इस्लाम धर्मातील पदाधिकारी : कोणत्याही नव्या धर्माच्या स्थापनेनंतर त्याचा प्रचार व त्यानुसार आचरण करणाऱ्या धर्मगुरूंचा वा उपाध्यायांचा वर्ग थोड्याच अवधीत उदयास येणे स्वाभाविकच ठरते. इस्लामपूर्वी यहुदी धर्मातही अशा उपाध्यायांची परंपरा अस्तित्वात होती आणि तीच पुढे काही फेरफार करून ख्रिस्ती व इस्लामी या धर्मांनीही उचललेली दिसते. उपाध्याय म्हणजे धर्मातील विधिनिषेधांच्या अनुरोधाने यज्ञयाग, संस्कार, पूजा इ. कर्मकांड जमातीसाठी चालवणारा धर्माधिकाऱ्याचा वर्ग. या वर्गाची राजपदाशी अपरिहार्य सांगड प्राचीन धर्मांतून घातली गेलेली आढळते. इस्लामचे आद्य संस्थापक मुहंमद हेच इस्लामी राज्याचे राजेही बनले ही गोष्ट प्रसिद्धच आहे. पुढेही काही काळ राजपद व धर्मगुरूचे पीठ ही दोन्हीही खलीफाच्याच स्वाधीन असत. त्यालाच ⇨ इमाम अशीही संज्ञा असे. इस्लामी राज्य दूरवर परसल्यानंतरही त्याचा पसारा एका व्यक्तीच्या नियंत्रणक्षमतेपलीकडे गेला नव्हता, तोपर्यंतच ही व्यवस्था टिकू शकली. परंतु साम्राज्याचा अफाट विस्तार होऊन, राज्याचे शासकीय कार्यच जेव्हा अनेकपटीने वाढले, तेव्हा मात्र धार्मिक व राजनैतिक सत्तेची फारकत करणे अपरिहार्य ठरले. प्रथम राजाच आपले प्रतिनिधी विविध प्रदेशांत धर्माचे आचारविचार टिकवून ठेवण्याच्या व त्यांचा प्रसार करण्याच्या कामासाठी नेमीत असे. पुढे खलीफाहून स्वतंत्र असा इमामच नेमला जाऊ लागला. ‘इमाम’ म्हणजे ज्याचे अनुकरण करावे असा आदर्श पुरुष. अर्थातच त्याला धार्मिक जीवनाच्या सर्वच अंगांच्या क्षेत्रात भलतेच महत्त्व दिले जाई. मुहंमदांचाच तो धार्मिक वारस मानला जाई. ‘इज्मां’ मधूनच अशा इमामांची निर्मिती झाली. त्यांच्याच अनुरोधाने हे धर्माग्रणी नियुक्त केले जात. शिया पंथ इमामपद ईश्वरनियुक्त मानतो खारिजींच्या मते मात्र इमामाचे अस्तित्व सोय म्हणून ग्राह्य असले, तरी तशा ईश्वरनियुक्त इमामाचे अस्तित्व मात्र मुळीच अटळ नाही. मुताझिली पंथही इमामपदाचा विचार तर्कनिष्ठ भूमिकेवरूनच करतो. सुन्नींच्या मते मात्र इतर सामान्य व्यक्तींप्रमाणेच इमामही स्खलनशील असला, अगदी पापेदेखील करीत असला, तरी इस्लामचे विधिनिषेध कार्यान्वित करण्यात तो जोपर्यंत चूक करीत नाही, तोपर्यंत त्याची आज्ञा मानायलाच हवी. खलीफाचे वा पुढे प्रमुख धर्मगुरूचे इमामपद हे सर्वोच्च होय. त्याच्या हाताखाली कनिष्ठ श्रेणीचे इमाम शुक्रवारची प्रार्थना चालवण्यासाठी नेमलेले असत. ही व्यवस्था दृढमूल होण्यापूर्वी इमाम या नात्याने प्रार्थना सांगण्याचे आणि शुक्रवारचा खुत्बा चालवण्याचे कामही राजाकडेच असे. राजकीय कार्याचा भार वाढल्यामुळे स्वतंत्र, प्रमुख व दुय्यम इमाम नेमले जाऊ लागले असले, तरी त्यांनाही काही राजकीय अधिकार दिले जात. उदा., तुर्कस्तानातून खिलाफतीचे उच्चाटन होईपर्यंत इमाम मंत्री म्हणूनही काम पहात असत. सुंता, विवाह, उत्तरक्रिया इ. धर्मविधींच्या भरीला, विदेशगमनाचे अनुज्ञापत्र देण्यासारखी शासकीय कामेही ते पाहत इराणमध्ये मात्र इमाम हा केवळ धार्मिक धर्मकांडापुरताच नेमला जाई. धार्मिक प्रश्नांचा उलगडा करणे, धर्मसंस्थांच्या संचालनाविषयी नियम घालून देणे इ. दायित्वही त्यांच्यावरच असे. इराणचे उपाध्याय बहुधा शिया पंथीय असत. मक्केच्या यात्रेची व परतीची अनुज्ञापत्रे देण्याचा अधिकारही प्रारंभी खलीफाकडेच असे. पुढे स्वतंत्र इमाम राजप्रतिनिधी या नात्याने धर्मगुरूचे काम पाहू लागल्यानंतर, हेही काम ‘अमीर-अल्-हज्ज’ म्हणून इमामाकडे सोपविण्यात आले. काबामधील मुख्य प्रार्थना, शुक्रवारचा खुत्बा आणि अन्य प्रासंगिक प्रार्थना तोच चालवी. पुढे मशिदींच्या मनोऱ्यावरून प्रार्थनेसाठी आवाहन करणारे अथवा बांग देणारे ⇨ मुअज्जिन स्वतंत्रपणे इमामाकडून नेमले जाऊ लागले. दुय्यम धर्मगुरू म्हणून ⇨ काजींचाही वर्ग उदयास आला. त्यांची वेतने शासकीय कोशातून दिली जात.
