ईजिप्त : (मिस्‌र; अधिकृत : युनायटेड अरब रिपब्‍लिक). आफ्रिका खंडाच्या ईशान्येकडील राष्ट्र. याचा सिनाई द्वीपकल्पाचा भाग आशियामध्ये मोडतो. क्षेत्रफळ १०,०२,००० चौ. किमी. (पैकी ३·६% कायम वस्तीयोग्य) लोकसंख्या ३,३३,२९,००० (१९७१ अंदाज). नैर्ऋ‌त्य आशियाला लागून आणि सुएझ कालव्यामुळे यूरोप व अतिपूर्व यांच्या वाटेवर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या देशाच्या उत्तरेस भूमध्य समुद्र, ईशान्येस इझ्राएल, पूर्वेस तांबडा समुद्र व त्यापलीकडे अरबस्तान, दक्षिणेस सूदान व पश्चिमेस लिबिया आहे. जवळजवळ चौकोनी आकाराच्या या देशाचे पूर्व-पश्चिम अंतर १,२१६ किमी. व दक्षिणोत्तर अंतर १,०८० किमी. आहे. कैरो ही ईजिप्तची राजधानी आहे.

भूवर्णन : भौगोलिक दृष्ट्या ईजिप्तचे चार विभाग पडतात : दक्षिणेकडील व पश्चिमेकडील वाळवंट, नाईलचे खोरे, पूर्वेकडील वाळवंट व सिनाई द्वीपकल्प.

पश्चिमेकडील वाळवंट अथवा लिबियन वाळवंट हा सहाराचा भाग आहे. नाईलच्या किनाऱ्यापासून उंची वाढत वाढत लिबियन सीमेजवळ ३०० मी. पर्यंत पोहोचते. याच्या दक्षिणभागात वस्ती अतिशय तुरळक आहे, परंतु उत्तरभागात मरूद्याने असल्याने लोकवस्ती बरी आहे. येथे स्फटिकमय खडकावर वाळूच्या खडकांचे आवरण असलेले आढळते. तसेच मरूद्यानांचा प्रदेश स्तरभंगाने दबला गेला आहे. वायव्येकडील उताराचा ‘कॉटरॉ डिप्रेशन’ हा दलदलीचा प्रदेश समुद्रसपाटीपासून १३२ मी. खाली असून तो १८,००० चौ. किमी. विस्ताराचा आहे.

नाईलच्या आसपासचा प्रदेश सपाट असून, दक्षिणेकडील वरचा ईजिप्त व उत्तरेकडील खालचा ईजिप्त असे त्याचे दोन भाग पडतात. वरचा ईजिप्त अदिंदन ते कैरोपर्यंत पसरला असून, खोऱ्याच्या बाजूबाजूने तुटलेले कडे १६ ते २२ किमी. पर्यंत गेलेले आढळतात. याच भागात अत्यंत सुपीक प्रदेश व ऐतिहासिक अवशेष आहेत. खालचा ईजिप्त कैरो ते भूमध्य समुद्रापर्यंत पसरला असून, तेथे नाईलच्या सात फाट्यांमुळे समृद्ध त्रिभुजप्रदेश निर्माण झाला आहे. या भागात अनेक कालवे असून, त्यांचा उपयोग वाहतुकीसाठी व जलसिंचनासाठी केला जातो. देशाची दोन तृतीयांश लोकसंख्या याच भागात असून बहुतेक सर्व मोठी शहरे व उद्योगधंदे येथेच आहेत.

पूर्वेकडील वाळवंटाला अरेबियन वाळवंटही म्हणतात. हा प्रदेश नाईलपासून पूर्वेस पसरलेला असून, तांबड्या समुद्रकिनारपट्टीजवळ याचा काही प्रदेश २,१०० मी. पेक्षाही उंच आहे. प्रवाळ भिंतींना सबंध समुद्रकिनारपट्टी व्यापली असून येथे अनेक वाड्या निर्माण झाल्या आहेत. या वाड्यांतून पाणी मिळाल्याने बेदूईन टोळीवाल्यांची येथे वस्ती आहे. सुएझ कालव्याद्वारा तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र जोडले गेले आहेत. या उंचवट्याची पूर्व बाजू म्हणजे पूर्व आफ्रिकेतून मृत समुद्राकडे गेलेल्या खचदरीचाच भाग होय. किनारपट्टीजवळ अनेक खनिजे सापडण्याचा संभव असून सध्या तेथून तेल व फॉस्फेट काढले जाते.

सिनाई द्वीकल्प ईशान्येला आहे. हा ईजिप्तमधील सर्वांत उंच प्रदेश आहे. येथील २,२८५ मी. उंचीच्या जेबेल मूसा पर्वतावर मोझेझला ईश्वराकडून दहा आज्ञा’ प्राप्त झाल्या असा अनेकांचा समज आहे. याच्या पूर्वेस अकाबाचे आखात आहे. हा प्रदेश निर्जन असला, तरी येथे खनिजसंपत्ती भरपूर आहे. सिनाईमध्ये अलीकडे तेलाच्या खाणी सापडल्या आहेत. तसेच सिनाईमधील उम्म बुग्मा येथे मँगॅनीजच्या खाणी व एल् तुर येथे फॉस्फेटच्या खाणी सापडल्या आहेत. जेबेल कॅथेरिना (२,६३७) हे येथील सर्वांत उंच शिखर आहे.

नाईल नदी ईजिप्तचे जीवन आहे ही ईजिप्तमध्ये सु. १,५०० किमी. वाहते. नाईलला वर्षातून एकदाच पूर येतो. गाळ सगळीकडे पसरतो. इथिओपियातील सोबॅत नदी (नील नाईल) श्वेत नाईलला मॅलॅकॅल येथे मिळते व पावसाळ्यात नाईलला अर्ध्याअधिक पाण्याचा पुरवठा करते. इथिओपियातील बारो, आब्बाय व आतबारा नद्या, सूदानमधून ईजिप्तकडे जाणाऱ्या नाईलला ९०% पाणी पुरवतात. उन्हाळ्यात मात्र श्वेत नाईलचे व उपनद्यांचेच पाणी नाईलमध्ये जाते. ॲल्बर्टा सरोवरातून श्वेत नाईल निघून जूबावरून वाहत सूद च्या दलदली भागात शिरते. मॅलॅकॅलनंतर वाडी हॅल्फा व आस्वानच्या दरम्यान नाईलच्या ७% पाण्याची वाफ होते. नाईलवर अनेक पाटबंधारे बांधले गेले आहेत. या पाटबंधाऱ्यांमुळे जलसिंचनाचे क्षेत्र वाढले असले, तरी नाईलचा गाळ पसरण्याचे क्षेत्र कमी झाले आहे.

भूमध्य सागराची ९६५ किमी. व तांबड्या समुद्राची १,९३० किमी. किनारपट्टी ईजिप्तला लाभली आहे. सर्वांत मोठे मरूद्यान एल् फायूम कैरोपासून ८० किमी. नैर्ऋ‌त्येस आहे. सीवा, बहारिया, दाखला व कार्गा यांसारखी मोठी मरूद्याने प्रसिद्ध आहेत.

