‘उग्र’– बेचन शर्मा पांडेय : (? १९००–२३ मार्च १९६७). हिंदी कादंबरीकार, कथाकार व पत्रकार. मिर्झापूर जिल्ह्यातील (उत्तर प्रदेश) चुनार गावी जन्म. बालपण अत्यंत हालअपेष्टांत गेले. त्यांना आपले शिक्षणही बालपणीच सोडावे लागले. राजकीय चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. आज, भूत, स्वदेश, मतवाला, राज्य, वीणा, विक्रम, संग्राम, उग्र इ. हिंदी नियतकालिकांचे त्यांनी संपादन केले.
चंद हसीनों के खुतूत (१९२३), दिल्ली का दलाल (१९२७), बुधुआ की बेटी – (मनुष्यानंद, १९२७), शराबी (१९३०), फागुन के दिन चार (१९६०) यांसारखे त्यांचे उपन्यास (कादंबऱ्या) प्रसिद्ध आहेत. त्यांनी दोनशेच्यावर कथा, पाच नाटके व काही एकांकी (एकांकिका) असे लेखन केले आहे. महात्मा ईसा(१९२३) हे त्यांचे विशेष गाजलेले नाटक होय. अपनी खबर (१९६०) हे आत्मचरित्रही त्यांनी लिहिले.
स्वतःच्या विशिष्ट गद्यशैलीने वास्तवाचे अत्यंत कटु, विदारक व उघडेनागडे चित्र त्यांनी आपल्या साहित्यात रंगविले. सामाजिक विषमता व अन्याय, उच्चवर्गीयांची दांभिकता, पतितांचे जीवन, स्वातंत्र्याची चळवळ इ. त्यांचे खास लेखनविषय होत. अश्लील व हीन अभिरुचीचे साहित्य त्यांनी लिहिले, असा आरोप त्यांच्यावर केला जातो परंतु समाजातील नग्न सत्याचे जे रोखठोक व विदारक दर्शन त्यांनी आपल्या साहित्यातून घडविले आहे, त्याचाच तो एक अपरिहार्य भाग म्हणावा लागेल. दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ : पांडेय, रत्नाकर, उग्र और उनका साहित्य, वाराणसी, १९६९.
बांदिवडेकर, चंद्रकांत