इराणी कला : इराणी (पर्शियन) कला समृद्ध आहे. परकीय आक्रमणे व व्यापार यांमुळे इराणचा अन्य देशांशी सतत संपर्क आला. परप्रांतीय कलापरंपरा आत्मसात करण्याची इराणी कलेची शक्ती मोठी होती. त्याबरोबरच तिने स्वत:ची वैशिष्ट्येही जतन केली. ह्या कलेवर मेसोपोटेमिया, आर्मेनिया, स्टेप प्रदेश ह्यांप्रमाणेच ईजिप्त, भारत, चीन अशा दूरवरच्या प्रदेशांतील कलांचाही प्रभाव पडला आहे.

प्रागैतिहासिक कालखंड : सुरुवातीच्या काळातील कलादृष्ट्या महत्त्वाचे नमुने स्यूसा व पर्लेपलिस येथे सापडलेल्या बिनचकाकीच्या रंगीत मृत्पात्रांमध्ये आढळतात (इ. स. पू. सु. ३५००). मोठमोठ्या भांड्यांवर व उंच पानपत्रांवर प्राणी, पानेफुले, भौमितिक आकार इ. प्रतीकरूपांत कोरलेले दिसतात. प्राण्यांमध्ये विशेषेकरून जलपक्षी व रानबकरे ह्यांच्या प्रतिमा आदर्शवादी शैलीकरणाने (स्टायलायझेशन) रेखाटलेल्या आढळतात. निसर्गातून निवडलेले विषय व त्यांचे अगदी साध्यासुध्या, ओळखू न येणार्‍या आकारांत केलेले रूपांतर हे प्रारंभीच्या इराणी कलेचे एक रचनातत्त्व म्हणून सांगता येईल. चौथ्या सहस्रकातील इराणी कलेवर मेसोपोटेमियाचा दाट प्रभाव दिसून येतो. तिसर्‍या सहस्रकातील सियाल्क व स्यूसा येथील ईलमच्या कलेतही मेसोपोटेमियन संस्कार आढळतात. तिसर्‍या सहस्रकाच्या मध्यकाळातील सारीपूल व कुरांगून येथील खडकांवरील उत्थित शिल्पे म्हणजे तत्कालीन धार्मिक व राजकीय आचारविचारांचे प्रकटीकरणच होय. हे माध्यम इराणी कलेतिहासात सातत्याने अवतरते. मुद्रातक्षणातही असेच सातत्य दिसून येते.

ब्राँझयुग व लोहयुगाचा प्रारंभ : ह्या काळात लुरिस्तान येथील ब्राँझशिल्पांचा विशेष प्रभाव दिसून येतो. ह्या शिल्पांचा काळ साधारणत: १२०० ते ७०० इ. स. पू. असा मानला जातो. पश्चिम इराणमधील लुरिस्तानच्या पर्वतखोर्‍यांतील थडगी उकरताना तेथील स्थानिक लोकांस ही शिल्पे १९३०–१९३४ च्या दरम्यान सापडली. त्यांत मुख्यत: रथाची व घोड्याची सामग्री असून तीत लगाम, खोगीर, मुखबंध आदींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे मूठ व पाते ह्यांची अखंड घडण असलेल्या कट्यारी, कुर्‍हाडी, ताईत, दागदागिने इ. वस्तू सापडलेल्या आहेत. ह्या काळातील एक अत्यंत प्रभावी अलंकरणप्रकार म्हणजे प्राणिशिल्पांचा. त्यांत अद्‌भुतरम्यता व सुडौलपणा ह्यांचा नावीन्यपूर्ण संयोग आढळतो. त्यांतील सांकेतिक शैलीकरणही वैशिष्ट्यपूर्ण आहे : काही शिल्पांत प्राण्यांची शिंगे, डोळे, मांड्या यांसारखे काही अवयव प्रकर्षाने उठावदार घडविलेले असतात तर काही शिल्पांत गळा, शिंगे यांसारखे अवयव उंच व सडसडीत घडविलेले असतात. त्यांतील घोटीव वक्राकार मोठे वेधक आहेत.

