अकेडियन भाषा—साहित्य : इ.स.पू. २४०० ते इ.स. १०० या काळात मेसोपोटेमिया व त्यालगतचा भाग यांत बोलली जाणारी ⇨सेमिटिक भाषासमूहातील अकेडियन ही एक प्राचीन भाषा आहे. पूर्वी या प्रदेशात ⇨सुमेरियन भाषा बोलली जात होती. अकेडियनचा उत्कर्षकाळ संपल्यानंतर तिची जागा ⇨ॲरेमाइक भाषेने घेतली. जुनी अकेडियन किंवा ॲसिरियन भाषा इ.स.पू. ६५० पर्यंत प्रचलित होती. त्यानंतरच्या तिच्या बदललेल्या रूपाला अकेडियन किंवा बॅबिलोनियन हे नाव आहे. सुरुवातीला या भाषेचे केंद्र उत्तरेला अक्कड भागात होते. नंतर ते दक्षिणेला सुमेर भागात गेले आणि शेवटी पुन्हा एकदा बॅबिलन ही राजधानी असलेल्या उत्तरेकडील प्रदेशात गेले. 

पुतळ्यांखाली कोरलेले लेख आणि भाजलेल्या विटांवर लिहिलेली पत्रे व ग्रंथ यांच्यामुळे टिकून राहिलेले या भाषेचे स्वरूप लिपितज्ञांच्या प्रयत्नांनी आज आपणास समजू शकते. या भाषेची लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाणारी व बाणाग्राची आकृती असणाऱ्या चिन्हाची आहे. मूळच्या चित्रलेखनाचे ध्वनिलेखनात रूपांतर होऊन पुढे त्याची परिणती ⇨ क्यूनिफॉर्म लिपीत म्हणजेच बाणाग्र लेखनपद्धतीत झाली.

लिखित साधनांच्या साह्यायाने एखाद्या भाषेचा अभ्यास करताना, तिच्या अभिव्यक्तीसाठी वापरण्यात आलेली भिन्न भिन्न दृश्यचिन्हे, त्यांचा उपयोग व त्यांचा परस्परसंबंध इ. गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. एकंदर चिन्हे निश्चित करता आली, तरी त्यांची ध्वनिमूल्ये अनुमानानेच समजतील आणि कित्येकदा चिन्हाला चिन्ह देऊन स्वस्थ बसावे लागेल कारण त्याचे ध्वनिमूल्य माहीत नसते. जुन्या लिपीच्या बाबतीत अडचणी लक्षात घ्याव्या लागतात.अकेडियन भाषेची ध्वनिपद्धती स्थूलमानाने पुढीलप्रमाणे आहे :

स्वर : इ, ए, उ, आ   

व्यंजने : ओष्ठ्य : प, ब               

दंत्य : त, द               

मृदुतालव्य : क,ग               

कंठ्य : ट, व, क               

घर्षक : स, श, झ, ह               

अनुनासिक : म, न               

द्रव : र,ल 

अकेडियनची अभ्याससामग्री दोन हजार वर्षांच्या कालखंडात भौगोलिक दृष्टीने एकमेकांपासून दूर असलेल्या भागांत विखुरलेली आढळते. तिच्यात असलेले स्थानिक भेद लक्षात आलेले आहेत आणि त्यांचे संशोधन सुरू आहे. 

व्याकरणाच्या दृष्टीने पाहिल्यास या भाषेतील शब्दांत तीन विकारक्षम वर्ग आढळतात : नाम, क्रियापद व सर्वनाम.नाम, विशेषण व धातुसाधित यांना लिंग, वचन व विभक्ती यांचा विकार होतो. लिंगे दोनच आहेत : पुल्लिंग व स्त्रीलिंग. वचने मात्र तीन आहेत : एकवचन, द्विवचन व बहुवचन. नामानंतर प्रत्यय लावून किंवा अंतर्गत प्रत्यय लावून अनेकवचन होते. मुख्य विभक्ती तीन आहेत आहेत : कर्तृदर्शक, कर्मदर्शक व स्वामित्वदर्शक.कर्ता, काळ व अर्थ यांच्या संदर्भात क्रियापद विकारयुक्त होते. मुख्य काळ तीन आहेत : वर्तमान-भविष्य, भूत व पूर्णभूत. 

सर्वनामांचे तीन प्रकार आहेत. काही स्वतंत्रपणे वापरता येतात, काही शब्दपूर्व प्रत्यय म्हणून आणि इतर शब्दानंतर येणारा प्रत्यय म्हणून.

कालेलकर, ना. गो. 

साहित्य : अकेडियन भाषेतील प्राचीन साहित्य विटांवर कोरलेले असून, अशा विटा ॲसिरियन व बॅबिलोनियन साम्राज्यांखालील वेगवेगळ्या भागांत सापडल्या आहेत. त्यावरील मजकूर बव्हंशी कायदा, प्रशासन व आर्थिक गोष्टी यांसंबंधीचा आहे. इ.स.पू. अठराव्या शतकापासूनचे धार्मिक व बोधप्रधान लेखन प्राचीन अकेडियन भाषेत होते. नंतरच्या काळात त्याचे पुनर्लेखन करण्यात आले. कॅसाइट काळात त्याचे काळजीपूर्वक संपादन करण्यात येऊन त्यास शास्त्रीय स्वरूप देण्यात आले. अकेडियन धार्मिक साहित्यात जगदुत्पत्तीचे महाकाव्य, पाच हजार ओळींचे गिलगामेश हे दुसरे महाकाव्य, स्तोत्ररचना व ईशप्रार्थना यांचा समावेश होतो. देवदेवस्कीसंबंधी विटांवर कोरलेले साहीत्य व शकुनांविषयी लेखनही या भाषेत आढळते. गणित व खगोलशास्त्र यांत अकेडियन लोकांनी पुष्कळ प्रगती केली होती. विज्ञानविषयावरही या भाषेत लेखन झाल्याचे दिसते. व्याकरण व कोश यांची रचनाही अकेडियन लोकांनी केली होती. कायदेविषयक लेखनात एशनुन्ना व ðहामुराबीचे कायदे विशेष प्रसिद्ध आहेत. इ.स.पू. अठराव्या शतकातील मारी हा पत्रसंग्रह व हामुराबीची प्रशासकीय पत्रे उल्लेखनीय आहेत. 

 जाधव, रा. ग.

संदर्भ : 1. Meillet, A Cohen, M. Les Langues du Monde, Paris, 1952.

           2. Reiner, Erra, A Linguistic Analysis of Akkadian Hague, 1966.