इंडोनेशियन भाषासमूह : इंडोनेशियन भाषासमूह हा मलायो-पॉलिनीशियन भाषा-कुटुंबात मोडतो. या कुटुंबाच्या भाषा बहुतांश ईस्टर बेट या पॅसिफिक बेटापासून थेट मादागास्करपर्यंत पसरलेल्या आहेत. त्यांत दोन शाखा आहेत: इंडोनेशियन व पॉलिनीशियन.
इंडोनेशियन भाषा : इंडोनेशियाच्या मध्यवर्ती प्रदेशातील भाषा पुरातन असून किनाऱ्यालगतच्या भाषा अधिक उत्क्रांत झालेल्या आहेत. त्यांचे ऐतिहासिक वर्गीकरण अद्याप झालेले नाही.
फॉर्मोसा : प्राचीन जमाती इंडोनेशियन भाषा बोलतात त्यांची नावे: तायाल, साइसात, शैजिक, चोऊ, बुनुम, आमिश, तारिसेन, पुयुमा, पाइवान, निइताका, साऊ, रूकाई.
कोतोशो बेट : उत्तर फिलिपीन्सच्या भाषेशी संबंधित थुमी भाषा.
फिलिपीन्स : उत्तरेला बातान बेटात कृष्णवर्णीयांकडून बोलली जाणारी एक भाषा.
बाबूयान बेटे व लूझॉनचा पश्चिम भाग : इलोको भाषा.
लूझॉनचा मध्यभाग : कासिगुरान, आपायाओ, कालिङा, इफुगाओ, इगोरोत, इबानाग, तिंग्विआन, बोंदोच, गाद्दाङ, इसिनाई, इलाङोत, पापाङान, पाङासिनान इ. भाषा.
लूझॉनची किनारपट्टी : वायव्येला इलोको पश्चिमेला सांबाली दक्षिण, पूर्व, मिंदोरी व मारिंदूके बेटे, पानाय बेटाचा किनारा या ठिकाणी तागाल भाषा मोरो मुस्लिमांची सुलू अतिदक्षिणेकडे बिकोल भिंदोराच्या मध्य भागात बुआँइद, हानुनाआँओ, रातान्योन, पुला, बालाङान, बाङोन भाषा.
पालावानचा मध्यभाग : तागबानुआ भाषा.
तानाय, नेग्रोस इ. बेटे : बिसाया गटाच्या भाषा.
मिंदानाओ बेटाचा मध्यभाग : मानोबो, बुकिदनोन, लानाओ, सुबानोन, मागिंदानाओ बिलाआन, तिरूराय, तागाका-ओलो, कुलामान, मांदाया, आता, मांगुआनगान बागोबो किनाऱ्यालगत याकान व सुलू बेटातील सुलू आमाल या भाषा.
बोर्निओचा मध्यभाग : दायाक व तिच्या बोली. त्यांतील वासासांयान ही एक धार्मिक बोली आहे.
सेलेबीझ : येथील सूलावेसी या भाषा अनेक प्रकारच्या आहेत आणि त्या फिलिपीन्सच्या भाषांशी संबंधित आहेत. उत्तरेकडच्या व साङिर बेटातील बोलींना मिनाशसा हे नाव आहे. दक्षिणेकडे गोरोंतलो, तोमिनी व तोराजा हे गट. पूर्वेला लोइनाङ गट. आग्नेयीकडे बुंतू. नैर्ऋत्येकडे माकासार व बुगी.
हॅल्माहेराच्या दक्षिणेकडील व न्यू गिनीच्या अतिपश्चिम किनाऱ्यावरील भाषांचा एक गट आहे.
उत्तरेकडे सेराङ व पूर्वेकडे आरूपासून तिमोरच्या पश्चिमेपर्यंत एक गट पसरलेला आहे. याशिवाय इतर काही गट आहेत. पालीच्या भाषेत बोलणारा, ऐकणारा व संभाषणविषय व्यक्ती यांना अनुसरून भाषा बदलते.
जावा : जावानीज भाषा सुमात्रात व वालेबांग राज्यातही वापरली जाते. तिच्यात सामाजिक भेदांनुसार फरक आहे.