ॲकिमेनिडी वंश : (५४६–३३० इ. स. पू.). ॲकिमेनिडी वंशाची कारकीर्द मीडियानांनंतर लगोलग येत असल्याने त्यांच्या कलेवर मीडियनांचा प्रभाव पडला असण्याची शक्यता आहे. तथापि मीड कलेविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही.

ॲकिमेनिडी वंशाची कला प्राय: राजदरबारी स्वरूपाची असल्याने ती दरबार व त्यांच्या राजधान्या ह्यांच्याशी निगडित आहे. पहिला राजनिवास पसारगडी येथे सायरसने ५५९–५५० इ. स. पू. च्या दरम्यान बांधला. उद्यानांमध्ये बांधलेले अलग अलग प्रासाद अशी ह्या निवासाची रचना आहे. ह्यापैकी फारच थोडा भाग अवशिष्ट आहे. सायरसचे थडगे (इ. स. पू. सु. ५३०) ही उंच टप्प्यांवर बांधलेली, चांदईने युक्त अशी दगडी वास्तू होती. पर्सेपलिस शीराझच्या ईशान्येला उंच पर्वतांच्या पायथ्याशी असून तटबंदी असलेल्या दगडी चौथर्‍यावर परस्परसन्निध बांधलेल्या वास्तूंचा तो एक अवाढव्य परिसर होता. ह्या भव्य प्रासादांच्या अवशेषांतून ही एक वैशिष्ट्यपूर्ण वास्तुशैली असावी, हे आजही लक्षात येते. भव्य स्तंभांकित श्रोतृदालने, दालनांच्या समोर स्तंभावलींनी युक्त असे द्वारमंडप व त्याच्या आजूबाजूस चौरस मनोरे हे प्रासादाच्या रचनेतील महत्त्वाचे वास्तुघटक होत. प्रचंड प्रवेशद्वार व घोड्यालाही ये-जा करता येईल, असा प्रशस्त दुहेरी जिना हे वास्तूचे प्रमुख प्रवेशमार्ग होत. ह्या वास्तुरचनेचे जरी ईजिप्शियन, ग्रीक व ॲसिरियन वास्तूंशी साम्य असले, तरी एक संश्लिष्ट शैली म्हणून तसेच अवकाश व प्रमाणमान ह्यांविषयीची जाण ह्या दृष्टींनी ती आगळी आहे. इराणी स्तंभ सडसडीत असून त्यांचे तळभाग उंच व घंटाकृती असत. स्तंभशीर्षांवर प्राण्यांच्या शिरोभागांची परस्परविन्मुख युग्मशिल्पे उपयोजिली होती. मूर्तिशिल्पांत सफाई व साधेपणा असून त्यांत वास्तवतेबरोबरच आदर्शवादी शैलीकरणही आढळते. पर्सेपलिस येथे पहिल्या झर्क्‌सीझच्या प्रासादातील अपादान श्रोतृगृहाचा प्रवेशमार्ग असलेल्या भव्य दुहेरी जिन्याच्या बाजूंवरील उत्थित शिल्पाकृतीत सम्राटाला मानवंदना देणार्‍या तेवीस राष्ट्रप्रतिनिधींच्या मिरवणुकीचे दृश्य कोरले आहे. एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष घडलेल्या घटनांचे प्रकटीकरण तेथील सजावटीतून करावयाचे, ही ॲकिमेनिडी प्रथा येथे प्रत्ययास येते. आणखी एक भव्य सार्वजनिक वास्तू म्हणजे सहस्रस्तंभी दालन होय. स्यूसा ही पर्सेपलिसप्रमाणेच ह्या काळातील आणखी एक महत्त्वाची राजधानी. पर्सेपलिस येथे न आढळलेल्या एक वैशिष्ट्यपूर्ण अलंकरणप्रकार येथे आढळला : ह्या प्रकारात काचवलेल्या विटांच्या भिंतींमध्ये राजाचे शरीररक्षक वा प्राणी ह्यांच्या आकृत्या असलेल्या कोरीव चित्रमालिका असत. ह्या प्रकारची प्रेरणा बॅबिलोनियन कलेतून प्राप्त झाली असावी. ह्याच काळात खडकावरील खोदकामाची प्रथा पुन्हा सुरू झाली. बेहिस्तून येथील उत्थित शिल्प विशेष प्रख्यात असून त्यात बंडखोर सम्राटांवर विजय मिळविलेल्या डरायसचे चित्रण आहे. आलंकारिक कलांचे तसेच कोरीव कलांचे नमुने, धातूंची भांडी, घडे, पेयपात्रे, दागदागिने, मुद्रा आदींवर आढळतात.

