उगद : (रानभेंड, बोंडसा क. बोंडले लॅ. टेट्रामेलिस न्युडिफ्लोरा कुल-डॅटिस्केसी). सु. ३०–४५ मी. उंचीचा व ३–४·५ मी. घेराचा हा मोठा, जलद वाढणारा पानझडी वृक्ष भारत (कोकण, सह्याद्री, उ. कारवार, दार्जिलिंग, तराई, अंदमान इ.), श्रीलंका, जावा, ब्रह्मदेश इत्यादींतील सदापर्णी व दाट जंगलांत आढळतो. साल उदी व जाड असून तिचे पातळ पापुद्रे सुटून निघतात तिच्यावर आडव्या सुरकुत्या व उभ्या वल्करंध्रांच्या (वनस्पतीचे अंतर्गत भाग व सभोवतील हवा यांमधील वायवीय देवघेवीस मदत करणाऱ्या सूक्ष्म छिद्रांच्या) लहान ओळी दिसतात. आधारमुळे मोठी पाने एकाआड एक, साधी, मध्यम आकाराची, १३–१५ × १०–१३ सेंमी., तळास काहीशी गोलसर, टोकास निमुळती, दातेरी, पातळ व कोवळेपणी लवदार फुले लहान, चतुर्भागी, एकलिंगी, स्वतंत्र झाडावर, हिरवट पिवळी व प्रदलहीन असून फेब्रुवारी-मार्चमध्ये येतात. पुं-पुष्पे फांद्यांच्या टोकास सरळ परिमंजरीवर व स्त्री-पुष्पे लांबट व लोंबत्या मंजरीवर येतात. किंजपुट अधःस्थ [→ फूल] बोंडे पार लहान, अंडाकृती, रेषांकित, चिकट व टोकास फुटणारी असून एप्रिल-मेमध्ये येतात बिया लहान व अनेक.
याचे लाकूड पांढरे, जाडेभरडे व नरम असून कोवळेपणी कवकांच्या बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींच्या किंवा कीटकांच्या भक्ष्यस्थानी पडून खराब होते. तथापि चहाच्या पेट्या, खोके, छताचे तक्ते, हलक्या प्रतीचे प्लायवुड, आगकाड्या व आगपेट्या, लहान पडाव इत्यादींकरिता उपयुक्त आहे. फुलांवर मोठ्या संख्येने भुंगे येतात व फांद्यांवर घरटी करतात. सुतार पक्षी फांद्या पोखरून घरट्यांची उभी रांग ह्या झाडावर करतात. हॉर्नबिल (शिंगचोचे) पक्षीही घरट्याकरिता हीच झाडे निवडतात.
परांडेकर, शं. आ.