इस्तंबूल : कॉन्स्टँटिनोपल. तुर्कस्तानचे सर्वांत मोठे शहर आणि महत्वाचे बंदर. लोकसंख्या २३,१२,७५१ (१९७०). काळा समुद्र आणि मार्मारा समुद्र यांना जोडणाऱ्या बॉस्पोरसच्या सामुद्रधुनीने यूरोप आशियापासून विभक्त झाला आहे परंतु इस्तंबूल सामुद्रधुनीच्या दोन्ही बाजूंस पसरल्याने त्याची दोन्ही खंडांत गणना होते. इस्तंबूल अनेक गावांचे मिळून बनले आहे. यूरोपीय भूभागाच्या दक्षिण टोकाला इस्तूंबल वसले आहे. त्याच्या उत्तरेस मार्माराचा गोल्डन हॉर्न फाटा असून त्यापलीकडे गालाता व पेरा ही इस्तंबूलची उपनगरे आहेत. इस्तंबूल व गालाता दरम्यान दोन पूल आहेत. आशियाई भागात ऊस्कूदार व हैदरपाशा ही महत्वाची उपनगरे आहेत. यूरोपीय व आशियाई इस्तंबूलमध्ये बोटीने वाहतूक चालते. इस्तंबूलच्या यूरोपीय भागापर्यंत यूरोपातून ओरिएंट एक्स्प्रेस लोहमार्ग येतो, तर आशियाई भागापासून बगदाद रेल्वे सुरू होते. इस्तंबूलमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तुर्कस्तानचा ६० टक्के व्यापार इस्तंबूलच्या बंदरातून होतो. येथे जहाजबांधणी, कापड, चिनी मातीची भांडी, चामड्याच्या वस्तू, तंबाखू, मद्य, काच, आटा आदी उद्योग असून तुर्कस्तानच्या व्यापारी, औद्योगिक तसेच सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक घडामोडींचे हे केंद्र समजले जाते. यूरोप-आशियातील व्यापारमार्गावरील हे अतिशय मोक्यावरचे ठाणे इ. स. पू. ५०० च्या सुमारास ग्रीकांनी बिझँटिअम नावाने वसविले. डरायस, अलेक्झांडर यांच्यानंतर हे शहर रोमन साम्राज्याखाली आले. रोमन सम्राट पहिला कॉन्स्टंटीन ह्याने इ. स. ३०० मध्ये आपली राजधानी येथे आणली शहराची सुधारणा केली आणि त्याला नवीन रोम असे नाव दिले. परंतु शहराचे नाव बादशहावरून कॉन्स्टँटिनोपल पडले व ते १९३० पर्यंत अधिकृत होते. इस्तंबूल १४५३ पर्यंत रोमन साम्राज्याची व नंतर १९२२ पर्यंत ऑटोमन तुर्कांची राजधानी होती. १९२३ मध्ये राजधानी अंकाराला गेली, तरी शहराचे महत्त्व कायम राहिले. विसाव्या शतकापर्यंत येथे पाण्याचे हाल होते. तथापि १९०९ नंतर पाण्याची सोय, गटारे, अनेक अद्ययावत कार्यालये, उत्तम रस्ते अशा अनेक सुधारणा येथे झाल्या. तथापि दोन साम्राज्यांतील प्राचीन अवशेष हेच इस्तंबूलचे अद्याप आकर्षण आहे. इतंस्बूलमध्ये अनेक मशिदी आहेत. मूळच्या चर्चमध्ये १४५३ मध्ये बांधलेल्या सेंट सोफिया मशिदीची जगातल्या उत्कृष्ट वास्तुशिल्पात गणना केली जाते. बॅजझेट, सुलेमान, अहमद यांनी बांधलेल्या मशिदीही उत्तम असून जुने राजवाडे, उपवने, किल्ले आदी वास्तूही प्रेक्षणीय आहेत. ग्रीक, ज्यू, आर्मेनियन त्याचप्रमाणे यूरोप-आशियातील अनेक लोकांनी इस्तंबूलच्या विकासास हातभार लावला असून अद्यापही इस्तंबूलच्या संमिश्र लोकवस्तीने हे वैशिष्ट्य टिकविले आहे. (चित्रपत्र ७४).

शाह, र. रू.

जगप्रसिद्ध सेंट सोफिया मशीद, इस्तूंबल