ॲकिमेनिडी वंशाची कला सर्वसंग्राहक स्वरूपाची आहे. तिच्या मूळ प्रेरणा बॅबिलोनिया, ॲसिरिया, आर्मेनिया, ईजिप्त येथील कलानिर्मितीत आढळतात. ह्या विविध प्रदेशीय कलाघटकांचे एकत्रीकरण व त्यांचे इराणी धर्तीने केलेले आविष्करण ही वैशिष्ट्ये ह्या कलेत आढळतात. वास्तुकला हा ह्या कालखंडातील सर्वांत प्रभावी कलाविष्कार होय. मूर्तिकला अवतरते ती वास्तुकलेच्या अनुषंगानेच तिला स्वतंत्र अस्तित्व नाही. वास्तुनिर्मितीत एक प्रकारचा रासवट अवाढव्यपणा आढळतो.

सिल्युसिडी व आर्‌सॅसिडी कालखंड : (इ. स. पू. ३२४–इ. स. पू. २२५). हा कालखंड इराणी कलेचे अंधारयुग म्हणून ओळखला जातो. अलेक्झांडरच्या स्वारीनंतर इराण पूर्णत: ग्रीकांश प्रभावाखाली आला. जे थोडेफार वास्तुशिल्पांचे अवशेष उपलब्ध आहेत, त्यांतून हा प्रभाव स्पष्ट होतो. इ. स. पू. सु. २५० मध्ये भटक्या पार्थियन जमातींनी पहिल्या आर्सासीझच्या आधिपत्याखाली सिल्युसिडी राज्यकर्त्यांचा पराभव केला. त्यामुळे देश ग्रीक प्रभावाखाली होता, तरी इराणी कलाप्रवृत्ती पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करून लागल्या. अभिजात ज्ञापके (मोटिफ्‌स) व साचे ह्यांत फेरबदल होत गेले. त्यांना कधी साधेसुधे, तर कधी ओबडधोबड पण बव्हंशी विपर्यस्त रूप देण्यात आले. अनेकदा तद्देशीय आकारसंकल्पनांशी पौर्वात्यीकरणाने युक्त अशा ग्रीक आकारसंकल्पनांची सांगड घातली गेली. घडीव दगड, डबर, विटा ह्यांच्या इमारती बांधून त्या शिल्पांकित शीर्षे, भित्तिचित्रे आदी अलंकरणप्रकारांनी सजविल्या जात. शामी येथे उर्वरित असलेली तत्कालीन राज्यकर्त्याची मानवाकारापेक्षा मोठी काशाची मूर्ती हे पार्थियन स्मारकाचे एक उल्लेखनीय उदाहरण होय. पार्थियन काळातील कलेचे स्वरूप बव्हंशी अचेतन व अनाकर्षक असले, तरी सॅसॅनिडी व इस्लामी कालखंडातील इराणी कलेच्या विकासाची बीजे तीत आढळतात.

