ईनिड : लॅटिन भाषेतील एक विदग्ध महाकाव्य. रोमन महाकवी ⇨ व्हर्जिल याने आयुष्याच्या अखेरीअखेरीस ते लिहिले (इ.स.पू. ३० ते १९); पण ते अपुरे असून सध्या त्याचे बाराच सर्ग उपलब्ध आहेत.
ह्या महाकाव्यातील कथानकाची पार्श्वभूमी अशी : ट्रॉय पडल्यानंतर इनीअस ट्रोजनांचा प्रमुख नेता होतो. नवी राजधानी वसविण्यासाठी योग्य अशा ठिकाणच्या शोधार्थ तो आणि त्याची सेना एकवीस गलबतांतून समुद्रपर्यटनास निघतात. सोबत इनीअसचा पिता अंकायसीझ आणि पुत्र ॲस्कनियस हे असतात. भूमध्ये समुद्रातून सात वर्षे भ्रमंती केल्यानंतर ते पश्चिम सिसिलीच्या किनाऱ्यावर येतात. तेथे अंकायसीझ मरण पावतो.
ईनिडच्या पहिल्या सर्गाच्या आरंभी इनीअस सिसिलीहून इटलीकडे निघालेला दिसतो. ज्यूनो ही देवता त्यांच्या मार्गात अडथळे आणण्यासाठी समुद्रात वादळे निर्माण करते. भविष्यकाळात ट्रोजन वंशाकडून तिला प्रिय असलेल्या कार्थेज शहराला धोका आहे, हे जाणून ती हे करते. ह्या वादळांना तोंड देऊन इनीअस कार्थेजमध्ये येतो. कार्थेजची राणी डायडो त्याला आसरा देते आणि लवकरच व्हीनस देवतेच्या योजनेनुसार इनीअसच्या प्रेमात पडते. दुसऱ्या आणि तिसऱ्या सर्गांत डायडोच्या आग्रहावरून इनीअस तिला ट्रॉयचा पराभव आणि त्यानंतर घडलेल्या घटना सांगतो. चौथा सर्ग आहे इनीअस आणि डायडो ह्यांच्या प्रेमपूर्तीचा आणि वियोगाचा. ह्या सर्गाच्या शेवटी ज्यूपिटर ह्या देवतेच्या आज्ञेने इनीअस कार्थेज सोडून निघतो आणि डायडो आत्महत्या करते. पाचव्या सर्गात इनीअस सिसिलीला परत येऊन आपल्या वडिलांचा मृत्युदिन साजरा करतो. त्या निमित्ताने अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. चौथ्या सर्गाने निर्माण केलेले भावनात्मक ताण ह्या सर्गातील खेळांच्या वातावरणाने बऱ्याच प्रमाणात हलके होतात. सहाव्या सर्गात इनीअस इटलीतील क्यूमी येथे येतो. तेथून तो पाताळात भ्रमण करतो. ह्या भ्रमंतीत एलिझियममध्ये म्हणजे पुण्यात्म्यांच्या निवासस्थानी त्याला त्याचे वडील भेटतात. भविष्यकाळातील कर्तृत्ववान रोमन वीर ते त्याला दाखवतात. त्यात रोम्युलसपासून स्वत: ऑगस्टस तसेच त्याच्या पुतण्या मार्सेलसपर्यंतचे अनेकजण असतात. सातव्या सर्गात टायबर नदीच्या मुखातून आत शिरणाऱ्या इनीअसच्या ट्रोजन सेनेचे इटालियन फौजांबरोबर युद्ध सुरू होण्यापर्यंतचा कथाभाग आलेला आहे. ह्या युद्धाला अनेक गोष्टी कारणीभूत होतात. पण लेशियमची राजकन्या लॅव्हिनिया हिच्या विवाहाची बाब त्यांत प्रमुख असते. लेशियमचा राजा लॅटिनस लॅव्हिनियाचा विवाह इनीअसशी करण्याचे ठरवितो. तथापि राणी ॲमाटा हिचा त्यास प्रखर विरोध असतो. लॅव्हिनियाचा विवाह टर्नस ह्या ऱ्युट्लीच्या राजाशी व्हावा, अशी तिची इच्छा असते. हा सारा बेबनाव ज्यूनोमुळे घडून येतो, असे व्हर्जिलने दाखविले आहे. आठ ते बारा ह्या सर्गांत इटालियन फौजा आणि ट्रोजन सेना ह्यांच्यात झालेल्या युद्धाचे विस्तृत वर्णन आले आहे. युद्धाच्या अखेरीस टर्नस आणि इनीअस ह्यांचे द्वंद्व होऊन त्यात टर्नस मारला जातो. त्यानंतर इनीअस आणि लॅव्हिनिया ह्यांचा विवाह सूचित केलेला आहे. युद्धातील बारीकसारीक बाबतींत अनेक देवदेवता लक्ष घालतात, असे दाखविण्यात आले आहे.