ईजिप्त वाळवंटी हवामानाच्या (सहाराच्या) प्रदेशात मोडतो. उन्हाळ्यातील सरासरी तपमान २७° से. ते ३२° से. असते. हिवाळ्यातही उष्मा जाणवतो व सरासरी तपमान १२° से. ते २१° से. असते. वायव्येकडील वाऱ्यांमुळे मात्र किनारपट्टीजवळील तपमान थोडे सह्य होते. वसंत ऋतूत अथवा उन्हाळ्यात दक्षिणेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांस खमसिन म्हणतात त्यांमुळे वाळवंटातील तपमान अनेकदा ४३° से. पर्यंतही चढते. ईजिप्तमध्ये पावसाळा नाहीच. भूमध्य सागरकिनारपट्टीत सरासरी २० सेंमी. पाऊस पडतो, दक्षिणेकडे सरासरी २·५ सेंमी, पाऊस पडतो, तर वाडी हॅल्फा येथे अजिबात पाऊस पडत नाही. ॲलेक्झांड्रिया येथे वर्षातून ४० दिवसांत १९ सेंमी., पोर्ट सैद येथे ८ सेंमी. व कैरो येथे २·३ सेंमी. पाऊस पडतो.

ईजिप्तमध्ये बहुतेक भाग वाळवंटी असल्याने तेथे मरुवनस्पती आढळतात त्यांत लाजाळू, झाऊ व अनेक प्रकारची झुडपे व गवते आहेत. पूर्वेकडील व सिनाईमधील वाड्यांमध्ये भूमिगत पाण्याच्या आधाराने खजुराची झाडे होतात. नाईल खोऱ्यात काही जंगली वनस्पती आढळतात. ईजिप्तमध्ये अरण्ये नसली, तरी खजुराची व लिंबाच्या जातीच्या फळांची बने आढळतात. शेळ्या, मेंढ्या, गाढवे व उंट हे येथील प्रमुख प्राणी होत. हरणांच्या काही जाती, आयबेक्स, तरस, कोल्हा, खोकड हे प्राणी तीनशेच्यावर पक्ष्यांच्या जाती, फुलपाखरे, पतंग, विंचू, साप, नाग इ. प्राणी ईजिप्तमध्ये आहेत. नाईलमध्ये विपुल मासे सापडतात हल्ली मगरी मात्र नष्ट झाल्या आहेत.

इतिहास : ईजिप्तचा प्रागैतिहास तीस घराण्यांत विभागण्यात येतो. इ. स. पू. ३१०० ते इ. स. ६४२ पर्यंतचा इतिहास यात मोडतो [→ ईजिप्त संस्कृति]. ६३९ मध्ये अरब सेनाधिकारी अम्र इब्‍न-अल्‌-अस याने ईजिप्तचा कब्जा घेतला व तो खलीफा झाला. त्याच्या वंशजांनी २०० वर्षे राज्य केले. ९६९ पासून ११७१ पर्यंत फातिमी वंशाने राज्य केले. याच काळात अल्-अझार विद्यापीठाची (सु. ९७०) स्थापना झाल्याने ईजिप्त मुसलमानांचे आकर्षण केंद्र ठरला. आयूबिद घराण्याने ११७१ पासून १२५० पर्यंत राज्य केले. त्यानंतर मामलुकांच्या गुलाब घराण्याचे राज्य तुर्कांनी १५१७ मध्ये ईजिप्त पादाक्रांत करीपर्यंत टिकून होते. तुर्कांचे आधिपत्य १८०५ पर्यंत चालले. नंतर पाशा मुहंमद अलीच्या घराण्याने ब्रिटिशांनी ईजिप्तला त्यांच्या आधिपत्याखाली घेईपर्यंत (१९१४) राज्य केले. मुहंमद अली मूळचा अल्बेनियन. ह्याने देशाला स्थैर्य आणले व कापूस लागवडीच्या विकासास चालना दिली. १८६९ मध्ये झालेल्या सुएझ कालव्यामुळे ईजिप्त हे दळणवळणाचे केंद्र बनल्याने त्याने यूरोपीय देशांना ईजिप्तमधील औद्योगिक वाढीस मदत करण्यात प्रोत्साहन दिले. १८८२ मध्ये इंग्‍लंडने ईजिप्तवर अप्रत्यक्ष अंमल बसविला व १९१४ मध्ये त्याला संरक्षित राष्ट्र बनविले. ईजिप्तला १९२२ मध्ये मर्यादित स्वातंत्र्य मिळाले. वफ्‌द पक्ष, झगलूल पाशा व नॅहास पाशा ह्यांनी पूर्ण स्वातंत्र्य मिळविण्याचे प्रयत्‍न केले. परंतु ब्रिटिश सेना व नौदल १९३६ पर्यंत सुएझच्या संरक्षणासाठी ईजिप्तमध्ये होते. १९४५ मध्ये ईजिप्त संयुक्त राष्ट्रे या संघटनेचा सदस्य झाला. त्याच वर्षी अरब लीग स्थापण्यात आली. पॅलेस्टाइनवरून अरब-इझ्राएल युद्ध १९४८ मध्ये सुरू झाले या युद्धात ईजिप्तचा मोठा वाटा होता. जुलै १९५३ मध्ये जनरल नगीबच्या नेतृत्वाखाली सशस्त्र क्रांती झाली फरूक राजाने राजत्याग केला व नगीब पहिला पंतप्रधान झाला. ईजिप्त प्रजासत्ताक असल्याचे घोषित करण्यात आले. ईजिप्तच्या मागणीप्रमाणे सुएझ विभागातून जून १९५६ पर्यंत सर्व ब्रिटिश सैन्य काढून घेण्यात आले. जून १९५६ मध्ये नासर राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांनी २६ जुलै १९५६ रोजी सुएझचे राष्ट्रीयीकरण केले त्यामुळे ⇨ सुएझ प्रश्न निर्माण झाला. इझ्राएलने केलेल्या हल्ल्याच्या वेळेसच ब्रिटन व फ्रान्सने ईजिप्तला निर्वाणीचा खलिता देऊन ईजिप्तवर बाँबफेक सुरू केली परंतु संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने हा वाद मिटला. इझ्राएल व ईजिप्त यांच्यामध्ये १९४८ पासून सुरू झालेली तेढ तीन युद्धे झाल्यावरही कायम आहे. २९ ऑक्टोबर १९५६ च्या युद्धानंतर गाझा येथे आंतरराष्ट्रीय पोलीस तुकडी सुरक्षिततेसाठी ठेवण्यात आली परंतु त्याचाही विशेष फायदा न होता १९६७ व १९७२ मध्ये पुनश्च युद्धे झाली. या युद्धांत ईजिप्तची बरीच हानी झाली. काही प्रदेश इझ्राएलने बळकावला. सुएझ कालव्यात बोटी बुडाल्याने तो बंद झाला. १९७३ पर्यंत हा बंदच असल्याने ईजिप्तच्या आर्थिक परिस्थितीवर ताण पडला. १९७४ साली अमेरिकेच्या मदतीने हा खुला करण्याची कार्यवाही चालू आहे. १९५८ मध्ये ईजिप्त व सिरिया यांचे संघराज्य निर्माण करण्यात आले होते. यात पुढे येमेनही सामील झाला होता परंतु हे ऐक्य फार काळ टिकू शकले नाही. १९६५ मध्ये नासर यांची पुन्हा सहा वर्षांकरिता अध्यक्ष व पंतप्रधान म्हणून निवड झाली. १९७० मध्ये नासर मृत्यू पावले व त्यांच्या जागी अन्वर सादात अध्यक्ष व पंतप्रधान म्हणून आले. सध्या (१९७४) पुन्हा सादात हेच अध्यक्ष व पंतप्रधान आहेत.