सॅसॅनिडी वंश : (२२६–६४१). ह्या काळातील कलानिर्मितीत ग्रीकांश कलेविरुद्ध राष्ट्रीय प्रतिक्रिया व्यक्त झाली. सॅसॅनिडी सम्राटांनी कलेविषयीची आपली प्रमुख कर्तव्ये कसोशीने पार पाडली. त्यांनी कलेला राजाश्रय दिला. सॅसॅनिडी कलावंतांनी पूर्वकालीन कलाशैली व तंत्रे आत्मसात केली व त्यांत विकासही घडवून आणला. तथापि ग्रीकांश कलेचा संस्कार त्यांना पूर्णत: टाळता आला नाही. ह्या काळात वास्तुविशारदांनी प्रासादांच्या बांधकामात वास्तुमाध्यम म्हणून चुन्याच्या गार्‍याबरोबर डबराचाही वापर केला. आयताकृती वास्तूंसाठी दंडगोल घुमटाकृती छतांचा, तर चौरस वास्तूंसाठी कोनकमानींच्या आधारे चढविलेल्या घुमटांचा वापर केला. ह्याच काळात वास्तूमधील कोनकमानींची कौशल्यपूर्ण रचना विकसित झाली. प्रासादांच्या प्रवेशवास्तू वा श्रोतृगृहे म्हणून वापरात असलेले ईवान हे ह्या काळाचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य होय. ईवान म्हणजे तीन बाजूंनी बंदिस्त व चौथ्या बाजूने खुले असे, दंडगोल घुमटाकृती छताचे दालन होय. टेसिफॉन ह्या प्रख्यात राजधानीतील अवशेषांमध्ये पहिला शापूर ह्याने बांधलेली ताक-इ-किस्रा ही ईवानवास्तू आजही आढळते. चुन्याच्या गिलाव्यावरील अलंकरणाचा एक विशेष प्रकार पृष्ठसजावटीत विशेषत्वाने वापरला जात असे: ह्या प्रकारात चौरस स्मृतिफलकावर (प्लाक) साचे दाबून ठरीव आकृतिबंध वारंवार उठविले जात व मागाहून ते रंगवीत असत. इराणभर सर्वत्र विखुरलेल्या खडकांवरील उत्थित शिल्पांवर सॅसॅनिडी राज्यकर्त्यांनी आपल्या विजयाची व गौरवाची प्रतिके कोरून ठेवली आहेत. अशा दृश्यांतून कुलचिन्हांच्या आकृतिबंधाची एक शैली (हेराल्डिक स्टाइल) विकसित झाली. ह्या शैलीत संयोजनाचा समतोल साधण्यावर भर दिला जात असे.

उत्तरकालीन उत्थित शिल्पांचे नमुने केरमानशाहनजीक असलेल्या ताक-ए-बुस्तानच्या गुहेत आढळतात. चीनमधून निर्यात होणार्‍या रेशमाच्या व्यापारी मार्गावर इराण होता शिवाय इराणमध्येही तलम धाग्याची निर्मिती होत होती. परिणामत: इराणमध्ये वस्त्रकला विशेष भरभराटीस आली. वस्त्रप्रावरणावरील आकृतिबंधांत प्राणी-विशेषत्वाने मयूराकार महाकाय प्राणी-प्रचलित असल्याचे दिसून येते. रेशीमकामातील ज्ञापकांचा प्रभाव धातुसजावट, मृत्पात्री, चुनेगच्ची शिल्पे, कौले आदी माध्यमांवरही जाणवतो. बिझँटिअम, ईजिप्त इ. ठिकाणी तसेच अतिपूर्वेकडेही रेशीमकामाचे अनुकरण झाले व त्यापासून प्रेरणा घेतल्या गेल्या. ह्या काळात धातुमाध्यमाचाही वापर विशेषत्वाने झाला. मुद्रांचा वापर व्यापक प्रमाणात होत होता. रंगीत काचेच्या जडावकामाने सुशोभित केलेल्या सुवर्णपात्राच्या मध्यभागी बसविलेले स्फटिक व त्यावर कोरलेले पहिल्या खुसरौच्या राज्यारोहणाचे दृश्य हाही एक वैशिष्ट्यपूर्ण अलंकरणप्रकार दृष्टोत्पत्तीस येतो. काही मृत्स्‍नाशिल्पे कलादृष्ट्या महत्वाची आहेत. कारण पुढील कालखंडात मृत्पात्रीच्या कलेस जी भरभराटीची अवस्था प्राप्त झाली, त्याची आद्यलक्षणे ह्या शिल्पांत आढळतात.

सॅसॅनिडी कालखंडातील कला ही ॲकिमेनिडी वंशाच्या कलेप्रमाणेच प्राय: राजदरबारी असल्याने तिचे स्वरूप काटेकोर अर्थाने शासननियत व व्यक्तिनिरपेक्षच राहिले. तीही प्राधान्याने संग्राहक स्वरूपाची होती. त्यात प्राचीन, पौर्वात्य, अभिजात व काही अंशी भारतीय कलाकल्पनांचा संकर घडल्याचे दिसून येते. सॅसॅनिडी कलेचा प्रभाव हा तिच्या कुलचिन्हयुक्त आकृतिबंधाच्या शैलीतून जाणवतो. ह्या शैलीस ह्या कारकीर्दीत जवळजवळ पूर्णावस्था प्राप्त झाली. त्यातील अनेक ज्ञापके इस्लामी कलानिर्मितीत पूर्णत: विकसित झाली.

