ईस्टमन, मॅक्स फॉरेस्टर : (४ जानेवारी १८८३–२५ मार्च १९६९). एक अमेरिकन संपादक व लेखक. कॅननडेग्वा येथे जन्म. १९०५ मध्ये पदवी संपादन केल्यानंतर कोलंबिया विद्यापीठात अध्यापन (१९०७–११). द मासेस (१९१३–१७) व द लिबरेटर (१९१८–२२) या मासिकांचे संपादन त्यांतून डाव्या समाजवादी विचारांचा त्याने प्रचार केला. पुढे त्याने साम्यवादी पक्षात प्रवेश केला परंतु १९२३ मध्ये पक्षत्याग करून रशियन साम्यवादाचा तो कट्टर विरोधक बनला. द एंड ऑफ सोशॅलिझम इन रशिया (१९३७) व मार्क्सिझम : इज इट सायन्स? (१९४०) ही त्याची पुस्तके विशेष गाजली. १९४१ पासून रीडर्स डायजेस्ट मासिकाचा फिरता संपादक म्हणून त्याने काम केले व अमेरिकन मर्क्युरीसारख्या अनेक नियतकालिकांतून सद्यःस्थितीवर लेखन केले. अलेक्झांडर पुश्किन, कार्ल मार्क्स व लीअन ट्रॉट्स्की यांच्या ग्रंथांच्या भाषांतरांशिवाय काइंड्स ऑफ लव्ह (१९३१), पोएम्स ऑफ फाइव्ह डीकेड्स (१९५४) यांसारखे आपले काव्यसंग्रहही त्याने प्रसिद्ध केले. त्याच्या इतर काही उल्लेखनीय ग्रंथांमध्ये एन्जॉयमेंट ऑफ पोएट्री (१९१३) हे पुस्तक व एन्जॉयमेंट ऑफ लिव्हिंग (१९४८) या आत्मचरित्राचा अंतर्भाव होतो. ब्रिजटाऊन येथे तो निधन पावला.
गोखले, विमल