आरेख्यक कला : सामान्यपणे आरेख्यक (ग्रॅफिक) कलांच्या क्षत्रात रेखन, सुलेखन (कॅलिग्राफी), चित्रण, उत्कीर्णन (एन्ग्रेव्हिंग) आणि विविध
मुद्रणप्रकार इत्यादींचा समावेश होतो. तथापि आरेख्यक कलांचा प्रचलित असलेला मर्यादित अर्थ म्हणजे मूळची चित्राकृती, आकृती, छायाचित्र किंवा शिल्पाकृती आदींची मुळाबरहुकूम अशी नमुनेवजा प्रतिकृती निर्माण करण्याचे कलात्मक तंत्र असा होतो. अशी नमुनेवजा प्रतिकृती हाताने किंवा यांत्रिक साहाय्याने तयार करून तिच्या आधारे हाताने किंवा यंत्राद्वारे अनेक प्रती काढल्या जातात. अशा प्रती मूळ चित्राकृती, आकृती आदींच्या माध्यमांहून वेगळ्या माध्यमांतही काढल्या जातात. उदा., एखाद्या शिल्पाकृतीच्या प्रतिकृती मासिकासाठी वा ग्रंथासाठी
कागदावर तयार केल्या जातात. आरेख्यक कलेचा अंतिम हेतू मूळच्या प्रतिमेची हुबेहूब प्रतिकृती किंवा मुद्रित नमुना तयार करणे, हा असल्याने अनेक तांत्रिक प्रक्रियांचा तीत समावेश होतो.
स्थूल इतिहास : पूर्वी हस्तलिखितांची सजावट करण्याची पद्धत होती. आधुनिक आरेख्यक कलांमागील दृष्टी अशा हस्तलिखितशोभनातही दिसून येते. प्राचीन ऑरिग्नेशियन कालखंडात (इ. स. पू. सु. ३०,०००) हस्तिदंत, शिंगे, हाडे व पाषाणखंड यांवर रेखात्मक उत्कीर्णन केल्याचे दिसून आले आहे. आरेख्यक कलेचे बीज त्यात दिसते. सुमेरियन व सिंधू संस्कृतींत रेखांकित लंबवर्तुळाकार मुद्रा (सील) ओल्या मृत्तिकाखंडावर दाबून त्यांच्या प्रतिकृती तयार करीत असत. ही प्रक्रिया म्हणजे एक प्रकारची आरेख्यक हस्तकलाच होय. चीनमध्ये प्राचीन काळी (इ. स. पू. २०० ते इ. स. २२०) पाषाण-खंडाला विणलेले कापड गुंडाळून त्यावर रंगद्रव्याच्या घर्षणाने
मुद्रण केले जाई. कागदाचा शोध लागल्यानंतर काष्ठठशांच्या आधारे कागदावर आकृत्या, चित्रे व मजकूर यांचे मुद्रण करण्याची सुरुवातही चीनमध्ये झाली. कालांतराने त्यात सुधारणा होऊन नवव्या शतकाच्या उत्तरार्धात पक्वमृदा व लाकूड यांच्या ठशांनी मुद्रण करण्यास सुरुवात झाली. पुढे जर्मनी, इटली व नेदर्लंड्समधील अगदी सुरुवातीचे मुद्रण धार्मिक चित्रे व पत्ते यांपुरतेच मर्यादित होते. त्यांवरील रंगचित्रण हातानेच केले जाई. पुढे निकृंताच्या (स्टेंसिलच्या) साहाय्याने रंगचित्रणाच्या जागा निश्चित करण्यात येऊ लागल्या. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला फोटोमेकॅनिकल पद्धतीचा शोध लागला आणि पुढे शिलामुद्रणाचा (लिथोग्राफी) उदय होऊन आरेख्यक कलेचे हुबेहूब प्रतिकृती निर्माण करण्याचे मूळ उद्दिष्ट खऱ्या अर्थाने साध्य झाले. शिलामुद्रणाची जागा आता प्रतिरूप मुद्रण (ऑफसेट) पद्धतीने घेतली असली, तरी बरेचसे चित्रकार शिलामुद्रणच अधिक पसंत करतात कारण प्रतिकृतीत आपल्या मूळ कलाकृतीची वैशिष्ट्ये अबाधित ठेवण्यासाठी आणि कलाविषयक नवेनवे प्रयोग करण्यासाठी शिलामुद्रण त्यांना अधिक सोईस्कर वाटते.