इस्लामी कालखंड : ह्या कालखंडातील इराणी कला अत्यंत वैभवसंपन्न व विकसनशील होती. ह्या कालखंडाचे स्थूलमानाने चार पोटविभाग पडतात :

संक्रमणकाळ : (सु. ६४१–८२०). सातव्या शतकात अरबांनी इराणवर स्वारी केली. परंतु त्यामुळे तेथील कलेचा र्‍हास न होता उलट विकासच झाला. अब्बासी वंशाच्या दरबारी इराणी कलेचा प्रभाव पहिल्यापासूनच जाणवू लागला. इराणी कलांवंतांनी प्रारंभी अरब वा बहुस्तंभी मशीदप्रकारचा वापर केला (उदा., दामगान येथील तारीक खानेह, सु. ७७५). आलंकारिक कलांमध्ये हळूहळू बदल होत होता. धातुकाम व वस्त्रकला ह्यांतील अप्रतिरूपणाची व समतलाची नवी प्रवृत्ती लक्षणीय होती.

इराणी प्रबोधनकाळ : (सु. ८२०–१२२०). पूर्व इराणमध्ये तसेच ट्रॅन्सऑक्सिएना येथील सामानिड राज्यकर्त्यांच्या दरबारी इराणी कलेला पहिला बहर आला (दहावे शतक). बूखारा येथील या वंशाच्या शाह इस्माइलची घुमट असलेली कबर एखाद्या अग्‍निमंदिरासारखी आहे. विटांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी तीत आढळते (सु. ९०७). गुर्गान जवळील काबसचा तारकाकृती कबरमनोरा अनुकरणीय ठरला. सामानिड प्रदेशात मृत्पात्रीवर भौमितिक आकृतिबंध व कोरीव सुलेखन आढळते. अन्य प्रदेशांत मृत्पात्रीच्या पृष्ठभागावरील गिलाव्याचा थर खरवडून व अंतर्भागातील भिन्नभिन्न रंग प्रकटवून विविध प्रकारचे आकृतिबंध कोरले जात. अलंकरणात कूफिक ही सुलेखनशैली व ‘अरेबस्क’ हा नव्यानेच विकसित झालेला पानाफुलांच्या वेलबुट्या असलेला नक्षीप्रकार ह्यांचे प्राचुर्य आढळते.

सेल्जुक कालखंडात पर्शियन मशिदींचा अथवा चार ईवानांच्या मशीदवास्तूचा विकास झाला : ह्या रचनेत चौकाच्या प्रत्येक बाजूस कमानपथांच्या मध्यभागी मोठ्या ईवानांची योजना केलेली असे. प्रार्थनादालनाच्या मध्यभागी असलेले ईवान उंच, घुमटाकृती व अन्य ईवानांपेक्षा प्रशस्त असून त्याच्यासमोरील कमानपथ-दालनाचा वापर प्रवेशमार्ग म्हणून केला जात असे. प्रार्थनादालनाच्या ईवानावर कोनकमानींच्या साहाय्याने चढविलेला प्रचंड घुमट हा सेल्जुक मशिदींचा आणखी एक प्रगत टप्पा होय. ह्या रचनेमुळे वास्तूच्या सर्वांत महत्त्वाच्या भागास विशेष उठाव प्राप्त होत असे. मनोरा निमुळत्या आकाराचा असून तो अलगपणे उभारीत. त्याच्या शिखराखाली मुअज्‍जीनच्या (बांग पुकारणारा) आसनास आधार देण्यासाठी पुढे झुकलेल्या कंगणीचा वापर करीत. त्यावर बहुधा विटांची सजावट आढळते. मशिदीच्या बाहेरील भिंतींवर अलंकरण आढळत नाही. मात्र चौकाच्या दर्शनीभागी आणि विशेषत: वास्तूच्या अंतर्भागात विटा, पक्वमृदा, चुनेगच्ची, चकचकीत कौले ह्यांची कौशल्यपूर्ण रचना आढळते. सेल्जुक मशिदीचे अप्रतिम उदाहरण इस्फाहान येथील मसजिदजामी  हे होय. सेल्जुक कालखंडातील कबरवास्तू चौरसाकार असून तिच्या प्रत्येक बाजूस मध्यभागी दरवाजा व शिरोभागी मनोरा असे. उदा., मेर्व्ह येथील संजार ह्या शेवटच्या प्रमुख सेल्जुकवंशियाची प्रचंड व अप्रतिम कबर (सु. १८५७).

