यातील वनस्पती बहुधा बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) झुडपे, वेली, कंद आणि ग्रंथिल खोडाच्या ⇨ ओषधी असून पाने निमुळती, रेषाकृती व काही एकमेकांस तळाशी चिकटून आल्याने जोडल्यासारखी वाटतात (अध्यारूढ) ती तळाशी खोडाला वेढून राहतात. फुले कधी एकटी पण अनेकदा फुलोर्यात असतात तसेच ती द्विलिंगी, नियमित अथवा अनियमित असून बहुधा भिन्न रंगांची व आकर्षक असतात. परिदले सहा, पाकळ्यांसारखी, जुळलेली व दोन मंडलांत असतात. केसरदले तीन, सुटी किंवा क्वचित थोडी जुळलेली; अध:स्थ किंजपुट तीन जुळलेल्या (युक्त) दलांचा व एक अथवा तीन कप्प्यांचा असतो किंजल्क तीन व किंजले कधी पाकळ्यांसारखी असतात [→ फूल ]. फळ (बोंड) उभे तडकते व आत अनेक सपुष्क (बीजातील गर्भाचे पोषण करणारा अन्नद्रवयुक्त भाग असलेल्या) बिया दिसतात. ⇨ लिलिएसी, ⇨ ॲमारिलिडेसी, ⇨ डायास्कोरिएसी व पाँटेडेरिएसी ह्या चार कुलांचे इरिडेसी या कुलाशी जवळचे नाते आहे. ह्याच कुलातील बाळवेखंड व केशर औषधांत व इरत उपयोगांत असून ग्लॅडिओलस, आयरिस व बेलमकँदा ह्या ओषधी बागेत शोभेकरिता लावतात. कंद, ग्रंथिक्षोड [→ खोड] वगैरे भागांपासून नवीन लागवड होते. या कुलाला ‘कुंकुमादि-कुल’ असेही म्हणतात.
टिळक, शा. त्रिं.