राजकीय स्थिती  एप्रिल १९२३  मध्ये ईजिप्तचे संविधान जाहीर झाले. राजपद मुहंमद अलीचा पौत्र याजकडे व नंतर फरूककडे १९३६ मध्ये आले. बेल्जियमच्या धर्तीवर संविधान आधारलेले होते. संसदेची सीनेट व चेंबर ऑफ डेप्युटीज अशी दोन सदने होती. मे १९५३ मध्ये नवीन संविधान जाहीर करण्यात आले. त्याचप्रमाणे ईजिप्त प्रजासत्ताक राष्ट्र असल्याचे जाहीर करण्यात आले. मार्च १९६४ मध्ये नासर ह्यांनी नवीन संविधान जाहीर केले. याप्रमाणे ईजिप्त समाजवादी लोकशाही राज्य म्हणून जाहीर झाले. अरब गटापैकी एक, इस्लाम हा राजधर्म, अरबी ही अधिकृत भाषा अशा या संविधानातील आणखी काही वैशिष्ट्यपूर्ण तरतुदी आहेत. राष्ट्रीय संसदेत प्रौढ मतदारांनी पाच वर्षांकरिता निवडून दिलेले ३६० सदस्य असून आणखी १० सदस्यांची नेमणूक राष्ट्राध्यक्ष करू शकतो. या संसदेकडून सहा वर्षांकरिता निवडल्या गेलेल्या राष्ट्राध्यक्षाला सार्वमताने मान्यता मिळवावी लागते. राष्ट्राध्यक्ष तिन्ही सेनादलांचा प्रमुख असतो.

देशातील मोठाली पाच शहरे मुहाफिझात (राज्यपाल) द्वारा शासित केली जातात. इतर भाग पंधरा मुदिरियांत (प्रांतांत) विभागण्यात आले आहेत. प्रत्येक प्रांत गृहमंत्रालयाद्वारा शासित केला जातो पण सरहद्दीवरील चार प्रांत युद्धमंत्रालयाकडून शासित होतात. मुदिरांची (प्रांताधिकाऱ्यांची) नेमणूक गृहमंत्री करतो. मुदिरांच्या हाताखाली ममुरमर्काझ (जिल्हाधिकारी किंवा महापौर) व हुकुमदार (दंडाधिकारी) असतात. खेड्यांची व्यवस्था ओम्दा अधिकारी बघतात. त्यांची नेमणूक ममुरमर्काझ करतात. ओम्दा अधिकारी सराफ (कर वसूल करणारा) याला मदत करू शकतात. पोलीसखाते गृहमंत्रालयाखाली जरी येत असले, तरी प्रांतातील पोलीस मुदिरांच्या हाताखालीच असतात. नॅशनल युनियन पार्टी हा एकच राजकीय पक्ष अस्तित्वात आहे. ईजिप्त मध्ये अन्न व कृषी संघटना, अणुशक्ती मंडळ, युनेस्को इ. अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांच्या कचेऱ्या आहेत. अरब लीग व आफ्रिकन एकता यांबाबत तर ईजिप्तचेच पुढारीपण आहे.

कायद्याची संपूर्ण जबाबदारी कायदेमंत्रालयाकडे असते. बहुतेक कायदेकानून नेपोलियन संहितेवर आधारित असून त्यांचे कार्यही फ्रेंच नमुन्यानुसार चालते. न्यायपद्धतीत दिवाणी, फौजदारी, वाणिज्य, शासकीय इ. विभाग पडतात. न्यायाधिशांची नियुक्ती कायदेमंत्रालय करते. प्रत्येक मुदिरियांत व मर्काझमध्ये न्यायालय असते. तसेच कैरोत  मध्यवर्ती न्यायालय आहे. मुसलमानांसाठी वेगळी न्यायालये असून त्यांची कामे ‘महकामा शारिआ’ न्यायाधिकारी पाहत १९५६ पासून  ही न्यायालये रद्द करण्यात आली आहेत. राष्ट्रद्रोह्यांसाठी वेगळी न्यायालये स्थापण्यात आली आहेत.

अठरा वर्षांवरील प्रत्येक तरुणाने सैन्यात भरती व्हावयास पाहिजे असा कायदा आहे. मॅट्रिक नसल्यास तीन वर्षे व मॅट्रिक असल्यास केवळ अठरा महिने सैन्यात काम करावे लागते. सैन्यात काम केल्याशिवाय १८ ते ३० वयाच्या व्यक्तीस इतर ठिकाणी नोकरी मिळत नाही. दुसऱ्या महायुद्धात ईजिप्तने चांगली कामगिरी केली. परंतु इझ्राएलशी झालेल्या युद्धात मात्रा ईजिप्तचा पराभव झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रांतर्फे गाझा येथे आंतरराष्ट्रीय सैन्य ठेवण्यात आले. रशियाच्या मदतीने सैन्याची पुनर्रचना करण्यात आली असून १९६९ मध्ये देशात २,३०,००० खडे सैन्य व १,३०,००० नॅशनल गार्ड होते. नौदलात १६ पाणबुड्या, ८ विनाशिका, ४५ पाणतीर बोटी व सुरुंग काढणाऱ्या, क्षेपणास्त्र व रॉकेट फेकणाऱ्या अशा अद्ययावत बोटींचा भरणा आहे. रशियाच्या आणि चेकोस्लोव्हाकियाच्या मदतीने ईजिप्तचे विमानदल सुसज्‍ज करण्यात आले असून त्यात ४५० लढाऊ व वाहतुकीची विमाने आहेत. १९७४ पासून अमेरिकेकडूनही मदत अपेक्षित आहे.

आर्थिक स्थिती : ईजिप्त शेतीप्रधान देश आहे. कामकरी लोकांपैकी ७०% कामगार या व्यवसायात असून निर्यातीपैकी ९०% शेतमालाच्या असतात. राष्ट्रीय उत्पन्नाच्या ४०% उत्पन्न शेतीपासूनच मिळते. नाईलचे समृद्ध खोरे, सूर्यप्रकाश, कालवे व पाटबंधारे यांच्या योजना व लोकांचे अविरत श्रम यांमुळे ईजिप्तच्या अवघ्या ३·५% प्रदेश असलेल्या नाईलच्या खोऱ्यात ईजिप्तची ७०% वस्ती सामावलेली आहे. पाऊस अत्यल्प असल्याने जलसिंचनावरच नाईलच्या खोऱ्यात व त्रिभुज प्रदेशात शेती केली जाते. कायमच्या जलसिंचनपद्धतीचा अवलंब एकोणिसाव्या शतकापासून सुरू करण्यात आला. अनेक पाटबंधारे बांधून १९५० पर्यंत २३,००,००० हे. जमिनीपैकी ८०% जमीन दुष्काळी परिस्थितीतून मुक्त करण्यात आली. पूर्वी जेथे एकच पीक घेतले जाई त्या जागी दोन किंवा तीन पिकेही घेण्याची सोय झाली. १९७० मध्ये पूर्ण झालेल्या आस्वान उंच धरण प्रकल्पामुळे ईजिप्तचे चित्र आणखी बदलत आहे. आस्वानचे ईजिप्तमधील नाव एल्‌ सद्द-एल्-आली आहे. नवीन धरणात १३,००० कोटी घनमीटर पाण्याचा साठा होणार असून जगातील हे सर्वांत मोठे धरण होय. त्यामुळे आजच्या सहापट विद्युतनिर्मिती होऊ शकेल. वायव्येकडील ‘कॉटरॉ डिप्रेशन’भागात पाणी साठवून त्याचा उपयोग करण्याच्या योजना आहेत.