आलंकारिक कलांच्या क्षेत्रात सॅसॅनिडी संकल्पनांचे पुनरुज्‍जीवन व संस्करण झाले. या काळात बहुरंगी वा एकरंगी चकाकीची, मीनाकारी सजावटीची, गिलाव्याचा पृष्ठभाग खरवडून अलंकरण साधलेली, साच्यातून घडविलेली इ. अनेक प्रकारची मृत्पात्रे आढळतात. त्यांवर दरबारी जीवनातील दृश्ये कोरलेली असत. ही भांडी प्रामुख्याने राई (रेजेस), काशान, साव्हे या ठिकाणी आढळतात. बाराव्या शतकाच्या प्रारंभी वास्तुसजावटीत झिलईदार रंगीबेरंगी कौलसजावटीचा तसेच चकचकीत, रंगीत चिकणमातीच्या कुट्टिमचित्रणाचा वापर होऊ लागला. बाराव्या शतकार्धापर्यंत धातुकाम हे साचेकाम, उत्कीर्णन अशा स्वरूपाचे होते. नंतरच्या काळात ब्राँझ, पितळ ह्यांसारख्या धातूंवर रुपे अथवा तांबे ह्यांचे जडावकाम प्रचारात आले. अल्पावधीतच तांब्याऐवजी सोन्याचाही वापर होऊ लागला. वस्त्रकलेमध्ये अनेक आकृतिबंध सॅसॅनिडी शैलीला अनुसरून निर्माण झाले. ह्या काळातील मृत्पात्रांवरील चित्रणातून तत्कालीन चित्रकलेची काहीशी कल्पना येते. इराणी सुलेखनकारांनी अरबी लिपीचे कूफिक व नक्षी हे अलंकरणप्रकार विशेषत्वाने वापरले.

मंगोल-तैमूर कालखंड : (सु. १२२१–१५००). तेराव्या शतकातील मंगोल आक्रमणामुळे इराणी कलेत जडता आली. मंगोलांच्या इस्लामीकरणानंतर मात्र कलेच्या विकासास पुन्हा चालना मिळाली.

सेल्जुक कालखंडातील प्रमुख वास्तुप्रकार ह्या काळातही आढळतात. मशिदीत प्रार्थनादालनाच्या ईवानाला दुहेरी मनोर्‍यांची जोड दिलेली दिसते. कुट्टिमचित्रणाचा वापर संपूर्ण वास्तुपृष्ठाच्या सजावटीत केला गेला. काही वास्तूंची पुनर्सजावट चकचकीत रंगीत चिकणमातीच्या कुट्टिमचित्रणाचा वापर करून साधण्यात आली. सुल्तानीये (कारापनार) येथील ओल्जैतू ह्या मंगोल सम्राटाची तसेच समरकंद येथील तैमूरलंगची कबरवास्तू उल्लेखनीय आहे.

