उदार शिक्षण : इंग्रजीतील ‘लिबरल एज्युकेशन’ह्या संज्ञेसाठी ‘उदार शिक्षण’ही मराठी संज्ञा रूढ झाली आहे. मूळ लॅटिनमध्ये ‘लिबरलिस’(Liberalis) ह्या संज्ञेचा अर्थ ‘स्वतंत्र’असा आहे. म्हणून लिबरल शिक्षण म्हणजे स्वतंत्र माणसाला साजेसे शिक्षण, प्राचीन ग्रीक किंवारोमन समाजात स्वतंत्र नागरिक आणि गुलाम असे जेदोन वर्ग होते, त्यांतील भेद येथे अभिप्रेत आहे. स्वतंत्र नागरिकाची बुद्धी, भावना, नैतिक व आध्यात्मिक शक्ती ह्यांचा सर्वांगीण व समतोल विकास साधण्यासाठी जे शिक्षण दिले जात असे, ते उदार शिक्षण. उदार शिक्षण ही संकल्पना तिच्यात उचित असा बदल करून सामान्य शिक्षण, मानवतावादी शिक्षण इ. नावांनी अमेरिकेत आणि इतर प्रगत देशांत अलीकडे स्वीकारण्यात आली आहे. उदार शिक्षणाच्या अनेक व्याख्या करण्यात आल्या आहेत आणि त्याच्या उद्दिष्टांत व आशयांत कालमानाप्रमाणे बदल करण्यात आले आहेत. ॲरिस्टॉटल ह्या ग्रीक तत्त्ववेत्त्याच्या मताप्रमाणे, ‘‘तत्त्वज्ञान व विज्ञान ह्यांचा आशय असलेल्या सत्याच्या चिंतनाद्वारा मानवी व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक व आत्मिक विकास साधणे’’, हे उदार शिक्षणाचे प्रमुख लक्षण आहे. त्याने कारागिरांना देण्यात येणारे व्यावसायिक, धंदेवाईक शिक्षण आणि उदार शिक्षण ह्यांत काटेकोरपणे व सुसंगतपणे भेद केला आहे. बुद्धी ही माणसाची सर्वश्रेष्ठ शक्ती आहे, तात्त्विक सत्य शोधून काढण्यात व त्याचे चिंतन करण्यात बुद्धीचे साफल्य असते, बुद्धीचे साफल्य म्हणजे माणसाचे सर्वश्रेष्ठ व स्वयंपूर्ण असे कल्याण होय. उलट माणसांच्या गरजा भागविण्यासाठी करावे लागणारे सर्व व्यवहार, जरी त्यांचे मार्गदर्शन बुद्धीकडून होत असले तरी, कनिष्ठ असतात अशी ॲरिस्टॉटलची भूमिका होती. म्हणून विज्ञान आणि तत्त्वज्ञान ह्यांच्या द्वारा मानवी बुद्धीचा विकास साधू पाहणारे उदार व स्वतंत्र शिक्षण श्रेष्ठ आहे व सर्व तऱ्हेचे केवळ उपयुक्त असलेले व्यावसायिक शिक्षण कनिष्ठ आहे, असे त्याचे मत होते. सिसेरो व क्विंटिल्यन ह्या रोमन विचारवंतांनी उदार शिक्षणाची व्याख्या थोडी बदलली व अधिक व्यापक केली. राजकीय आणि सामाजिक व्यवहारांत योग्य प्रकारे भाग घेता यावा, म्हणून स्वतंत्र नागरिकास जे व्यापक शिक्षण दिले जाते, ते उदार शिक्षण, ही कल्पना त्यांनी मांडली. कारागिरीचे किंवा व्यावसायिक शिक्षण हीन आहे, ही कल्पना अर्थात ह्या मतात अभिप्रेत होतीच. मध्ययुगात शिक्षण प्रामुख्याने भावी धर्मगुरूंसाठी योजिलेले होते व त्याचा आशय बौद्धिक व आध्यात्मिक होता. म्हणजे उदार शिक्षणाची ग्रीक व रोमन कल्पना मध्ययुगातही मूळ धरून होती. प्रबोधनकाळात ग्रीक साहित्य व संस्कृती ह्यांच्या परिचयामुळे उदार शिक्षणाच्या कल्पनेचे जोमाने पुनरुज्जीवन झाले. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी द्यावयाचे शिक्षण हे त्याचे मूळ ग्रीक उद्दिष्ट पुढे स्वीकारले गेले. सुसंस्कृतपणाचे एक लक्षण म्हणून विद्यापीठांतून उदार शिक्षण घेण्याची प्रथा यूरोपातील उच्चवर्गीय तरुणांत रूढ झाली. कनिष्ठ वर्गातील काही होतकरू तरुणही त्या शिक्षणाचा लाभ घेऊन कायद्याच्या किंवा धार्मिक व्यवसायात प्रवेश मिळवू लागले. पण एकोणिसाव्या व विसाव्या शतकांतील सामाजिक समतेच्या युगात उदार शिक्षणाचा हा संकुचित व वर्गीय अर्थ कालबाह्य ठरला. ह्या कल्पनेचा नव्याने अर्थ करावा लागला. जॉन ड्यूईच्या मते, मानवी मनाची सर्व तऱ्हांच्या संकुचितपणापासून मुक्तता करणारे शिक्षण म्हणजे उदार शिक्षण. व्यक्तीला संस्कृतीचा परिचय करून देणे आणि तिचे संवर्धन करण्याची प्रवृत्ती व शक्ती तिच्या ठिकाणी निर्माण करणे, हे उदार शिक्षणाचे उद्दिष्ट असते, असे इ. एस्. वुडवर्डने म्हटले आहे. उच्चवर्गीय सुखवस्तू व्यक्तींनी फुरसतीच्या वेळात ज्ञानसाधना कशी करावी ह्याचे शिक्षण देणे, ह्या उद्देशाऐवजी समाजातील कुणाही व्यक्तीला चांगले जीवन जगता यावे, जीवनातील अंतिम मूल्यांची साधना तिला करता यावी आणि आदर्श नागरिक म्हणून जगता यावे, यांसाठी तिची मानसिक पूर्वतयारी करून घेणे, हे उदार शिक्षणाचे उद्दिष्ट ठरले.
उदार शिक्षणाची सुरुवात प्राचीन ग्रीसमध्ये अथेन्स ह्या नगरात झाली. हे शिक्षण स्वतंत्र नागरिक असलेल्या उच्चवर्णीयांपुरते मर्यादित होते. हस्तोद्योग व काबाडकष्टाची कामे करणाऱ्या गुलामांना शिक्षण देण्यात येत नसे. स्वतंत्र नागरिकच राज्यकारभारात भाग घेऊ शकत आणि त्यांना उत्कृष्ट नागरिक बनविणे, हे ह्या शिक्षणाचे ध्येय होते. शिक्षणक्रमात व्यायाम, संगीत, व्याकरण, अंकगणित, भूमिती, ज्योतिष, तर्कशास्त्र इ. विषयांचा अंतर्भाव होई. ॲरिस्टॉटलला उपयुक्त शिक्षणाची आवश्यकता भासत होती पण जे उदार शिक्षण घेण्याला पात्र नाहीत, त्यांच्यासाठीच हे शिक्षण असावे, असे त्याचे मत होते. रोमन काळात सिसेरोने ग्रीकांपासून स्फूर्ती घेऊन उच्चवर्गीय मुलांसाठी ग्रीक पद्धतीच्या शिक्षणाचा पुरस्कार केला आणि असे शिक्षण रूढही झाले. शिवाय ग्रीक काळात शिकविण्यात येणाऱ्या सात विषयांत अभियांत्रिकी व