ईजिप्तमधील शेतकरी (फल्लाह) अजूनही शडूफ, साकिआतंबुरचा उपयोग करतो. शडूफ’ म्हणजे एका टोकास वजन व दुसर्‍या टोकास बादली बांधून पाणी काढण्याचे साधनसाकिआ’ म्हणजे रहाटगाडगे व तंबुर’ म्हणजे आर्किमिडीजचा स्क्रू. यास दोन माणसे लागतात. अवजारेही जुनीच आहेत.मिह्‌रत’ (नांगर) चा उपयोग करतात. ढेकळे फोडण्यासाठी नट्टाटा’ (झाडाचे मोठे खोड) वापरतात. कापणी फास(मोठा कोयता) व मिंगल’ (लहान कोयता) यांनी करतात. धान्याची मळणी नब्बुत’ (जाड काठी) अथवा नोराग’ (लाकडाच्या दांड्याला धातूची तबकडी जोडलेली असते) ने केली जाते. वाऱ्यावर उडवून धान्य व भुसा वेगळा केला जातो. या पद्धतीस गरूफ’ म्हणतात.

येथे तीन पिके काढली जातात : ‘शित्वी’ (हिवाळी पिके), ‘सैफि’ (उन्हाळी पिके) व निलि(नाईलच्या पुरावेळची पिके). वार्षिक तीन पीके जरी निघत असली, तरी जमिनीचा कस जाऊ नये म्हणून बहुतेक शेतकरी दोनच पिके काढतात. बर्सिम या गवताच्या लागवडीमुळे जनावरांना भरपूर चारा मिळून जमिनीला पुन्हा कस येतो. बारमाही पाण्याची व्यवस्था झाल्यापासून रासायनिक खतांचा वापर होऊ लागला. कापसाच्या लागवडीस सुरुवात झाली. गव्हाची लागवड मागे पडली. गव्हाचे उत्पन्न घटल्याने सरकारने शेतकऱ्यांस जबरदस्तीने गव्हाची लागवड करावयास भाग पाडले. लांब धाग्याच्या ईजिप्शियन कापसाला जागतिक मागणी वाढल्यामुळे ईजिप्तमध्ये कापसाचे उत्पादन वाढले. १८२१ मध्ये कापसाची निर्यात ४७ टन, १८६१ मध्ये २८,१६० १९०१ मध्ये २,७३,६७५ व १९६० मध्ये ३,००,००० टन इतकी झाली. बार्लीची जागा गव्हाने घेतली. नाईलच्या पुरावर तांदळाचे उत्पादन अवलंबून असते. कोणत्याही पिकाच्या बाबतीत नाईल खोऱ्यात दर हेक्टरी उत्पन्न जगातील सर्वोच्च उत्पादनाच्या बरोबरीचे असते. कापसाच्या खालोखाल कांद्याची निर्यात असून त्याचे दर हेक्टरी सरासरी उत्पादन १७० क्विंटल आहे. कापसू, कांदा, गहू, बार्ली, मका, भात, ऊस, कडधान्ये, भुईमूग, गळिताची धान्ये, भाजीपाला, केळी, द्राक्षे, अंजीर, खजूर, लिंबूजातीची फळे यांचे उत्पादन येथे होते.

ईजिप्तमधील पशुधनाची वाढ प्रामुख्याने शेतकामामुळे झाली आहे. १९७० च्या अंदाजाप्रमाणे देशात सु. १३·७७ लक्ष गाढवे, २०·८८ लक्ष गुरे, २०·७५ लक्ष म्हशी, २३९·३ लक्ष काेंबड्या (१९६७-६८), १·२२ लक्ष उंट, १९·६८ लक्ष मेंढ्या, ११·५२ लक्ष शेळ्या, ४०,००० घोडे आणि ११,००० (१९६५-६६) खेचरे होती. १९७० मध्ये १३७·७ कोटी अंड्यांचे व ५,३५९ टन मधाचे उत्पादन झाले. देशातील ६५% दूध म्हशींपासून, २८% गाईंपासून व बाकीचे शेळ्यांपासून मिळते. यांपैकी १०% दूध म्हणून, ६०% लोण्याकरिता व ३०% चीजकरिता वापरले जाते.

उद्योग : इंधन व जलशक्तीच्या कमतरतेमुळे ईजिप्तमध्ये उद्योगधंदे वाढू शकले नाहीत. सुएझच्या आसपास तेलाच्या खाणी असल्या, तरी आयात केलेल्या तेलावर व कोळशावर आणि जलशक्तीवर ईजिप्तमधील वीज निर्माण केली जाते. १९६९ मध्ये देशात ७१३·४ कोटी किवॉ. तास वीजनिर्मिती झाली होती.

ईजिप्तमधील सुएझजवळील रास घरीब व तांबड्या समुद्राजवळील हुर्द्यदा या खनिज तेलाच्या खाणींतील उत्पादन कमी झाले असले, तरी सिनाई भागातील सिद्र, अस्ल, फेझान, अल् बॅलॅना येथे तसेच तांबड्या समुद्र किनाऱ्याजवळील अबू बकर व करीम येथे नवीन तेलखाणी मिळाल्या असून १९६९ मध्ये एकूण १,४२,४५,००० घ. मी. अशुद्ध तेलाचे उत्पादन झाले. तांबड्या समुद्रावरील बिरबदा व सिनाईमधील एल् तुर येथे फॉस्फेट, उम बुग्मा येथे मँगॅनीज, आस्वानजवळील हिल्‌वॅन येथे लोह धातुक, वाडी अल् नात्रूनजवळील सरोवरातून नेट्रॉन, तांबड्या समुद्रा नजीक व पोर्ट सैदजवळ मीठ व अनेक ठिकाणी जिप्सम मिळते. यांशिवाय सोने, क्रोमाइट, शिसे, जस्त, मौल्यवान खडे, तांबे व अनेक प्रकारचे इमारती दगड ईजिप्तमध्ये मिळतात.

नाईल नदीच्या रोझेटा (रशीद) व दॅमिएट्टा (दुमयात) या शाखांच्या मुखावर व भूमध्यसागर किनारपट्टीवर मच्छीमारीची केंद्रे आहेत. फायूम भागातील बिर्कत कारून मरूद्यानात व सुएझच्या पूर्वेकडील बार्दाविल खारकच्छामध्येही बरीच मासळी सापडते. १९६५ मध्ये ९४,००० टन मासळी मिळाली होती.

ईजिप्त कृषीप्रधान देश असल्याने औद्योगिकीकरणास फार उशिरा सुरुवात झाली. कच्च्या मालाचा अभाव, तज्ञांचा व कुशल कामगारांचा अभाव व जनतेची अल्प क्रयशक्ती ही याची कारणे होत. १९१७ मध्ये एक समिती नेमून ईजिप्तच्या औद्योगिकीकरणास सुरुवात करण्यात आली. उद्योगधंद्यांत कापडाच्या गिरण्यांना बरेच वरचे स्थान आहे. १९६६ साली देशात ८,७५,००० औद्योगिक कामगार व ४,००० कारखाने होते. यांत प्रामुख्याने अन्न, कापड, अवजारे, अधातू खनिजे, तयार कपडे, छापखाने, लाकडी सामान, रासायनिक पदार्थ, चामडे इत्यादींचा समावेश होतो. इझ्राएलच्या युद्धामुळे औद्योगिक उत्पादनावर बराच परिणाम झाला आहे.

