ईल : अँग्विलिडी मत्स्यकुलातील अँग्विला वंशाचा मासा. या वंशाचे मासे गोड्या पाण्यात राहणारे असून यूरोप, उत्तर अमेरिका, जपान, भारत इ. प्रदेशांत आढळतात. यूरोपीय जातीचे नाव अँग्विला अँग्विला आणि भारतीय जातीचेअँग्विला बेंगालेन्सिस असे आहे. भारतीय ईलचे मराठी नाव अहीर आहे.
याचे शरीर सापासारखे असून लांबी १·५ सेंमी. पर्यंत असते. श्रोणि-पक्ष (ढुंगणावर असणारे पर म्हणजे हालचालीस अथवा तोल सांभाळण्यास उपयुक्त त्वचेच्या स्नायुमय घड्या) नसतात. बहुतेक जातींत लांब पृष्ठ-पक्ष आणि गुद-पक्ष शेपटाच्या टोकावर एकमेकांना मिळून एक अखंड पक्ष तयार होतो. शरीरावर खवले नसून त्वचा बुळबुळीत असते. ईल मांसाहारी आहे.
ईल माशाचे जीवनवृत्त असामान्य आहे. डेन्मार्कमधील जीवशास्त्रज्ञ योहान्नेस श्मिट यांनी १६ वर्षे संशोधन करून यूरोपीय ईलच्या जीवनवृत्ताचा उलगडा केला आहे. यूरोपीय ईलची पैदास वसंतऋतूत सरगॅसो समुद्रात वेस्ट इंडिजच्या ईशान्येस होते. शेकडो किलोमीटरांचा प्रवास करून नदीतून हे मासे पैदास-क्षेत्रात जातात व अंडी घातल्यावर मरतात. अंड्यांतून बाहेर पडणाऱ्या डिंभांना (डिंभ म्हणजे भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी पूर्वावस्था) ‘लेप्टो-सेफॅलस’ म्हणतात. ते चपटे व पारदर्शक असून त्यांची लांबी सु. ६ मिमी. असते. येथून हे डिंभ ‘गल्फ स्ट्रीम’ च्या साहाय्याने आइसलँड, यूरोप आणि उत्तर आफ्रिकेच्या किनाऱ्यावर त्याचप्रमाणे भूमध्य समुद्रात जातात. किनाऱ्यावर पोहोचण्याच्या सुमारास ते तीन वर्षांचे आणि ७ – ८ सेंमी. लांब असतात. या ठिकाणी त्यांचे रूपांतर होऊन शरीर दंडगोलाकार होते, पण ते पारदर्शकच असते. या अवस्थेला ‘एल्व्हर’ किंवा ‘काच-ईल’ म्हणतात. यानंतर वसंतऋतूत एल्व्हर नदीमुखातून नदीत शिरतात. यावेळी त्यांचे शरीर वर्णकित (रंगीत) होते आणि ते लहान ईल माशांसारखे दिसतात. नर नदीमुखाच्या जवळपासच्या टप्प्यातच राहतात, पण माद्या नदीत फार दूरवर जातात काही ओढे आणि तलावात शिरतात. या ठिकाणी त्यांची पूर्ण वाढ होते. त्यांचा रंग पिवळसर-करडा असतो. माद्या गोड्या पाण्यात ९–१९ वर्षे राहतात. या काळाच्या अखेरीस त्यांचा रंग रुपेरी होतो, डोळे मोठे होतात, त्या अन्न खात नाहीत आणि समुद्रातील पैदास-क्षेत्राकडे जाऊ लागतात. नर ७–१२ वर्षे गोड्या पाण्यात राहिल्यावर रुपेरी होतात आणि नंतर समुद्रात जातात.
विद्युत् ईल : हा खऱ्या ईल माशासारखा जरी दिसत असला तरी याचा त्याच्याशी काही संबंध नाही. इलेक्ट्रोफोरिडी मत्स्यकुलातील इलेक्ट्रोफोरस वंशातील हा मासा असून त्याचे शास्त्रीय नाव इलेक्ट्रोफोरस इलेक्ट्रिकस असे आहे. हा गोड्या पाण्यात राहणारा असून दक्षिण अमेरिकेत आढळतो.
याचे शरीर दंडगोलाकार असून लांबी ९० सेंमी. पेक्षा जास्त असते. २.४ मी. लांबीचे विद्युत् ईल देखील आढळले आहेत. शरीराचा ४/५ भाग शेपटीने व्यापलेला असतो. पृष्ठ-पक्ष आणि श्रोणि-पक्ष नसतात. पुच्छ-पक्ष लांब व गुद-पक्षाशी सलग असतो. खवले नसतात. गुदद्वार गळ्याच्या अधर (खालच्या) पृष्ठावर असते. रंग हिरवा-तपकिरी प्रौढाच्या डोक्याची खालची बाजू आणि गळा चकचकीत नारिंगी रंगाचा असतो.
शेपटीच्या दोन्ही बाजूंना तिच्या लांबीभर एकेक विद्युत् अंग (वीज उत्पन्न करणारे इंद्रिय) असते. ते ‘इलेक्ट्रोब्लास्ट’ (विद्युत् उत्पादक) या घटकांचे बनलेले असून त्यांची मांडणी शुष्क विद्युत् घटमालेच्या विद्युत् घटांसारखी असते. या माशाला स्पर्श केल्याबरोबर जोराचा धक्का बसतो. मासे, उभयचर (पाण्यात व जमिनीवर संचार करणारे प्राणी) आणि घोड्यासारखे मोठे सस्तन प्राणी याने दिलेल्या विजेच्या धक्क्याने मूर्च्छित होतात किंवा मरतात. मनुष्य हा धक्का फारच थोडा वेळ सहन करू शकतो. हा धक्का सु. ३०० व्होल्टइतक्या विद्युत् दाबाचा असतो. हा मासा भक्ष्याला मूर्च्छित करण्याकरिताच विद्युत् धक्क्यांचा उपयोग करतो.
कर्वे, ज. नी.