ईनिडच्या पहिल्या सहा सर्गांवर ⇨ ओडिसीचा प्रभाव असून नंतरच्या सहा सर्गांवर ⇨ इलिअडचा आहे. इनीअसच्या भ्रमंतीवर ओडिसीमधील ओडिससच्या साहसकथांचा परिणाम जाणवतो. ट्रोजन-इटालियन युद्धादी वर्णने इलिअडची आठवण करून देतात. खरोखरी पाहता ईनिडमध्ये इलिअडचीच कथा पुढे नेलेली दिसते. तथापि इलिअड आणि ओडिसी ही आपल्याकडील रामायणाप्रमाणे आर्ष महाकाव्ये [→ महाकाव्य] असून ईनिड हे कालिदासाच्या रघुवंशाप्रमाणे विदग्ध महाकाव्य आहे. युरिपिडीझसारख्या ग्रीक नाटककारांचाही ईनिडवर परिणाम झालेला आहे.
रोमन राष्ट्रवादाचा पुरस्कार तसेच ऑगस्टसच्या राजवटीचे समर्थन करण्याचा प्रयत्न ईनिडमध्ये जाणवतो. ईनिडचा राष्ट्रीय महाकाव्य म्हणून गौरव केला जातो, तो ह्याच कारणासाठी. इटली हे एकात्म राष्ट्र असल्याची जाणीव ह्या महाकाव्यातून व्यक्त होते, ही गोष्ट विशेष लक्षणीय आहे. मानवी दु:ख आणि यातना ह्यांबद्दल व्हर्जिलला वाटणारी अपार सहानुभूती ह्या महाकाव्यातून प्रकर्षाने प्रत्ययास येते. एक तरल हळवेपणा ईनिडमध्ये सर्वत्र भरून राहिला आहे.
ह्या महाकाव्यातील इनीअस, ॲस्कनियस, डायडो, लॅटिनस, लॅव्हिनिया, ॲमाटा, टनर्स इ. अनेक व्यक्तिरेखा ह्या जिवंत व्यक्ती वाटत नाहीत, तर अमूर्त प्रतीके वाटतात. उदा., ह्या महाकाव्याचा नायक इनीअस हा कर्तव्यबुद्धी, प्रज्ञा, संयम, भावनांचा समतोलपणा, संकटांना सहनशीलपणे सामोरे जाण्याची वृत्ती ह्यांसारख्या रोमन वैशिष्ट्यांचा आणि ‘स्टोइक’ तत्त्वांचा पुतळा वाटतो.
ईनिडचे यूरोपीय साहित्यातील स्थान आणि प्रभाव वादातीत आहे. सेसिल डे ल्यूइस ह्याने ईनिडचा इंग्रजी पद्यानुवाद केला आहे (१९५२). विल्यम फ्रान्सिस जॅक्सन नाइट ह्याने त्याचा गद्यानुवाद केला आहे. (१९५६).
संदर्भ : 1. Bowra, C. M. From Virgil to Milton, London, 1945.
2. Knight, W. F. J. Roman Virgil, London, 1944.
3. Prescott, H. W. The Development of Virgil’s Art, Chicago, 1927.
4. Putnam, M. C. J. Poetry of the “Aeneid” : Four Studies in Imaginative Variety and Design, Cambridge (Massachusetts), 1965.
कुलकर्णी, अनिरुद्ध