इनोथेरा रोजिया : (ईव्हनिंग प्रिमरोज; कुल-ऑनेग्रेसी). सु. ३०–६० सेंमी. उंचीची ही शोभिवंत वनस्पती मूळची मेक्सिकोतील (म. अमेरिका) असून हल्ली सर्वत्र बागेत लावलेली आढळते. विशेषेकरून उंच प्रदेशात (महाराष्ट्रात महाबळेश्वरी) लावतात. ह्या द्विवर्षायू (दोन वर्षे जगणाऱ्या) किंवा बहुवर्षायू (पुष्कळ वर्षे जगणाऱ्या) ओषधीची [→ ओषधि ] पाने साधी, एकाआड एक, भाल्यासारखी अगर अंडाकृती-भाल्यासारखी असतात कडा अखंड किंवा दातेरी फुले लहान, द्विलिंगी, पानांच्या बगलेत, एकाकी किंवा फुलोऱ्यावर हिवाळ्यात येतात ती गर्द गुलाबी अथवा जांभळट असून फुलांची संरचना व इतर शारीरिक लक्षणे ⇨ ऑनेग्रेसी  कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात टोकदार बोंडावर आठ पंख असतात. पूर्ण निचऱ्याची हलकी जमीन व सूर्यप्रकाश मिळाल्यास वाढ चांगली होते. थंड हवा व कमी पाऊस असलेल्या ठिकाणी जून ते जुलैमध्ये व इतर ठिकाणी ऑक्टोबरमध्ये बी पेरतात; पुढे ३०–४५ सेंमी. अंतरावर वाफ्यांत रोपे लावतात. इनोथेरा बायेनिस  (कॉमन ईव्हनिंग प्रिमरोज) ह्या ओषधीच्या मुळांचा व कोवळ्या पाल्याचा यूरोपात व उ. अमेरिकेत भाजीकरिता उपयोग करतात.

कुलकर्णी, उ. के.