चिनी कलेचा दाट प्रभाव कमळे, ढगांचे आकार, महाकाय प्राणी, फीनिक्स अशा ज्ञापकांच्या वापरात विशेषत: जाणवतो. मृत्पात्री कला तसेच चौदाव्या शतकानंतर धातुकाम यांस उतरती कळा लागली. चौदाव्या शतकात इराणी, मेसोपोटेमियन व चिनी कलाघटकांच्या संश्लेषणातून इराणी लघुचित्रणास प्रारंभ झाला. तैमूर सम्राटांसाठी शीराझ व हेरात येथील दरबारी चित्रकारांनी चित्रनिर्मिती केली. चौदाव्या शतकातील शाहनामा  ह्या ग्रंथातील चित्रे सौष्ठवपूर्ण आकृतिबंध, प्रभावी रंगसंयोजन, वास्तवाचे सूक्ष्म तपशील व अद्‌भुतरम्य प्रतिमा ह्यांमुळे वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. त्यांतील आविष्करणात जिवंतपणा व मोकळेपणा आहे. तसेच त्यांत निसर्गचित्रणास प्राधान्य आहे. लहान शाहनाम्यातील चित्रे साधीसुधी असून त्यांत पिवळा, तांबडा, निळा, सोनेरी हे रंग उपयोजिले आहेत. पंधराव्या शतकातील बिहजाद ह्या श्रेष्ठ इराणी चित्रकाराच्या चित्रांत नितळ व सौष्ठवपूर्ण रेखांकन, रंगांचा सूक्ष्म वापर, तपशीलाचा नेमकेपणा व समूह चित्रणाविषयीचे औचित्य ह्या गुणांचा मिलाफ झाला आहे. निझामीच्या कवितांच्या सुनिदर्शनात त्याने दरबारी व युद्धाची दृश्ये, गोपजीवनातील प्रसंग, निसर्गचित्रणे, मशिदीच्या वास्तुकारांची चित्रणे आदी विषय हाताळले आहेत. सर्वसामान्यत: लघुचित्रणाचा वापर करून महाकाव्ये व अद्‌भुतरम्य काव्ये ह्यांचे सुनिदर्शन केल्याचे आढळून येते. लघुचित्रणात चमकदार, अपारदर्शी रंग वापरून संपूर्ण चित्रक्षेत्र व्यापून टाकण्याची प्रवृत्ती दिसते. यथादर्शनाच्या दृष्टीने चित्रातील दृश्ये उंच टोकावरून व चित्राच्या अगदी शिरोभागी क्षितिजरेषा गृहीत धरून काढल्यासारखी वाटतात. चित्रातील आकृत्या लहान, बाहुलीवजा व त्रिमितीचा अभाव असलेल्या दिसतात. हस्तलिखितांच्या मुखपृष्ठांची सजावट अत्यंत कौशल्यपूर्ण असे. त्यात लाजवर्दीपासून तयार केलेले निळे व सोनेरी रंग प्राधान्याने वापरले जात. चौदाशेच्या सुमारास नस्तालीक ह्या नव्या लिपी-अलंकरणाचा विकास झाला.

सफाविद कालखड : (सु. १५०१–१७३६). इराणी कलेतिहासाच्या शेवटच्या पर्वात सफाविद सम्राट शाह अब्बास ह्याने इस्फाहान येथे नगररचनेची भव्य योजना हाती घेतली. ह्यातूनच चार ईवानांच्या चौकाची कल्पना विकसित झाली. शहराच्या मध्यवर्ती एक विस्तीर्ण चौक व त्याभोवती चार कमानपथांच्या मधोमध चार प्रमुख वास्तू उभारलेल्या होत्या. राजशाही मशीद, निमत अल्लाची कबर, व्यापारपेठेची प्रवेशवास्तू व प्रासादाच्या मैदानाचे प्रवेशदालन अशा ह्या वास्तू होत. ह्या नगररचनेत पुढे वृक्षाच्छादित प्रशस्त मार्ग, नदीवरील पूल वगैरेंचाही अंतर्भाव झाला. पारंपारिक शैलीत उभारलेल्या इमारतींमध्ये इस्फाहान येथील मदरसा मादरशाह  ही वास्तू (सु. १७१४) विशेष उल्लेखनीय आहे. आधुनिक काळात सार्वजनिक वास्तूंच्या निर्मितीत पाश्चात्य प्रभावाबरोबरच ॲकिमेनिडी वास्तुघटकांचे पुनरुज्‍जीवन झाल्याचे दिसून येते. ह्या काळातील विशेष लक्षणीय प्रकार म्हणजे गालिच्यांचे विणकाम हा होय. गालिच्यांचा वापर मुख्यत: राजदरबार, मशिदी, कबरी ह्या ठिकाणी तसेच परकीय राज्यकर्त्यांना भेटी देण्यासाठीही होत असे. ताब्रीझ, काशान, इस्फाहान, येझ्द, केरमान, हेरात ही विणकामाची प्रमुख निर्मितिकेंद्रे होत. या काळातील मृत्पात्री व धातुकाम यांवर चिनी आकृतिबंधांचे स्वैर दर्शन आढळते. रेशमी विणकामावर गुलाब, बुलबुल, फुलपाखरे यांचे आकृतिबंध आढळतात. सतराव्या शतकाच्या अखेरीस शीराझ येथे काचेचे, विशेषत: चित्रविचित्र आकारांच्या बाटल्यांचे, उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत होते. शाह अब्बासच्या कारकीर्दीपर्यंत लघुचित्रणाची कला जोमात होती. सोळाव्या शतकातच रंगांचा समृद्ध वापर करणारी शैली मागे पडू लागली. उत्तरकालीन चित्रकार चित्रातील प्रमुख आकृत्या सुलेखनसदृश शैलीने व समृद्ध रंगांचा वापर करून चितारीत.

