इंडो-अँग्‍लिअन साहित्य : भारतीयांनी इंग्रजीत लिहिलेल्या साहित्यास ‘इंडो-अँग्‍लिअन साहित्य’ असे संबोधिले जाते. ब्रिटिश राज्यकर्त्यांबरोबर त्यांची इंग्रजी भाषाही भारतात आली आणि एकोणिसाव्या शतकाच्या प्रथमार्धात लॉर्ड मेकॉले याची इंग्रजी माध्यमातून आधुनिक शिक्षण देण्याची योजना सरकारतर्फे स्वीकारली गेली. ब्रिटिशांच्या भारतातील राज्यशासनाचा गाडा ओढण्यासाठी इंग्रजी जाणणारा सनदी नोकरवर्ग तयार करणे, हा येथील जनतेला इंग्रजी शिक्षण देण्यामागील एक महत्त्वाचा हेतू असला, तरी या शिक्षणाने भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि वाङ्‌मयीन परंपरांवर लक्षणीय स्वरूपाचा परिणाम घडवून आणला आणि भारतीय प्रबोधनाचा पाया घातला. इंग्रजी भाषेच्या द्वारा यूरोपीय साहित्य-संस्कृतीचे भारतीयांना दर्शन घडले. तत्कालीन समाजात देशी भाषांतील साहित्यपरंपरांच्या अज्ञानामुळे किंवा त्यांविषयीच्या न्यूनगंडामूळे स्वाभाविकपणेच इंग्रजी भाषेला आदराचे आणि प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले. आंग्‍लविद्याविभूषित नव-शिक्षितांपैकी अनेकांनी वाङ्‌मयीन आविष्कारासाठी इंग्रजी भाषेचा स्वीकार केला. पुढे राष्ट्रवादाची जाणीव प्रखर झाल्यानंतरही आपले विचार इंग्रज राज्यकर्त्यांना समजावेत व भारतातील अन्य भाषिकांपर्यंतही ते पोहचावेत, या भूमिकेतून मातृभाषेबरोबच इंग्रजीतून लेखन करण्याची प्रवृत्ती भारतीय विचारवंतातंत दिसू लागली. बाळशास्त्री जांभेकरांचे दर्पण  हे वृत्तपत्र इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांतून निघे. केसरीच्या चालकांना मराठा  या इंग्रजी वृत्तपत्राचीही आवश्यकता भासली, तसेच महादेव मोरेश्वर कुंटे ह्यांच्या राजा शिवाजी (६ भाग, १८६९, १८७२) या मराठी काव्याची प्रस्तावनाही इंग्रजीत लिहिली गेली, या घटना या संदर्भात अर्थपूर्ण ठरतात. या किंवा अशा प्रकारच्या प्रेरणांनीच ललित व ललितेतर इंडो-अँग्‍लिअन साहित्य-निर्मितीला चालना मिळाली म्हणजे त्याची व्याप्ती वर्तमानपत्रीय लेखन किंवा वैचारिक निबंध, भाषणे यांच्यापुरतीच मर्यादित न राहता ती सर्जनशील लेखनाच्या क्षेत्रापर्यंत जाऊन भिडली. परिणामतः आज भारतात भारतीय भाषांतील साहित्याबरोबरच ललित आणि ललितेतर अशा इंडो-अँग्‍लिअन साहित्याचा एक प्रवाह ठळकपणे दिसून येत आहे. प्रस्तुत लेखात या प्रवाहाचे स्थूल स्वरूप स्पष्ट केले आहे.

काव्य : हेन्‍री डेरोझिओ (१८०९–१८३१) हे पहिले इंडो-अँग्‍लिअन कवी. त्यांचे वडील पोर्तुगीज व आई भारतीय असल्यामुळे अँग्‍लो-इंडियन कवी म्हणूनही त्यांचा निर्देश केला जातो. द फकीर ऑफ जंजिरा  ही त्यांची विशेष उल्लेखनीय कविता. ⇨ तोरू दत्त (१८५६–१८७७) आणि अरू दत्त या दोन बहिणींनीही इंग्रजीत कविता लिहिल्या. अ शीफ ग्‍लीन्ड इन फ्रेंच फील्ड्समध्ये (१८७६) काही भावकवितांचे तोरू दत्तने केलेले इंग्रजी अनुवाद संगृहीत करण्यात आले आहेत. या पुस्तकातील काही अनुवाद अरू दत्तने केलेले असून ते सर एडमंड गॉस याच्यासारख्या ब्रिटिश साहित्यसमीक्षकाच्या प्रशंसेस पात्र ठरले. तोरूने या अनुवादांबरोबरच स्वतंत्र कविता लिहिल्या. एन्शंट बॅलड्स अँड लीजंड्स ऑफ हिंदुस्थान (१८८२) या नावाने त्या तिच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाल्या. भारतीय आख्यायिकांना तिने मोहक काव्यरूप दिले आहे. श्रेष्ठ सर्जनशील प्रतिभेच्या खुणा तिच्या काव्यात स्पष्टपणे आणि विशेषत्वाने जाणवतात. अकाली निधनामुळे हेन्‍री डेरोझिओ आणि दत्त भगिनी यांच्या काव्यकर्तृत्वाला फारसा अवसर मिळाला नाही. रमेशचंद्र दत्त यांनी रामायण  व महाभारत  या महाकाव्यांचे उत्कृष्ट इंग्रजी पद्यानुवाद केले. मायकेल मधुसुदन दत्त, शशीचंद्र दत्त, गिरीशचंद्र दत्त, बेहरामजी मलबारी या कवींनी मिल्टन आणि बायरन यांसारख्या श्रेष्ठ इंग्रज कवींचे आदर्श पुढे ठेवून काही काव्यरचना केली.