काजीही इमामाचेच कार्य करीत असतो. ‘शरीयत’च्या आधारे न्यायदान करण्याचे कामही त्याच्याकडेच असे. मुसलमानी राज्यातील सर्वश्रेष्ठ धर्माधिकारी,‘शेख-उल्-इस्लाम’ काजींची नेमणूक आणि त्यांच्या कार्यावर देखरेखही करीत असे. मोगल राजवटीत राजालाच ‘इमाम-अल्-मुस्लिमीन’ म्हणजे प्रमुख धर्माधिकारी मानले जाई. अर्थातच तो राजा कितीही दुराचारी असला, तरी प्रमुख इमाम या नात्याने त्याच्या आज्ञा अनमान न करता पाळल्या जात. अशा कितीतरी घटना इतिहासाने नोंदून ठेवलेल्या आहेत. ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर मात्र काजीचे न्यायालयीन अधिकार नामशेष झाले. न्यायदानाचे दायित्व स्वत:कडे घेऊन ब्रिटिश शासनाने त्यासाठी न्यायालये नेमल्यामुळे, मुसलमानांच्याही समाजात न्यायदानाचा अधिकार काजीला उरला नाही. धर्माधिकारी या नात्याने लाभलेले काजीपद हे पुढे वंशपरंपरेने उपनाव बनले. परंतु आडनाव वंशाने उचलले असले, तरी काजीचे पद मात्र वंशपरंपरेने प्राप्त होत नसते. मुसलमानांपुरता त्यांचा मुसलमानी कायदा स्वीकारून आज स्वतंत्र भारतातही न्यायदानाचे कार्य न्यायालयेच पार पाडतात.
आज काजीची नेमणूक ‘वक्फ’ निधीचा विश्वस्त असलेला ‘मुतवल्ली’ करतो. स्वत:ची संपत्ती धर्मादाय करणारी व्यक्ती स्वत:चीच विश्वस्त म्हणून नियुक्ती करू शकते. असा विश्वस्त निधी मशिदी, ‘तकिये’(फकिरांचे वा दरवेशांचे वसतिस्थान, थडगे वा कबरस्तान), ‘खानका’, (धर्मोपदेश, ध्यानधारणा, चिंतन-मनन, उपासना वा अनुष्ठाने सामुदायिकरीत्या करण्यासाठी बांधलेले फकिरांचे अथवा दरवेशांचे मठ), दर्गे, ‘इमामबारे’ (सार्वजनिक प्रार्थनेसाठी नव्हे, तर इतर धर्मकार्यासाठी शिया पंथीयांनी बांधलेली सभागृहे) इत्यादींसाठी वापरण्याचा अधिकार मुतवल्लीकडेच असतो. खानकांच्या प्रमुखांना ‘सज्जादनशीन’ अशी संज्ञा असून त्या पदावर मूळ महंत, त्याचे वंशज अथवा प्रतिनिधी नियुक्त केले जातात. दर्ग्याचा व्यवस्थापक ‘मुजावर’म्हणून ओळखला जातो परंतु त्याला धर्मोपदेशाचे अधिकार नसतात. मुसलमानी देशांत ⇨ शरीयत कायद्याची व्याप्ती व व्यवहार त्या त्या काजीच्या धर्मपंथानुसार (मघब-मजहब) ठरत असतात. भारतात मात्र मुसलमानी शरीयतची व्याप्ती व व्यवहार, न्यायप्रविष्ट व्यवहारातील वादीच्या उपपंथानुसार निश्चित केले जातात. कारण भारतात न्यायालयात आता काजींना स्थान नसते. उदा., ईजिप्तमध्ये सर्वत्र ‘हनफी’कायदाच लागू केला जातो, तर भारतात वादी हनफी असेल, तरच त्याला हनफी कायदा लागू होईल. इथना, अशरी वा फातिमी इस्माइली वादींना त्या त्या पंथाच्या कायद्याच्या अनुरोधाने न्याय मिळतो. इस्लाम धर्म वंशपरंपरागत काजीपद मानीत नाही. धार्मिक करार लिहीणारा, विवाह लावणारा वा नोंदणारा अधिकारी इस्लामच्या दृष्टीने आवश्यक नसतो. काजीपदी पुरुषच नियुक्त केला पाहिजे असा मात्र नियम आहे. काजी ‘नायब काजी’ची नेमणूक करू शकतो. काजींची नेमणूक नडवा, देवबंद, अलीगढ इ. मुसलमानी विद्यापीठांत इस्लामचे शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या स्नातकांतून केली जाते.
करंदीकर, म. अ.