ईजिप्शियन भाषा: ईजिप्तची प्राचीन भाषा ही इ. स. पू. ४००० वर्षांपूर्वी अस्तित्वात होती, असा निश्चित पुरावा आहे. इ. स. सातव्या शतकातही तिचा जोर ओसरलेला नव्हता. एकाच भूमीवर इतक्या दीर्घकाळपर्यंत बोलली जाणारी ही एकमेव भाषा आहे. ईजिप्तमधील ख्रिस्ती लोकांच्या धार्मिक विधींत ती अजूनही टिकून आहे. तिच्या मूळ प्रदेशाच्या बाहेर तिने कुठे आक्रमण केल्याचेही दिसून येत नाही.

प्राचीन ईजिप्शियन : ईजिप्शियनचे धातू तीन वर्णांचे असतात. तिची व्यंजनपद्धती समृद्ध होती पण ती समाधानकारकपणे पुनर्घटित करता येत नाही. कंठ्य वर्ण पुष्कळ होते. घर्षक चार होते.

क्रियापदाची रूपे धातूआधी पुरुषवाचक प्रत्यय जोडून होत. ही पद्धत पुढे नाहीशी झाली. धातूला प्रत्यय जोडले जाऊ लागले. प्रत्ययापूर्वी वर्धक प्रत्ययही कित्येकदा येत.

प्रारंभीचा पुरावा चित्ररूप आहे. त्याचा भाषिक आशय समजणे किंवा त्याचे वाचन करणे कठीण आहे. प्रत्येक चित्र वाक्यरूप आहे, शब्दरूप नाही. नंतरच्या राजसत्तेच्या काळात ग्रीक लोकांनी नोंदलेल्या राजांच्या नामावळी आहेत. सलग इतिहास मीनीझ राजापासून सुरू होतो. ह्यानेच मेंफिस शहर वसवले. दुसऱ्या व तिसऱ्या राजवंशांच्या काळात चित्रलिपीत लिहिलेले पुरावे आहेत. चौथ्या, पाचव्या व सहाव्या राजवंशांच्या काळातील बरेच साहित्य उपलब्ध आहे. त्यात धार्मिक तसेच अंत्यसंस्कारविषयक लेखन, आत्मचरित्र इ. आहेत.

लेखनपद्धती: चित्रलेखन (हायरोग्‍लिफिक लिपी ग्री. हिएरोग्‍लिफिकोन=पवित्र लेखन) परस्परांपासून भिन्न अशा अनेक आकृतींचे आहे. त्यात प्राणी, वनस्पती, वेगवेगळ्या हावभावांतील माणसे, शरीराचे भाग, पदार्थ इ. येतात. सुरुवातीपासून लक्षात येते, की काही आकृतींचा आशय त्यांनी दर्शविलेल्या कल्पनेचा नसतो. ते शब्द किंवा शब्दातील त्या आकृतीशी उच्चारदृष्ट्या साम्य असणारे भाग असतात. बरीच चित्रे दोन व्यंजनांची आहेत इतर काही तीन व्यंजनांची आहेत. स्वरांना चिन्हे नाहीत. अशा चित्रांची संख्या सु. ६०० आहे. सुरुवातीला लेखनाची दिशा वरून खाली होती, पुढे ती उजवीकडून डावीकडे झाली. शब्द वेगवेगळे लिहिले जात नाहीत [ हायरोग्‍लिफिक लिपि].

इ. स. पू. २००० पासूनची अनेक हस्तलिखिते उपलब्ध असून ती बांबूच्या लेखणीने पपायरसेवर शाईत लिहिलेली आहेत. चित्रलेखन अधिक प्रवाही झाले आहे (ग्री. हिएरातिकुस). धार्मिक व अधिकृत ऐतिहासिक लेखनाव्यतिरिक्त कायदा, शास्त्रे, गोष्टी, पत्रे यांचेही लेखन आता आढळते. भाषेतही आता फरक पडलेला आहे.

इ. स. पू. १५८० पासून प्रसिद्ध रॅमसीझ नावाने ओळखल्या जाणाऱ्या राजांचा काळ सुरू होतो. लेखनात सामान्य जनांच्या नव-ईजिप्शियन बोलीचाही प्रवेश दिसून येतो.

इ. स. पू. ७०० पासून शेवटच्या ईजिप्शियन राजांचा काळ सुरू होतो. या काळातच पुढे अलेक्झांडरचे आक्रमण झाले. या काळात जुन्या ईजिप्शियनचा वापर पुन्हा झालेला दिसतो. लेखन अधिक प्रवाही झाले आहे. त्याला डेमॉटिक (लौकिक) असे नाव आहे. या काळात इराणी, ग्रीक व रोमन लोकांचे वर्चस्व तेथे प्रस्थापित झाले व ते ख्रिस्ती धर्माच्या उदयापर्यंत टिकले. या काळापासून चित्रलेखनाचा अवास्तव आलंकारिक उपयोग सुरू झाला. या लिपीतील शेवटचे लेखन इ. स. पू. ४७० चे आहे.

कॉप्टिक: इ. स. तिसऱ्या शतकात ख्रिस्ती धर्म ईजिप्तमध्ये आला. त्याच्या धर्मग्रंथांचे लेखन ग्रीक लिपीत व लोकभाषेत सामान्य लोकांसाठी केले गेले.

कॉप्टिक लिपी चोवीस ग्रीक अक्षरे व सात डेमॉटिक अक्षरे यांची बनलेली आहे. स्वरांचे लेखन ग्रीकप्रमाणे केले जाते.

कॉप्टिकच्या अनेक बोली आहेत. ॲलेक्झांड्रियाच्या सागरी भागातील बोहेरिक. ही बोली नवव्या शतकापासून सर्व ख्रिस्ती लोकांची धर्मबोली आहे. वरच्या ईजिप्तमधील साहित्यिक व इतर बोली. सातव्या शतकात अरब आक्रमणामुळे कॉप्टिकचा वापर मागे पडून तिची वाढ खुंटली. सतराव्या शतकापासूनच ती बोलभाषा म्हणून नाहीशी झाली. केवळ धर्मसंस्कारांची भाषा म्हणून ती राहिली आहे.

पहा : ईजिप्त संस्कृति.

संदर्भ : Meillet, Antoine Cohen, Marcel. Les langues du monde Paris, 1954.

कालेलकर, ना. गो.