यांच्यानंतर कवितेच्या क्षेत्रात ⇨ रवींद्रनाथ टागोर (१८६१–१९४१) आणि योगी ⇨ अरविंद घोष (१८७२–१९५०) यांची नावे येतात. रवींद्रांनी आपल्या मूळ बंगालीत लिहिलेल्या गीतांजलीचा (१९१०) इंग्रजी अनुवाद केला. या अनुवादामुळेच गीतांजलीला आंतरराष्ट्रीय वाचकवर्ग प्राप्त झाला. साहित्याचे नोबेल पारितोषिकही त्यांना मिळाले (१९१३). अरविंद घोष यांच्या काव्यात हिंदू जीवनाची संकल्पना आविष्कृत झालेली आहे. या संकल्पनेवर त्यांचे आध्यात्मिक अनुभव आणि आत्मसाक्षात्कार यांतून निर्माण झालेल्या गूढ अंतर्दृष्टीचा प्रभाव पडलेला आहे. द रोज ऑफ गॉड व थॉट द पॅराक्‍लिट  या त्यांच्या गूढवादी कविता विशेष उल्लेखनीय होत. १९५०-१९५१ मध्ये अरविंदांचे सावित्री ए लीजंड अँड ए सिंबॉल हे मुक्तच्छंदात लिहिलेले महाकाव्य प्रसिद्ध झाले. सत्यवान-सावित्रीची जुनी कथाच अरविंदांनी आपल्या गूढस्पर्शी प्रतिभेने रंगविलेली आहे. अरविंदांचे बंधू मनमोहन घोष (१८६९–१९२४) यांचे लव्ह साँग्ज अँड एलिजीज (१८९८), साँग्ज ऑफ लव्ह अँड डेथ (१९२६) हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या कवितांची प्रशंसा ऑस्कर वाईल्डसारख्या नामवंत ब्रिटिश साहित्यिकानेही केली होती.

‘नाइटिंगेल ऑफ इंडिया’ या गौरवपर नावाने प्रसिद्ध असलेल्या ⇨ सरोजिनी नायडूंनी (१८७९–१९४९) इंडो-अँग्‍लिअन काव्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. द गोल्डन थ्रेशोल्ड (१९०५) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह विशेष रसिकप्रिय ठरला. द बर्ड ऑफ टाइम (१९१२) आणि ब्रोकन विंग (१९१७) हे त्यांचे नंतरचे काव्यसंग्रह. भारतीय प्रतिमासृष्टीतूनच त्यांच्या कवितेतील भारतीय मन उलगडत जाते. त्यांची लोकगीते, भावकविता आणि वसंतगीते यांतून तालसौंदर्यांचा एक आगळात प्रत्यय येतो. जीवन आणि मृत्यू या विषयांवरील त्यांच्या कवितांमधून त्यांची जीवनावरील उत्कट श्रद्धा व्यक्त होते. अनेक ठिकाणी त्यांच्या कवितेची भाषा विलक्षण चित्रमय रूप घेताना दिसते.

हरींद्रनाथ चटोपाध्याय यांचे काव्य आध्यात्मिकतेकडे झुकलेले दिसते. योगी अरविंदांपासून स्फूर्ती घेऊन आध्यात्मिक स्वरूपाची काव्यरचना करणाऱ्या कवींत नीरद बरन (सब्ब्‍लॉसम्स, १९४७), दिलीपकुमार रॉय (आइज ऑफ लाइट, १९४८), के. डी. सेठना (द ॲडव्हेंचर ऑफ द ॲपोकॅलिप्स, १९४९) यांचा समावेश होतो. निशिकांतो, पुंजलाल, पृथ्वींद्र, नलिनीकांत गुप्त हे कवीही याच परंपरेत मोडतात.

