ऑयलर,उल्फ स्व्हँटे फोन: (७ फेब्रुवारी १९०५– ). स्वीडिश शरीरक्रियाविज्ञान विद्. ऑयलर यांना १९७० चे वैद्यक विषयाचे नोबेल पारितोषिक ज्यूल्यस ॲक्सलरॉड आणि बर्नार्ड काट्झ यांच्या बरोबर विभागून मिळाले. १९२९ च्या रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे सहविजेते हान्स फोन ऑयलर–केल्पिन यांचे हे पुत्र होत.
त्यांचा जन्म स्टॉकहोम येथे झाला. त्यांनी सुरुवातीस ब्रिटन, बेल्जियम आणि अर्जेंटिना येथील विद्यापीठांत काम केले. स्वीडनमधील कॅरोलिना संस्थेची एम्.डी. ही पदवी १९३० साली मिळविल्यानंतर त्याच संस्थेमध्ये शरीरक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली व तेथेच त्यांचे संशोधन कार्य चालू आहे.ऑयलर यांनी १९४८ मध्ये अनुकंपी तंत्रिका तंत्रातील [मज्जातंतू व्यूहातील, → तंत्रिका तंत्र] संवेदना नॉर ॲड्रेनॅलीन या हॉर्मोनामुळे होते असे दाखवून दिले. नॉर ॲड्रेनॅलीन हे अनुकंपी तंत्रिका तंत्रातील तंत्रिका तंतूमधील कणसदृश पदार्थात साठविले जाते हेही त्यांनी सिद्ध केले. त्यामुळे तंत्रिका संवेदना कशा प्रकारे पसरतात हे कळणे सुलभ झाले. अतिरिक्त रक्तदाब व रोहिणी–काठिण्य यांसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना स्वीडिश ऑर्डर ऑफ नॉर्थ स्टार आणि स्टाऊपर पारितोषिक हे सन्मान मिळाले.
ढमढेरे, वा. रा.