सुएझ आखात विभागात एक कोट डॉलर खर्चून तेलशुद्धीकरणाचा कारखाना १९५६ मध्ये चालू करण्यात आला. साखरेचा एक मोठा कारखाना नाग हम्मादी येथे उभारण्यात आला आहे. १९६६ मध्ये ४१५·२ कोटी ईजिप्त पौंडांची सप्तवार्षिक योजना आखण्यात आली. तिच्याप्रमाणे ४०% उद्योग व शक्तिसाधने, २६% वाहतूक व सुएझ कालवा, १६% कृषी, १५% घरबांधणी व सेवा असा खर्च व्हावयाचा होता.

देशी मालाला पाठिंबा देण्याचे धोरण स्वीकारण्यात आल्यापासून देशी कारखाने उदयास येऊ लागले. १९७० साली एकूण आयात ३४·११ कोटी ईजिप्त पौंड व निर्यात ३३·१२ कोटी ईजिप्त पौंड होती. आयातीत प्रामुख्याने यंत्रे, धान्ये, तेल, इंधन, लोखंड, पोलाद, रासायनिक पदार्थ, विजेची उपकरणे, खते व वाहने होती, तर निर्यातीत कापूस, कापड, तांदूळ, कांदा व इतर भाजीपाला, फॉस्फेट, मँगॅनीज, सिमेंट, पेट्रोलियम व पादत्राणे होती. निर्यातीपैकी ४०% रशिया व कम्युनिस्ट देशांकडे, ५% भारताकडे, ५% चेकोस्लोव्हाकियाकडे आणि २०% निर्यात यूरोप व अमेरिकेकडे झाली होती.  आयात रशियाकडून १४%, फ्रान्स १०%, अमेरिका ७%, पश्चिम जर्मनी  ७%, इटली ६%, भारत ६%, व स्पेन ५% होती. बाकीची इतर देशांकडून होती.

पहिली अँग्‍लो-ईजिप्शियन बँक १८६४ मध्ये स्थापण्यात आली. १८६६ मध्ये क्रेडिट लीओने, १८६७ मध्ये ऑटोमन  बँक, १८८० मध्ये क्रेडिट फोन्सिअर सुरू झाल्या. त्यानंतर इटालियन व ग्रीक बँका सुरू झाल्या. ईजिप्तच्या संपूर्ण मालकीची बँक मिस्‌र १९२० मध्ये स्थापन झाली. १९३१ च्या ‘पाच-फेद्दन’ कायद्याने कर्जापायी पाच फेद्दन पर्यंत जमीन बँकेला घेता येईना, म्हणूनच १९०२ मध्ये स्थापन झालेली कृषी बँक १९३७ मध्ये बंद करण्यात आली. १९३३ मध्ये सरकारी मदतीने बँक दि क्रेदित अग्रिकोल स्थापण्यात आली. या बँकेस मात्र पाच-फेद्दन कायदा लागू नव्हता. १८९८ मध्ये स्थापन झालेली राष्ट्रीय बँक १९५१ च्या कायद्याने मध्यवर्ती बँक झाली आणि १९६० मध्ये तिचे राष्ट्रीयीकरण झाले. १९६१ पर्यंत सर्व बँका, विमा कंपन्या वगैरे आर्थिक संस्थांचे राष्ट्रीयीकरण झाले.

ईजिप्त पौंड हे येथील चलन आहे. त्याची शंभर पिअस्टरमध्ये विभागणी केली आहे. १९६९ मध्ये एक ईजिप्त पौंड = २·२८ डॉलर व एक पौंड स्टर्लिंग = १·०४ ईजिप्त पौंड असा विनिमय दर होता. १९६७ मध्ये देशाजवळ ४·०६ कोटी ईजिप्त पौंड सोन्याचा साठा होता व ४६·४ कोटी ईजिप्त पौंडांचे चलन होते.

ईजिप्तचे अंदाजपत्रक पूर्वी नेहमीच तुटीचे होते. इझ्राएलशी युद्ध, सुएझ प्रश्न, अंतर्गत सुधारणा यांचा परिणाम होता. रशिया व अमेरिका यांच्याकडून ईजिप्तने बरीच मदत  मिळविली असून १९६९-७० मधील आयव्यय बरोबरीचा होता. सुएझ बंद झाल्याने होणारे नुकसान जबर असल्याने तो पुन्हा सुरू करण्याच्या अध्यक्ष सादात यांच्या योजना आहेत.

ईजिप्तमधील वाहतूक पूर्वी प्रामुख्याने नाईलमार्गे होत असे. सुएझ कालव्याच्या निर्मितीनंतर ईजिप्त आंतरराष्ट्रीय दळणवळण मार्गावर आले. १९३६ पासून देशात हमरस्ते बांधण्यास सुरुवात झाली व पहिले रस्ते प्रामुख्याने लष्करी  हालचालींसाठी बांधण्यात आले. १९६९ मध्ये देशात २२,१४२ किमी. पक्के रस्ते व सु. २५,००० किमी. कच्चे रस्ते होते. १९६८ मध्ये १,१५,९०० प्रवासी गाड्या व २६,७०० व्यापारी गाड्या होत्या. वाळवंटात उंटाचा उपयोग होतो. आफ्रिकेतील पहिली रेल्वे कैरो-ॲलेक्झांड्रिया १८५५ साली पूर्ण झाली. १९६९ साली देशाच्या मालकीचा  ४,५१० किमी. लांबीचा लोहमार्ग होता. नाईलच्या १,५३० किमी. आणि इतर १,६९० किमी. जलमार्गावरून ईजिप्तची महत्त्वाची वाहतूक होते. डौवफेलुक्का या खास ईजिप्तच्या बोटी सु. १०,००० असून, ४०० मोटारबोटी, ३०० ओढणाऱ्या बोटी व ८०० मालवाहू नौका आहेत. सुएझ, पोर्ट सफागा व कुसेर ही तांबड्या समुद्रावरील आणि सालूम, सीदि बरानी, ॲलेक्झांड्रिया व पोर्ट सैद ही भूमध्य सागरामधील बंदरे आहेत. तथापि ईजिप्तची ९०% आयात निर्यात ॲलेक्झांड्रियामधून होते. १९६१ मध्ये ईजिप्तच्या जहाजवाहतुकीचे राष्ट्रीयीकरण झाले असून देशाची १०% जलवाहतुक राष्ट्रीय कंपनी करते. १९६६ मध्ये देशात २,९१,००० टनांची ३७ व्यापारी जहाजे होती. १८६९ मध्ये सुएझ कालवा सुरू झाला. १९५६ मध्ये ईजिप्तने त्याचे राष्ट्रीयीकरण केले. यामधून १९६२ साली सु. १९·८ कोटी टनांची जहाजे गेली आणि ईजिप्तला ५·४ कोटी ईजिप्त पौंडांची मिळकत झाली. १९६५ मध्ये २४·७ कोटी टन वाहतूक व ८·६ कोटी ईजिप्त पौंड मिळकत झाली. इझ्राएल-ईजिप्त युद्धानंतर इझ्राएलची जहाजे या कालव्यातून जाण्यास ईजिप्तने बंदी केली. १९६७ च्या युद्धानंतर हा कालवा ईजिप्तने बंद केला. परंतु त्यामुळे ईजिप्त मोठ्या उत्पन्नास मुकला आहे. कैरो, ॲलेक्झांड्रिया, लक्सॉर, आस्वान आणि मर्‌सॅ मत्रू येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. ईजिप्तची राष्ट्रीय विमान कंपनी देशात वाहतूक करते. १९६३ मध्ये देशात १,३१९ सरकारी आणि १,३७८ खाजगी डाकघरे होती. १९६९ मध्ये ३,६५,००० दूरध्वनी, १९६५ मध्ये १६,१३,००० रेडिओ, १९६८ मध्ये ४,१८,००० दूरचित्रवाणीयंत्रे व १९५५ मध्ये ३५५ चित्रपटगृहे होती.