सुमात्रा : येथील बोली अतिशय गुंतागुंतीच्या आहेत. बाताक बोलींचे दोन गट आहेत. ताबो-बाताक व दाइरी. अंत्यसंस्कारांत बाताक लोक एक विशिष्ट बोली वापरतात. लुक ही बातकशी संबंधित भाषा आहे. मेनांगकाबौ रंजाङ, लांपाँग येथील भाषा किनारपट्टीच्या मलायन भाषेहून भिन्न आहेत.
मलायन भाषा जवळजवळ सर्व इंडोनेशियन बेटांच्या किनारपट्टीची भाषा आहे. ती खलाशी व व्यापारी यांची भाषा असून सर्व आग्नेय आशियात बोलली जाते.
मलाया द्वीपकल्पाच्या अंतर्भागात तीन भाषिक गट आहेत : जाकुन, साकाई (सेनोई) व समाङ (पाङम).
इंडोचायनाच्या दक्षिणेला असलेले चाम लोक तसेच इतर काही जमाती इंडोनेशियन भाषा बोलतात.
इंडोनेशियन समूहाची अगदी पश्चिम टोकाची भाषा मादागास्करमध्ये बोलली जाते. तिच्या अनेक बोली आहेत. त्यातील मरीना ही प्रमाणभूत मानली जाते.
या भाषा बोलणारे लोक विविध वंशांचे आहेत. त्यांत तीन प्रकारचे सांस्कृतिक गट आढळतात : (१) फळे व फुले गोळा करून व शिकार करून राहणारे नेग्रीटो (२) अंतर्भागातील कृषिप्रधान लोक (३) दर्यावर्दी लोक. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात चाम लोकांनी हिंदू संस्कृती स्वीकारली. जावाचे हिंदवीकरण त्यापूर्वी दोनशे वर्षे झाले. बालीमधील लक्षावधी शैव लोकांत परंपरागत हिंदू संस्कार अजूनही टिकून आहेत.
सुमात्राच्या उत्तरेला १२७२ मध्ये आणि दक्षिण जावात १४१९ मध्ये इस्लामीकरण सुरू झाले. कोट्यवधी इंडोनेशियन भाषिक मुसलमान आहेत. इंडोनेशियनचे सर्वांत जुने लेखन दक्षिण भारतीय लेखनाला जवळचे आहे. पण प्रदेशभेदांनुसार त्यात अनेक फरक आहेत.
साहित्य : मालागाश, बाताक, दायाक इत्यादींचे लोकसाहित्य यूरोपियन अभ्यासकांनी संकलित केले. पण मलायन व जावानीज भाषांतील धार्मिक व सांस्कृतिक साहित्याकडे लक्ष गेल्यामुळे त्यांचे लोकसाहित्य दुर्लक्षित राहिले. बहुतांश साहित्य परकीयांच्या प्रेरणेतून आलेले आहे. तेराव्या ते पधराव्या शतकांतील जावानीज साहित्यावर रामायण–महाभारताची दाट छाया आहे. ते वृत्तबद्ध आहे. पांनजी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कथा प्रादेशिक स्वरूपाच्या आहेत. अलेक्झांडरच्या कथाही प्रचलित आहेत. जावात काव्यलेखनाची, तर मलायात गद्यलेखनाची परंपरा विशेष समृद्ध आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या प्रदेशातील साहित्य नव्याने फोफावू लागले आहे.
भाषिक वैशिष्ट्ये-ध्वनिपद्धती (फक्त तागालची) :
स्वर : इ, ए, आ.
व्यंजने : क, ग, ङ, त, क्ष, प, ब, म, र, ल, स, ह.
| मालागाश | मलायन | जावानीज | तागाल | |
| (१) | इसा | सा | सा | इसा | 
| (२) | रूआ | दुआ | रू | दालावा | 
| (३) | तेलु | तिगा | तेलु | तातलो | 
| (४) | एफात्रा | आम्पात | पात | आपात | 
| (५) | लिमी | लिमा | लिमा | लिमा | 
| (६) | एनिना | आनाम | नेम | आनिम | 
| नेनेम | ||||
| (७) | फितु | तुजुह | पितु | पितो | 
| (८) | वालु | दुलापन | वोलु | वालो | 
| (९) | सिवि | साम्बिलान | सोनो | सियाम | 
| (१०) | फुलु | पुलुह | पुलुह | पालो | 
संदर्भ : Meillet, Antoine Cohen, Marcel, Les Langues du Monde, Paris, 1954.
कालेलकर, ना. गो.
“