कृषी ह्या दोन विषयांची भर पडली. पुढे पाचव्या शतकात मार्शिएनस कापेला ह्याने त्रिविधात्मक पद्धतीचा पुरस्कार केला तीत व्याकरण, अलंकारशास्त्र व तर्कशास्त्र हे प्रमुख विषय होते. काही काळानंतर अंकगणित, भूमिती, ज्योतिष व संगीत ह्या चार विषयांना मध्यवर्ती स्थान लाभले. मध्ययुगात शिक्षण हे प्रामुख्याने भावी धर्मगुरूंसाठी होते. शिक्षणाचे उद्दिष्ट बौद्धिक व आध्यात्मिक संस्कार करणे, हे होते. त्यामुळे बौद्धिक शिक्षण आणि व्यावहारिक वा उपयुक्त शिक्षण हा ग्रीकांनी केलेला भेद वेगळ्या स्वरूपात स्थिर झाला. बाराव्या शतकात अभ्यासक्रमात वर उल्लेखिलेल्या विषयांशिवाय ॲरिस्टॉटलच्या ग्रंथांचा समावेश करण्यात आला. प्रबोधनकाळानंतर चर्चचे महत्त्व कमी होऊ लागले. अभ्यासक्रमात आधुनिक शास्त्रांचा समावेश करण्यात आला व धर्मनिरपेक्ष शिक्षणाकडे लोकांचा कल वळू लागला. पंधराव्या शतकापासून इंग्लंडमधील विद्यापीठांत देण्यात येणाऱ्या शिक्षणाचे उद्दिष्ट सभ्य, सुसंस्कृत तरुण निर्माण करणे हे होते. विद्यार्थ्यांत उच्चवर्गीयांबरोबरच काही कनिष्ठवर्गीय होतकरू तरुणही असत. ग्रीक व लॅटिन ह्या अभिजात भाषा, त्यांतील वाङ्मय, त्यांचे व्याकरण, अलंकारशास्त्र हे ह्या अभ्यासक्रमातील मध्यवर्ती विषय होते. उदार शिक्षणाच्या उद्दिष्टांविषयीची ही कल्पना व त्याचा आशय ही गेली अनेक शतके स्थिर होती. अलीकडे उदार शिक्षणात सर्व विषयांचा समावेश असावा, अशी एक विचारसरणी आहे. तीनुसार कोणत्याही धंद्याचे वा व्यवसायाचे प्रावीण्य मिळवून देणारे शिक्षण नसावे ह्या शिक्षणानंतर विद्यार्थ्यास एक विशाल मानवतावादी दृष्टिकोन येईल व तो बहुश्रुत होईल त्याचे विचार सुस्पष्ट होतील अशी भूमिका मांडली जाते. गेल्या दहा वर्षांत उदार शिक्षणाच्या अभ्यासक्रमाविषयी हॅरी हचिंझ व फेलिक्स ॲड्लर ह्या अमेरिकेतील शिक्षणतज्ञांनी परिश्रमपूर्वक काही कार्यक्रम आखला असून त्यात सु. शंभर मौलिक विचारवंतांच्या पुस्तकांचा समावेश केला आहे. त्यांत प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक तत्त्ववेत्ते, साहित्यिक, इतिहासकार, धर्मशास्त्रज्ञ, गणितज्ञ, शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ इत्यादींचे साहित्य असून काही धर्मग्रंथांचा तसेच अमेरिकेचे संविधान ह्यांचा समावेश केला आहे. अगदी अलीकडे उदार शिक्षणात समकालीन साहित्य, धार्मिक चालीरीती व समाज तसेच साम्यवाद, फॅसिझम वगैरे राजकीय प्रणाली ह्यांचाही समावेश करावा, असे विचार प्रकट होत आहेत.