लोक व समाजजीवन : ईजिप्तमधील ९०% लोक नाईलच्या खोर्‍यात राहतात. खोर्‍यात दर चौ. किमी. ला १,००० माणसे राहतात, तर कैरोजवळ तेच प्रमाण २,६०० पर्यंत जाते. या उलट वाळवंटी विभागात फारच विरळ वस्ती आढळते. ईजिप्तमधील लोकांचा वांशिक वारसा ठरविणे तितकेसे सोपे नाही. त्यांच्यात पुरातन ईजिप्शियन, अरब, तुर्क व इतर अनेक वंशांचे मिश्रण आढळते. सुंदर केस, बांधेसूद यष्टी आणि गौरवर्ण ही उत्तरेकडील ईजिप्शियनांची वैशिष्ट्ये आहेत. दक्षिणेकडील लोक तितकेसे गौरवर्णीय नाहीत. बहुतेक लोक इस्लामी शाफी पंथाचे आहेत. हनफी, मालिकी, कॉप्ट या काही पंथांच्या जमातीही ईजिप्तमध्ये आहेत. इतर परदेशीयांत ग्रीक, आर्मेनियन, सिरियन इ. आहेत. ईजिप्त समाज तीन विभागांत वाटला जातो. (१) फेल्लहीन : म्हणजे शेतकरी. यांचे प्रमाण ६०% असावे. हा मागासलेला वर्ग आहे. जमिनीला चिकटून राहणारा हा वर्ग अनेक शतकांतही स्वत:स बदलू शकला नाही. यांची सरासरी उंची १७५ सेंमी. असते व अंगापिंडाने ते खूप भरलेले असतात. पुरुष व स्त्री यांचा रंग सारखाच असतो. कपाळावर, हनुवटीवर, हातांवर, कानशीलांवर गोंदण्याची पद्धत अजूनही त्यांच्यात आढळते. स्त्रिया वेण्या घालतात व पुरुषांचे केस लहान असून ते दाढी ठेवतात. मेंदीचा उपयोग केस-कलपासाठी व हात-पाय रंगविण्यासाठी केला जातो. काजळाचा उपयोगही केला जातो. पुरुषांचा पोशाख सुती कापडाचा असून त्यावर गल्लबिया पांघरलेला असतो. डोक्यावर लेब्दो व त्यावर पांढरे कापड फेट्यासारखे गुंडाळलेले असते. पायात कधीकधी बल्घा (चपला) घालतात. स्त्रियांना दागिन्यांचा फार शोक. काही स्त्रिया मिलाया (बुरखा) वापरतात. दागिने चांदीचे अथवा तांब्याचे असतात. एका कुटुंबात सरासरी चार ते पाच मुले असतात. वयात येण्याआधीच मुले कामाला लागतात. फेल्लहीन समाज अशिक्षित असला, तरी त्याच समाजातून ताहा हुसेन पाशा (मंत्री), झगलूल पाशा, मोहम्मद अठदोह, अन्वर सादात यांसारख्या अनेक प्रसिद्ध व्यक्ती पुढे आल्या आहेत. (२) बेदूइन :या भटक्या टोळीवाल्यांचा समाज लहान आहे. हे गुरे, मेंढ्या, उंट बाळगतात व त्यांच्या कळपाबरोबर जागोजागी हिंडत असतात. या कुटुंबातही सरासरी चार ते पाच मुले आढळतात. प्रत्येक बेदूइनास दोन ते चार बायका असतात. प्रत्येक जमातीचा मुख्य शेख असतो. (३) शहरात राहणाऱ्या लोकांचा व व्यापाऱ्याचा तिसरा विभाग पडतो. हे सु. ३०% आहेत. यांचे कुटुंब लहान असते.

फेल्लहीन एक-दोन खोल्यांच्या झोपडीत राहतो. या झोपड्या विटांच्या असतात. झोपडीला खिडक्या नसतात, परंतु उंचावर झरोके असतात. हिवाळ्यात हे झरोके बंद करतात. प्रत्येक झोपडीस मंडारा (सोपा) व झरिबा (गोठा) असतो. घरात हल्ला (तांब्याची भांडी) वापरतात. निश्त चा (सपाट परातीचा) उपयोग कपडे धुण्यासाठी करतात. खेड्यांची रचना अव्यवस्थित असते. खेड्यांत सार्वजनिक गुर्न (खळे) असते. झऱ्याचे पाणी वापरले जाते. फेल्लहीन दैववादी असल्याने शहरी लोक त्यांची टिंगल करतात. काही बेदूइन तंबूतच राहून स्थायिक झालेले आढळतात. असे तंबू उंटाच्या, शेळीच्या अथवा मेंढीच्या कातड्यापासून तयार करतात. दोरही त्यांच्याच केसांपासून तयार होतो. शहरी लोकांची घरे विटा, दगड व सिमेंटची असतात. श्रीमंत लोकांची घरे मात्र अद्ययावत असतात. सध्या शहरातील वास्तुशिल्पावर व राहणीवर अमेरिकेचा प्रभाव पडला आहे. शहरी माणसाचा वेष पाश्चात्त्यांसारखा असला, तरी घरी परतल्यावर तो आपला ढगळ वेषच चढवितो.

रोजच्या जेवणात मसुराची डाळ, ऑलिव्ह तेल, तूप-लोणी व लिंबू असते. मांस खाणे सर्वांना आवडत असले, तरी श्रीमंत माणसेच फक्त ते रोज खाऊ शकतात. मध्यमवर्गीय माणूस भात व मक्याची भाकरी खातो. ठराविक वेळीच भाजीपाला मिळतो. अशा वेळी कांदे व टोमॅटो खूप खाल्ले जातात. चीज, खजूर, द्राक्षे, जर्दाळू इ. फळे नेहमीच्या आहारात असतात. काळा चहा व टर्किश कॉफी ही रोजची पेये होत.

शिक्षणाचे प्रमाण जसजसे वाढत गेले तसतसे बुरख्याचे प्रमाण कमी होत जाऊन १९३० नंतर ते जवळजवळ नाहीसे झाले. अल्-अझार विद्यापीठाच्या उलेमांनी स्त्रियांच्या मताधिकारास विरोध केला होता तथापि १९५२ पासून स्त्रियांना हा अधिकार मिळाला. पाश्चिमात्य संस्कारांमुळे सध्या स्त्रियांना बऱ्याच क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीचे स्थान मिळते.

ईजिप्तचा राष्ट्रीय धर्म इस्लाम आहे. ९१% लोक सुन्नी पंथाच्या शाफी शाखेचे आहेत. हनफी व मालिकी उत्तर ईजिप्तमध्ये आहेत. दरवेशी लोक बरेच आढळतात. तसेच कॉप्टधर्मीय ८% असून, कॅथलिक, प्रोटेस्टंट, ग्रीक ऑर्थोडॉक्स, सिरियन वगैरेही बरेच आहेत. कॉप्ट लोक वरच्या अधिकारावर आहेत. १९६८ नंतर ज्यूंची संख्या अत्यल्प झाली आहे. एकट्या कैरोत २५० पेक्षाही जास्त मशिदी आहेत. मुस्लीम सण-उत्सव  साजरे केले जातात. पैगंबराची नात झैनब हिचा जन्मदिवस रजब महिन्यात मुलिद सण म्हणून साजरा केला जातो. महमाल म्हणजे सुशोभित पालखी. शव्वाल महिन्यात महमाल व किस्वा (चादर) यांची उंटावरून मिरवणूक काढतात. शमे एननेस्सिम (पश्चिम वाऱ्याचा सुवास) हा सण कॉप्ट व मुसलमान, कॉप्टिक नाताळाच्या दुसऱ्या दिवशी साजरा करतात. जून १७ (कॉप्टिक बउनेह ११) चा दिवस लेयलेत एन्‌नुक्ताह (मृगाच्या पावसाची रात्र) म्हणून साजरा करतात. या दिवशीच पुरातन काळी एका कुमारिकेचा बळी नाईलला अर्पण करण्यात येई.

