उंडण : (कडवी उंडी; हिं. सर्पन, सुलतान चंपा; गु. उडी; क. सुरहोन्ने; सं. पुन्नागा; इं. स्वीट सेंटेड कॅलोफायलम, अलेक्झांड्रियन लॉरेन; लॅ. कॅलोफायलम इनोफायलम; कुल-गटिफेरी). हा भव्य, शोभिवंत व सदापर्णी वृक्ष मूळचा पूर्व व पश्चिम भारतातील समुद्र किनाऱ्याच्या प्रदेशातील असून ब्रह्मदेश, श्रीलंका, अंदमान बेटे, ईस्ट इंडीज बेटे, मलाया, ऑस्ट्रेलिया, पॉलिनीशिया इ. ठिकाणीही आढळतो. समुद्रकिनाऱ्याजवळ याची लागवडही केली असून शिवाय कित्येक उद्यानांतून व रस्त्यांच्या दुतर्फा लावलेला दिसतो. केरमान (इराण) व सिंध या दरम्यानच्या मैदानी प्रांतात प्रथम अलेक्झांडरच्या सैन्यास तो आढळला व अरियनने वर्णिलेल्या लॉरेल वृक्षाच्या सुवासिक पांढऱ्या फुलांच्या साम्यावरून ते यालाच लॉरेल असे समजले व त्यावेळेपासून याला‘अलेक्झांड्रियन लॉरेल’ असे नाव पडले तो खरा ⇨ लॉरेल वृक्ष नव्हे.
ह्या वृक्षाचे खोड सु. १५–१८ मी. उंच व १·५–४ मी. घेराचे असून त्याची साल काळी, खवलेदार व भेगाळ असते. पाने गर्द हिरवी, चकचकीत, जाड, चिवट व साधी असून त्यावर बाजूच्या उपशिरा समांतर दिसतात. डिसेंबर-जानेवारीत, पानांच्या बगलेत सुंदर, सुगंधी, आखूड देठांच्या व पांढऱ्या फुलांच्या (व्यास २·५ सेंमी.) मंजऱ्या येतात. सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ गटिफेरी कुलात वर्णिल्याप्रमाणे. संदले व प्रदले प्रत्येकी चार केसरदले अनेक व त्यांचे ४–६ संघ बनलेले किंजल्क छत्रासारखा, किंजल लांब पिळवटलेले किंजपुटात एक कप्पा व त्यात एकच बीजक [→ फूल]; अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळ २-३ सेंमी. व्यासाचे, हिरवट पिवळे व गुळगुळीत बीज एक, मोठे व अंडाकृती. परिस्थितिनुसार फुलांचा मोसम भिन्न असतो.
या वृक्षाच्या सालीपासून मिळणारा तपकिरी डिंक सुगंधी, वांतिकारक, रेचक, वेदनाहारक असून सूज उतरवण्यास व जखमा भरून येण्यास वापरतात.
बियांचे तेल स्थिर, न सुकणारे, गर्द हिरवे व दुर्गंधी असून त्याला डोंबा तेल, पिने तेल, कडू तेल, दिलो तेल इ. नावे आहेत. ते साबण, रोगण (होड्यांना व नावांना बाहेरून लावण्यास), दिवे, औषधे इत्यादींकरिता मोठ्या प्रमाणात वापरतात चर्मरोगांवर बाहेरून लावण्यास व संधिवातावर बाहेरून चोळण्यास उपयुक्त. सालीचा रस तीव्र रेचक काढा जखमा धुण्यास घेतात अंतर्गत रक्तस्रावावर साल स्तंभक (आकुंचन करणारी) म्हणून वापरतात. पानांचा फांट (काढा) डोळे आल्यास वापरतात व भुकटी घेरी आल्यास तपकिरीप्रमाणे ओढतात. लाकूड कठीण, टिकाऊ व वाळवीपासून सुरक्षित असल्याने होड्या, जहाजे, घरबांधणी, कपाटे, रेल्वे-स्लीपर्स (रूळांखाली टाकण्यात येणारे ओंडके), प्लायवुड इत्यादींकरिता फार चांगले असते त्याचे व्यापारी नाव ‘पून’ आहे.
पहा : बोब्बी; सुरंगी.
महाजन, मु. का.