साधारणतः १७०० नंतर बहुतेक इराणी कलाप्रकारांना अवकळा प्राप्त होत गेली. आधुनिक इराणमध्ये प्राचीन कलापरंपरांचे पुनरुज्‍जीवन करण्याचे प्रयत्‍न दिसून येतात. आजच्या कला-उद्योगांमध्ये गालिचे, मृत्पात्री, छटेदार लाकडी तुकड्यांचे जडावकाम (इंटार्सीआ), रुप्यावरील कुसरकाम तसेच काष्ठ, हस्तिदंत, हस्तलिखिते ह्यांचे अलंकरण इत्यादींना प्राधान्य आहे. तेहरान येथील कलासंग्रहालय मेट्रोपॉलिटन म्युझियम, न्यूयॉर्क म्युझियम ऑफ फाइन आर्ट्‌स, बॉस्टन तसेच व्हिक्टोरिया व ॲल्बर्ट म्युझियम, लंडन या ठिकाणी इराणी कलेचे उत्तमोत्तम नमुने संगृहीत केले आहेत. (चित्रपत्रे ५१, ५२).

पहा : इराणी संस्कृति; इस्लामी कला; इस्लामी वास्तुकला.

संदर्भ : 1. Ghiershman, Roman; Trans. Gilbert, Stuart; Emmons, James, Persian Art : The Parthian and Sassanian Dynasties, New York, 1962.

2. Pope, A. U.; Ackerman, P. Ed. A Survey of Persian Art, 13 Vols., New York, 1965.

इनामदार, श्री. दे.

पक्वमृदेचा वैशिष्ट्यपूर्ण खुजा, टेपे सियाल्क, इ.स.पू. ११ वे शतक.
पंखधारी रानबकर्‍याच्या आकाराची घड्याची मूठ, माध्यमे : सोने, रुपे व ब्राँझ; ॲकिमेनिडी वंश, इ. स. पू. ५५० ते ३३१.
पेयपात्रावरील सिंहाकृती, सॅसॅनिडी वंश, ६ वे-७ वे शतक.
घोड्याचा मुखबंध, ब्राँझ, लुरिस्तान, इ. स. पू. ८ वे-७ वे शतक.
शामी येथील मंदिरातील पार्थियन सम्राटाचा ब्राँझचा पुतळा, इ.स.पू.सु. २ रे शतक.
सॅसॅनिडी सम्राटाचा ब्राँझचा अर्धपुतळा, ६वे-७ वे शतक.
सम्राटाला मानवंदना देणारे राष्ट्रप्रतिनिधी, उत्थित शिल्प, पर्सेपलिस, इ.स.पू. ३५९.
बैलावर हल्ला करणारा सिंह, पर्सेपलिस येथील मुख्य जिन्याच्या पूर्वेकडील उत्थित शिल्प, इ.स.पू. ६ वे-५ वे शतक.
ब्राँझचा कळस, लुरिस्तान, इ.स.पू. १२००-७००.
सायरसचे थडगे, पसारगडी, इ.स.पू.सु. ५३०.
तिरंदाज : डरायसच्या प्रासादातील भित्तिसजावट, स्यूसा, इ.स.पू. ५ वे शतक.
लंबवर्तुळाकृती गोमेदवर कोरलेले पहिल्या शापूरच्या व्हॅलेरियनवरील विजयाचे दृश्य, इ.स. ४ थे शतक.