आरेख्यक तंत्र : प्रतिकृती निर्माण करण्याची कला अत्यंत संमिश्र आहे.तीत अम्ल-उत्कीर्णन (इचिंग), उत्कीर्णन तसेच अक्षरमुद्रण (लेटरप्रिंटिंग), शिलामुद्रण, प्रतिरूप मुद्रण, रेशमी जाळी मुद्रण (सिल्क स्क्रीन प्रिंटिंग) इ. मुद्रणप्रकारांचा अंतर्भाव होतो. आरेख्यक कलेशी निगडित असे इतरही अनेक विषय आहेत. त्यांत अक्षरण (लेटरिंग), आखणी (लेआउट), सुनिदर्शन (इलस्ट्रेशन), छायाचित्रण, फोटो-उत्कीर्णन, पुस्तकबांधणी इ. विषयांचा समावेश होतो. काष्ठठशांवर उत्थिताकृती म्हणजे उठावाच्या आकृती (रिलीफ वर्क) कोरून प्रतिकृती निर्माण करण्याचे तंत्र प्राचीन काळापासून रूढ आहे. काष्ठठशांची सुरुवात चीनमध्ये इ. स. पू. १७५ च्या सुमारास झाली. त्यात हळूहळू सुधारणा होऊन साधारणतः नवव्या शतकाच्या अखेरीस काष्ठठशांची पद्धती प्रगतावस्थेला पोचल्याचे दिसते. आजही या तंत्राचा वापर केला जातो. काष्ठठशांच्या आधारे विविधरंगी मुद्रणही करता येते. काष्ठठशांप्रमाणेच शिसे, जस्त, तांबे, कासे इ. धातू आणि लिनोलियम, लॅमिनेटेड रबर, प्लॅस्टर ऑफ पॅरिस, प्लॅस्टिक यांवरही उत्थिताकृती आरेखून त्यापासून प्रतिकृती तयार करता येतात.
आरेख्यक कलांत छायाचित्रणाचा उपयोग महत्त्वाचा ठरतो : रंगीत मुद्रणासाठी काच अथवा सेल्युलॉइड फिल्मवर घेतलेले रंगीत छायाचित्र (कलर ट्रान्स्परन्सी) आवश्यक असते. अक्षरमुद्रणासाठी व प्रतिरूप मुद्रणासाठी लागणाऱ्या ऋण व धन प्रती तयार करण्यासाठी छायाचित्रणाचा सतत उपयोग करावा लागतो. छायाचित्रणाच्या अद्ययावत साधनांचा यासाठी आधार घेतला जातो. रेशमी जाळी मुद्रणात पातळ रेशमी कापडातील छिद्रांवाटे जाड कागद, कापड, पत्रा अथवा लाकूड अशा कोणत्याही माध्यमांच्या पृष्ठभागावर द्रवरंग गाळून मूळ चित्राच्या प्रतिकृती बनविल्या जातात. छायाचित्रण व रेशमी जाळी मुद्रण ही तंत्रे मोठ्या संख्येने लागणाऱ्या मुद्रणप्रतींसाठी वापरणे गैरसोयीचे व तोट्याचे ठरते. छायाचित्रण जास्तीत जास्त शंभर ते दोनशे प्रतींसाठी व रेशमी जाळी मुद्रण साधारणतः एक हजार प्रतींसाठी वापरणे फायदेशीर होते. तसेच या तंत्रासाठी निवडलेली मूळ चित्राकृती शक्यतो कमी तपशिलांनी व सपाट (फ्लॅट) रंगात ठेवणे योग्य असते.
अक्षरमुद्रण व शिलामुद्रण यांना आरेख्यक कलाक्षेत्रात अत्यंत महत्त्व आहे. अक्षरमुद्रणासाठी लागणारा जस्त किंवा तांबे यांवरील ठसा अम्ल-उत्कीर्णन पद्धतीने तयार केला जातो. ठसातंत्रज्ञ चित्राकृतीतील विशेष तपशील पारखून घेतो. तीन मूलरंग (पिवळा, तांबडा व निळा) आणि चित्राकृतीतील छायाभाग उठावदार करण्यासाठी काळा रंग अशा एकूण चार रंगांत मुद्रणठसे बनविण्यात येतात. त्यांपासून सात ते आठ मिश्र रंगांच्या छटा मिळू शकतात. दहा हजारांहून अधिक प्रती हव्या असतील, तर तांब्याचे ठसे करणे इष्ट ठरते कारण जस्तापेक्षा तांबे अधिक कठीण व टिकाऊ असते. अक्षरमुद्रणात शिशाच्या तयार टंकांचा उपयोग केला जातो. अक्षरांचे कलात्मक टंक तयार करणे, हे आरेख्यक कलेचे अविभाज्य अंग आहे. प्रतिरूप मुद्रणासाठी जस्ताच्या पातळ पत्र्यावर चित्रमुद्रा आरेखित केली जाते. प्रतींची संख्या कमी असेल, तर पुष्कळदा ॲल्युमिनियमचा पत्रादेखील वापरतात. छायाचित्रणाच्या साहाय्याने मूळ चित्राकृतीचे प्रतिबिंब उमटविण्यासाठी हे पत्रे विशिष्ट तऱ्हेने घासून (ग्रेनिंग) घेतले जातात. प्रतिरूप मुद्रणाचा वेग अक्षरमुद्रणापेक्षा जवळजवळ दुप्पट असतो. एकाच वेळी दोन, चार किंवा सहा रंग छापणारी प्रतिरूप मुद्रणयंत्रे मिळू शकतात. आंतरपृष्ठ मुद्रण (ग्रॅव्हूर) म्हणजे तांब्याच्या कोरीव रूळाच्या साह्याने केलेले मुद्रण ही आणखी एक पद्धती आहे परंतु ही पद्धती फार गुंतागुंतीची आहे.