उदार शिक्षणाचा इतिहास व अभ्यासक्रम पाहिला असता असे आढळते, की दिवसेंदिवस त्याचा उद्देश अधिक विशाल व मानवतावादी शिक्षण देण्याकडे झुकत आहे. आता प्राचीन काळाप्रमाणे विशिष्ट वर्गापुरते ते शिक्षण मर्यादित राहिलेले नाही. परंतु समाजातील वाढत्या बेकारीमुळे व दैनंदिन गरजांच्या वाढीमुळे केवळ ह्या ज्ञानाचा पाठपुरावा करणारी माणसे फार थोडी आहेत व लोकांचा कल विशेष प्रावीण्य मिळवून देणाऱ्या शिक्षणाकडे अधिक आहे. आता श्रमप्रतिष्ठेला मानाचे स्थान मिळाले असून व्यक्तिविकासाच्या दृष्टीने श्रमाचे काम व हस्तोद्योग ह्या दोहोंनाही प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. तसेच विचारस्वातंत्र्याला चालना मिळाली आहे. पण संस्कारी शिक्षण व तांत्रिक शिक्षण यांमध्ये जो विरोध होता, तो मात्र भ्रामक ठरला. जे शिक्षण तांत्रिक नाही, ते परिपूर्ण संस्कारी शिक्षण होणार नाही म्हणजेच परिपूर्ण शिक्षणात बौद्धिक विकास व तांत्रिक ज्ञान या दोन्हींचा योग्य मिलाफ व्हावयास पाहिजे तेव्हाच व्यक्तीचा सर्वांगीण विकास होईल ही विचारसरणी आता पुढे येत आहे.
भारतात वेदकाळापासून ज्ञानसंवर्धन व संस्कृतिसंवर्धन ह्यांचा पाठपुरावा केलेला आढळतो. मौर्यकाळात व नंतर गुप्तकाळात ब्राह्मणवर्ग परिपूर्ण ज्ञानी होण्याचा व संस्कृतिसंवर्धन करण्याचा प्रयत्न करीत होता. ते मर्यादित अर्थाने उदार शिक्षणच होते व ब्रिटिशांच्या आगमनापर्यंतही ही ब्राह्मणशिक्षणपरंपरा अस्तित्वात होती. इंग्रजी अंमलात माध्यमिक शाळांमध्ये भाषा, व्याकरण, इतिहास, भूगोल, गणित या विषयांचा अभ्यास होई. हस्तोद्योग, श्रमिक शिक्षण, तांत्रिक शिक्षण यांकडे दुर्लक्ष केले गेले. महाविद्यालयांतही आधुनिक व प्राचीन भाषा, अर्थशास्त्र, इतिहास, गणित, निसर्गशास्त्रे, तर्कशास्त्र इत्यादींचा अभ्यास होई. पुढे राष्ट्रीय शाळांत हस्तोद्योगाला संस्कारी शिक्षणात वरचे स्थान दिले गेले. स्वातंत्र्योत्तर काळात हस्तोद्योगांना अधिक चालना मिळून श्रमाला योग्य स्थान मिळाले. तांत्रिक विद्यालये उघडली गेली. व्यक्तीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जसे बौद्धिक किंवा उदार शिक्षण पाहिजे, तसेच त्याचे तंत्रज्ञानही विकसित व्हावयास पाहिजे, ही नवी शैक्षणिक दृष्टी भारतात रूढ होत आहे. या दृष्टीने सर्व शिक्षणपद्धतीत क्रियात्मक अभ्यास, निरीक्षणात्मक व कौशल्यात्मक हस्तकृतींवर भर देण्यात येत आहे. कार्यानुभव हा शिक्षणाचा अविभाज्य भाग सर्व स्तरांवर मानला जावा, असा आता दृष्टिकोन आहे. पोशाखी सुशिक्षिताऐवजी स्वयंपूर्ण जबाबदार नागरिक बनविणे, हे शिक्षणाचे ध्येय मानले जात आहे.
पहा : सामान्य शिक्षण
संदर्भ :1. Martin, E. D. The Meaning of Liberal Education, New York, 1926.
2. Livingstone, R. W. The Future in Education, New York, 1941.
3. Greene, T. M. & others, Liberal Education Re- examined, New York, 1941.
4. Parikh, G. D. General Education and Indian Universities, Bombay, 1962.
देशपांडे, सु. र.
“