ईजिप्तची सु. २०% लोकसंख्या कैरो व ॲलेक्झांड्रिया या दोन शहरांत असून पोर्ट सैद, गीझा ताँता, माहॅल्ला एल् कूब्रा, सुएझ, मॅनसुरा, दमनहूर, झॅग-आ-झिग, अस्यूत, इस्मेइलीया, फायूम, इंबाबा ही १९६० मध्ये एक लाखांहून अधिक लोकवस्ती असलेली शहरे होती.

ईजिप्तची राष्ट्रीय भाषा अरबी आहे. न्यूबिअन समाज न्यूबिअन भाषाही बोलतो. कॉप्टिक भाषा मठांत वापरली जाते. पाश्चात्य संस्कृतींशी संबंध आल्यावर ईजिप्तमधील साहित्याची वाढ होऊ लागली. सामी अल्-बरूदी (१८३९–१९०४) याने इस्लामावर काव्य केले अब्बास अल्-अक्कड (१८८९–   ) हा प्रसिद्ध कवी व लेखक आहे मलक हिफ्‍नी नासिफ (१८८६–१९१८) हा कवी आणि लेखक असून स्त्रियांच्या उन्नतीसाठी याने खूप प्रयत्‍न केले. अहमद झकी अबू शाली (१८९२–  ) हा प्रसिद्ध कवी व लेखक व नाटककार आहे. महमूद तिमूर (१८९४–  ) हा लोकप्रिय नाटककार असून त्याने सामान्य लोकांवरील लिहिलेल्या गोष्टी प्रसिद्ध आहेत. ताफिक अल्-हकीम (१९०२–  ) हा नाटककार व कांदबरीकार आहे [→ अरबी साहित्य].

पांडे, वि. गो.

शिक्षण : ईजिप्तची शैक्षणिक परंपरा प्राचीन आहे. इस्लामपूर्व काळात पुरोहित, कारागीर व लेखनिक ह्यांच्याकरिता खास विद्यालये होती. हस्ताक्षर आणि गणित ह्यांचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर ज्योतिष, भूमिती, वैद्यक, स्थापत्य अभियांत्रिकी, शिल्पकला इ. विषय शिकविले जात. पुढे सातव्या शतकापासून ईजिप्तमध्ये अरबी भाषा, इस्लाम धर्म आणि वाङ्‌मय यांचा प्रसार झाला आणि त्याबरोबर शिक्षणपद्धतीत अनेक बदल झाले. इस्लाम धर्म आणि अरबी भाषा यांच्या अध्यापनाकरिता प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणसंस्था स्थापन झाल्या. ⇨ अल् अझार (सु. ९७०) हे प्रसिद्ध विद्यापीठही स्थापन करण्यात आले. ही शिक्षणपद्धती एकोणिसाव्या शतकापर्यंत अस्तित्वात होती व अंशत: अजूनही अस्तित्वात आहे. ईजिप्तमध्ये आधुनिक पाश्चिमात्य शिक्षणास पाशा मुहंमद अली याने १८३६ च्या सुमारास सुरुवात केली. फ्रेंच व ब्रिटिश ह्यांच्या आगमनानंतर ख्रिस्ती मिशनऱ्यांनी आधुनिक शिक्षणसंस्था काढण्यास प्रारंभ केला. पुढे ईजिप्तच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५२ मध्ये राष्ट्रीय स्वरूपाची शिक्षणपद्धती अस्तित्वात आली.

फ्रेंच आणि ब्रिटिश यांच्या अनुकरणामुळे प्रारंभीच्या शिक्षणपद्धतीत गरीब, श्रीमंत असा वर्गभेद केला जाई. १९२३ नंतर अनेक चळवळी व कायदे होऊन हा वर्गभेद नाहीसा झाला व एकात्म राष्ट्रीय शिक्षणपद्धती १९५६ च्या शैक्षणिक कायद्यान्वये अंमलात आली. तत्पूर्वी १९२३ ते ५६ च्या दरम्यान निरक्षरतेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सक्तीचे शिक्षण, मोफत शिक्षण, ग्रामीण भागाकरिता स्वतंत्र व सापेक्षत: सोपा अभ्यासक्रम आणि शैक्षणिक संस्थांना उत्तेजनपर अनुदान वगैरे योजनांद्वारे प्रयत्‍न करण्यात आले. सहा ते बारा वर्षांपर्यंतच्या सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण १९३३ पासून सक्तीचे केले असून शालेय शिक्षण एकूण बारा वर्षांचे आहे. सहा वर्षे प्राथमिक, तीन वर्षे कनिष्ठ माध्यमिक व तीन वर्षे उच्च माध्यमिक अशी शालेय शिक्षणाची विभागणी आहे. १९४४ पासून प्राथमिक आणि १९५० पासून माध्यमिक व तांत्रिक शिक्षण व १९५२ पासून सर्वच शिक्षण मोफत करण्यात आले. पूर्वी प्राथमिक शाळांचे अनेक प्रकार होते, आता त्यांचे एकत्रीकरण करून सर्व प्राथमिक शिक्षण एकाच दर्जाचे केले आहे. माध्यमिक शिक्षणात विद्याविषयक, औद्योगिक आणि धंदेविषयक असे तीन प्रकार केले आहेत. हे शिक्षण झाल्यावर त्याच क्षेत्रातील विशेष शिक्षण दिले जाते. वाङ्‌मय, तंत्रविद्या, विज्ञान, अध्यापनशास्त्र, वैद्यक, कृषी असे विषय महाविद्यालयांत शिकविले जातात. प्राथमिक शिक्षणापासून विद्यापीठीय शिक्षणापर्यंतचे सर्व शिक्षण मोफत आहे आणि शिक्षणावरील बहुतेक खर्च मध्यवर्ती सरकार करते. ईजिप्तमध्ये १९६९-७० मध्ये ८,४१७ प्राथमिक शाळांत ३७,४०,५५१ विद्यार्थी व ९०,७७३ शिक्षक १,१९५ पूर्व माध्यमिक शाळांत ६,८२,१९६ विद्यार्थी ४७० माध्यमिक शाळांतून १०,३१,८२० विद्यार्थी व ४३,९५८ शिक्षक व्यवसाय शाळांतून १,६२,६५६ विद्यार्थी व १०,८०० शिक्षक ७२ शिक्षकप्रशिक्षण शाळांतून ३४,८९४ विद्यार्थी व ३,५८५ शिक्षक आणि सर्व विद्यापीठांतून १,७५,८८१ विद्यार्थी होते.