काटकसरीच्या दृष्टीने पाहता दोनशे प्रतींपर्यंत छायाचित्रकला, हजार प्रतींपर्यंत रेशमी जाळी मुद्रण, दहा हजार प्रतींपर्यंत अक्षरमुद्रण, पाच ते सात लाखांपर्यंत प्रतिरूप मुद्रण आणि त्यापुढे आंतरपृष्ठ मुद्रण हा स्वीकारण्यायोग्य हिशेब ठरतो. यांपैकी प्रतिरूप मुद्रणक्षेत्रात प्रचंड संख्येने लागणाऱ्या प्रती मुद्रित करण्यासाठी अतिजलद गतीची व एकाच वेळी दोन ते सहा रंगांचे दोन्ही बाजूंनी मुद्रण करणारी यंत्रे उपलब्ध झाल्यामुळे अलीकडे प्रतिरूप मुद्रण हे माध्यम अतिशय प्रभावी ठरले आहे.
आरेख्यक कलांचे लक्ष्य मुद्रित नमुना तयार करणे हेच असले, तरी तो नमुना दर्जेदार व निर्दोष करण्यासाठी सर्व प्राथमिक तांत्रिक प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडाव्या लागतात. अक्षरमुद्रण, प्रतिरूप मुद्रण आणि तांब्याच्या रूळावरील आंतरपृष्ठ छपाई यांतील विशेष कौशल्यपूर्ण भाग म्हणजे छायाचित्रकलेच्या साहाय्याने होणारा कोरीव ठसा आणि प्रतिरूप मुद्रणाची मुद्रा. थोडक्यात, आरेख्यक कलांचा केंद्रबिंदू छायाचित्रकला व तदानुषंगिक तांत्रिक कृती होय. सामान्यतः कॅमेऱ्याची कळ दाबून मिळू शकणारी छायाचित्रे आणि मुद्रणार्थ केलेल्या छायाचित्राकृती (फोटो-प्रिंट्स) यांत महदंतर असते. सर्व प्रकारच्या पद्धतींचा कौशल्यबिंदू असलेली तांत्रिक छायाचित्राकृती, तिच्यासाठी लागणारे सुसज्ज कॅमेऱ्यादी साहित्य, क्लीशोग्राफ (स्वयंचलित रंगविभाजन आणि ठसे बनविणारे तांत्रिक साधन), स्वयंचलित प्रतिबिंबवर्धक (एन्लार्जर), रंगशोधक आणि रंगसुधार भिंगे (कलरकरेक्टिंग फिल्टर्स), रंगीत चित्रांच्या काचेपासून कोरीव ठसा बनविणारे यंत्र इ. साधने आता तंत्रज्ञांच्या सेवेस सिद्ध आहेत. मुद्रण क्षेत्रातील छायाचित्राकृतीचे वाढते महत्त्व, विशेषतः आवश्यकता, लक्षात घेऊन त्यांच्या उत्पादकांनी आपापल्या व्यापारी संस्थांतून तद्विषयक साहित्य-विक्री विभाग उघडून तांत्रिक सल्ला देण्याचे उपक्रम सुरू केले आहेत. त्यांद्वारा नवोदित तसेच अनुभवी कलावंतांनाही आरेख्यक कलांबाबतची अद्ययावत माहिती व सूचना मिळू शकतात.
पहा : अक्षरण आखणी पुस्तक बांधणी मुद्रण सुनिदर्शन सुलेखन.
संदर्भ : 1. Adhemar, Jean Trans. Martin, M. I. Graphic Art of the 18th Century, London, 1964.
2. Bodor, John J. Rubbings and Textures: A Graphic Technique, New York, 1968.
3. Kauffmann, Desire, Graphic Arts Crafts, New York. 1948.
4. Longstreet, Stephen, ATreasury of the World’s Great Prints, New York, 1961.
5. Stevenson, George A. Graphic Arts Encyclopedia, New York, 1968.
देवकुळे, ज. ग.
“