इमादशाही : (१४९०–१५७४). वर्‍हाडात स्थापन झालेले एक स्वतंत्र राज्य. बहमनी सत्ता विस्कळीत झाल्यानंतर मूळचा ब्राह्मण, पण बाटून मुसलमान झालेल्या फतहुल्ला नावाच्या सरदाराने १४९० च्या सुमारास एलिचपूर येथे हे राज्य स्थापन केले. सामान्यतः आजचा सर्व वर्‍हाड तसेच मराठवाडा व तेलंगण यांमधील गोदावरीच्या उत्तरेकडील प्रदेश या राज्याच्या कक्षेत मोडत होता. फतहुल्लानंतर त्याचा मुलगा अलाउद्दीन गादीवर आला (१५०४–१५२९). निजामशाहीशी तंटा होऊन त्यास आपल्या हातची पाथरी व माहूर ही गावे गमवावी लागली. कुत्बशाहीनेही इमादशाहीचा आग्‍नेयीकडील प्रदेश घेतला. अलाउद्दीननंतर गादीवर आलेला त्याचा मुलगा दर्या (१५२९–१५६२) याने अहमदनगर व विजापूरमध्ये निर्माण झालेल्या भांडणांत कधी या पक्षाच्या, तर कधी त्या पक्षाच्या बाजूने भाग घेऊन आपली बहुतेक कारकीर्द घालविली. त्याच्यानंतर गादीवर आलेला त्याचा मुलगा बुर्हान हा अल्पवयी होता. त्यामुळे तुफालखान नावाच्या धूर्त सरदाराला बालराजास कैद करून सर्व सत्ता आपल्या हाती घेण्यास फावले. या घटनेनंतर काही वर्षांनी मुर्तजा निजामशाहाने इमादशाही प्रदेशावर स्वारी केली. तुफालखान, बालराजा, बुर्हानशाह व त्यांचे नातलग यांना त्याने ठार मारले व इमादशाहीचा प्रदेश आपल्या राज्यास जोडला (१५७४).

हे राज्य पुरी शंभर वर्षेही टिकले नाही. या छोट्याशा कालखंडात भैरवगड, भवरगड, मेळवाट वगैरे छोटेमोठे डोंगरी किल्ले, त्याचप्रमाणे जामोद व एलिचपूर येथील भुईकोट किल्ले बांधण्यात आले. सुलतान इमादुल्मुल्क याचा भव्य ईदगाह व एलिचपूर येथील हौज द कटोरा नामक जलविहार यांवरून इमादशाही सुलतानांच्या कलासक्तीचे दर्शन घडते.

खोडवे, अच्युत