धार्मिक शिक्षण देण्याची ईजिप्तमधील परंपरा जुनी आहे. प्राथमिक शिक्षणात अरबी भाषा व इस्लाम धर्म यांचे शिक्षण सर्व इयत्तांना देण्यात येते. लेखन, वाचन, इतिहास, भूगोल, गणित इ. विषयांचे शिक्षण पाश्चिमात्य पद्धतीनुसारच आहे. पाचव्या इयत्तेपासून इंग्रजी वा अन्य यूरोपीय भाषा शिकविली जाते. नीतिशिक्षण, शारीरिक शिक्षण, चित्रकला आणि मुलांना हस्तव्यवसाय व मुलींना गृहशिक्षण या विषयांचा समावेश अभ्यासक्रमात केला आहे. ग्रामीण विद्यार्थ्यासाठी कृषी व ग्रामीण जीवनाशी संबंधित असलेल्या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. ह्याशिवाय अभ्यासक्रमात आधुनिक शिक्षणाबरोबरच प्राचीन भाषा-साहित्य, शास्त्रे व धर्म ह्यांच्या शिक्षणाची खास व्यवस्था आहे. प्रारंभी कुराणाचा अभ्यास झाल्यावर चार वर्षे पूर्व माध्यमिक व पाच वर्षे उत्तर माध्यमिक, असा नऊ वर्षांचा अभ्यास पूर्ण करून विद्यार्थी अल्-अझार ह्या प्रसिद्ध विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊ शकतो. ह्या विद्यालयांचे स्वरूप जुन्या पाठशाळांप्रमाणे होते. आता ह्या विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीचेही शिक्षण वरील विद्यापीठांत उपलब्ध करून देण्यात आले आहे.

प्रौढांच्या शिक्षणाकरिता दोन महत्त्वाचे उपक्रम केले आहेत. १९४४ च्या सक्तीच्या साक्षरता कायद्यानुसार १२ ते ४५ वयांचे पुरुष आणि १२ ते १५ वयांच्या मुली यांना साक्षरता वर्गाला गेलेच पाहिजे, अशी सक्ती आहे. साक्षरता वर्ग सर्वत्र असून सायंशाळा व जनता विद्यापीठ त्याचा प्रसार व प्रचार करितात. या विद्यापीठाच्या एकूण सोळा शाखा देशभर विखुरलेल्या आहेत.

ईजिप्तमध्ये एकूण सहा विद्यापीठे आहेत. त्यांपैकी तीन कैरोस असून प्रत्येकी एक ॲलेक्झांड्रिया, अस्यूत व गीझा या ठिकाणी आहे. अल्-अझार हे विद्यापीठ सर्वांत जुने आहे. त्यात पूर्वी अरबी संस्कृती व इस्लाम-धर्म हे विषयच शिकविले जात. पण आता वरील विषयांबरोबर इतर विषयही अभ्यासक्रमात अंतर्भूत केले आहेत. विद्यापीठांत १९६९-७० साली सु. १,७५,८८१ विद्यार्थी शिकत होते. वरील विद्यापीठांव्यतिरिक्त संगीत, कला, अनुप्रयुक्त कला, रंगभूमी, चित्रपट वगैरेंकरिता स्वतंत्र महाविद्यालये व प्रशिक्षण देणाऱ्या सु. ७८ संस्थांमधून ४२,५४९ विद्यार्थी शिकत होते. ईजिप्त मध्ये १९७२-७३ साली मान्यवर अशी ४० ग्रंथालये होती. त्यांतील लायब्ररी ऑफ द इन्स्टिट्यूट द ईजिप्त हे ग्रंथालय प्रसिद्ध असून त्यात सु. १,६०,००० ग्रंथ आहेत. एकूण तेरा वस्तुसंग्रहालयांपैकी ईजिप्शियन नॅशनल म्यूझियम (मीदान एल् तहरीर, कस्र एल्-नील) हे कैरो येथील संग्रहालय प्राचीन दुर्मिळ वस्तूंकरिता ख्यातनाम आहे. ईजिप्तमध्ये याशिवाय एकूण १६ दैनिके व ६८ नियतकालिके होती. त्यांपैकी अल्-अहरम, अखबर अल्-यॉम  व अल्-अखबर  ह्या प्रत्येक दैनिकाचा खप अडीच लाखांपेक्षा अधिक आहे. २३ मे १९६० रोजी सर्व वृत्तपत्रांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

शैक्षणिक बाबतीत पुष्कळ कायदे करूनही म्हणावा तसा शिक्षण प्रसार अजून झालेला नाही. शेकडा पन्नास टक्के लोक अजूनही निरक्षर आहेत. शिक्षणक्षेत्रात स्त्रियांचे प्रमाण फारच कमी आहे. उच्च शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी असून, विद्यापीठीय विद्यार्थ्यांत मानव्यविद्यांतर्गत विषयांचेच अध्ययन अधिक केले जाते. त्यामुळे सरकारतर्फे अनेक सवलती व सोयी पुरवून शिक्षणाचा जोराने प्रसार करण्यात येत आहे.

 खैर, ग. श्री.

कला व क्रिडा : नृत्य व गाणी ईजिप्शियन माणसाला फार प्रिय आहेत. कहनूमवाद्यावर नृत्यांगना फेर धरधरून नृत्य करतात. खेडूतही शेतावर काम करीत असताना गाण्याचा ताल धरतात. एकोणिसाव्या शतकातील प्रसिद्ध इटालियन कंपोझर जूझेप्पे वर्दी यांचे संगीत-नृत्य-नाटक ऐदाईजिप्तमध्येच रचले गेले. देशात १९५५ मध्ये ३५५ चित्रपटगृहे होती. सॉकर हासर्वांचा आवडता खेळ आहे. श्रीमंत लोक टेनिस, पोहणे, नौकाविहार वगैरे खेळ खेळतात. घरात बसून बुद्धिबळाची प्यादी हलविण्यातही अनेक लोक मशगुल असतात. पैगंबरांचा जन्मोत्सव नऊ दिवस चालतो. त्यावेळी खेळांची लयलूट असते.

महत्त्वाची स्थळे : ईजिप्तमध्ये पाहण्यासारखे खूपच आहे. जुन्या ईजिप्त संस्कृतीचे अमोल भांडार नाईलच्या परिसरात उभे असून दरवर्षी सु. चारपाच लाख परकीय भेट देण्यास येतात. पिरॅमिड, स्फिंक्स, थडगी अथवा जुने राजवाडे यांबरोबरच कैरो व ॲलेक्झांड्रिया शहरांतील आधुनिक वास्तू, ईजिप्तचे लोक, त्यांची राहणी व संस्कृती हेही लोकांना आकर्षण आहेत. यांच्या कर्तृत्वामुळे ईजिप्तला अरब जगतातच नव्हे तर जगातही श्रेष्ठ दर्जा प्राप्त झाल्याने, कैरो हे आंतरराष्ट्रीय दळणवळणाचे मोठे केंद्र बनले आहे. (चित्रपत्रे ५७,५८).

पांडे, वि. गो.

संदर्भ : 1. Last, G. C. A Regional Survey of Africa, Addis Ababa, 1964.

2. Lloyd, G. A. Egypt Since Cromer, 2 Vols., London, 1938-39.

3. Methews, R. D.; Matta, Akrawi, Education in Arab Countries of the Near East, Washington, 1949.

4. Moehlman, Arthur Henry; Roucek, Joseph S. Ed., Comparative Education, San Francisco, 1951.

 

स्फिंक्स, गीझा (ईजिप्त).
एक तरुण ईजिप्शियन किसान
कैरो : एक दृश्य.
आधुनिक ॲलेक्झांड्रिया
सुएझ कालव्यावरील प्रसिद्ध पोर्ट सैद बंदर
निर्मितीचा आनंद : जगप्रसिद्ध ईजिप्शियन कापूस.
नाईल नदीवरील सुप्रसिद्ध आस्वान धरण
‘इराणी रहाटगाडगे’ : ईजिप्तची पारंपारिक पाणीपुरवठा-पद्धत.