हुमायून कबीर, उमा महेश्वर, पी. शेषाद्री, जोसेफ फुर्टाडो, आरमांडो मेनेंझिस, शहीद सुर्‍हावर्दी, मंजरी एस. ईश्वरन्, पी. आर्. कैकिणी, कृष्ण शुंगलू, सुभो टागोर, नीलिमा देवी इ. कवींनीही इंडो-अँग्‍लिअन काव्यास हातभार लावला आहे. शहीद सुर्‍हावर्दी, मंजरी एस. ईश्वरन्, आणि पी. आर्. कैकिणी यांच्या काव्यातून बंडखोरीची प्रवृत्ती व्यक्त झालेली आहे.

डॉम मोरायस, निसीम इझिकेल, पी. लाल, कमला दास, ए. के. रामानुजन् यांच्या कवितेत विवध छंदांचा आणि मुक्तच्छंदाचाही कौशल्यपूर्ण वापर दिसून येतो.

स्वतंत्र इंग्रजी काव्यलेखनाबरोबरच भारतीय भाषांतील वेचक काव्यरचनेचा इंग्रजी अनुवाद करण्याची प्रवृत्तीही जाणवते. व्ही. जी. प्रधान यांनी केलेलाज्ञानेश्वरीचा अनुवाद (२ खंड, १९६७, १९६९) आणि दिलीप चित्रे यांनी केलेले आधुनिक मराठी कवितांचे अनुवाद (अँथॉलॉजी ऑफ मॉडर्न मराठी पोएट्री,१९६७) हे या दृष्टीने लक्षणीय आहेत.

कथात्मक साहित्य : राजमोहन्स वाइफ (१८६४) ही इंडो-अँग्‍लिअन साहित्यातील पहिली कादंबरी. या व राजलक्ष्मी देवी यांची द हिंदू वाइफ ऑर द एंचांटेड फ्रूट (१८७६), राम कृष्ण पिल्लई यांची पद्‌मिनी (१९०३) यांसारख्या आरंभीच्या कांदबर्‍यांतून उच्चवर्णीय हिंदूंच्या जीवनाचे चित्रण आढळते. एस्. एन्. मित्रा यांचीहिंदुपूर, ए पीप बिहाइंड द इंडियन अन्‌‌रेस्ट (१९०९) ही पहिली इंडो-अँग्‍लिअन राजकीय कादंबरी. महात्मा गांधींच्या स्वातंत्र्यचळवळीमुळे इंडो-अँग्‍लिअन कादंबरीला नवी प्रेरणा मिळाली. के. एस्. वेंकटरमणी यांच्या मुरुगन द टिलर (१९२७), व कंदन द पेट्रिअट (१९३२) आणि राजा राव यांची कंठपूर (१९३८) ह्या कादंबऱ्या ह्या दृष्टीने पाहण्यासारख्या आहेत. लव्ह ऑफ डस्ट (१९३८) या कादंबरीत शंकरराम यांनी शेतकऱ्याला जमिनीबद्दल वाटणाऱ्या प्रेमाचे हृदयस्पर्शी चित्रण केले आहे. चिल्ड्रन ऑफ द कावेरी (१९२७) आणि क्रीचर्स ऑल (१९३१) असे त्यांचे दोन कथासंग्रहही आहेत.

अन्‌‌टचेबल (१९३५), कूली (१९३६) आणि टू लीव्ह्‌ज अँड अ बड (१९३७) या दलित जीवनाचे चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या ‌‌‌‌‌⇨ मुल्क राज आनंद (१९०५–    ) यांनी लिहिल्या. त्यानंतर अनेक कादंबऱ्या लिहून त्यांनी इंडो-अँग्‍लिअन कादंबरीला आंतरराष्ट्रीय वाचकवर्ग मिळवून दिला. सेव्हन समर्स (१९५१) आणि मॉर्निंग फेस (१९६८) ह्या त्यांच्या आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या. कादंबर्‍यांबरोबर त्यांनी कथाही लिहिल्या आहेत. त्या कथांचे पाच संग्रह निघाले आहेत. आर्. के. नारायण (१९०६–    ) हेही एक विख्यात इंडो-अँग्‍लिअन कादंबरीकार, बॅचलर ऑफ आर्ट्‌‌‌‌‌‌‌स‍‌ (१९३७), द डार्क रूम (१९३८), द इंग्‍लिश टीचर ( १९४५), वेटींग फॉर द महात्मा (१९५५), द गाइड (१९५८), द मॅनइटर ऑफ मालगुडी (१९६२), द स्वीट व्हेंडर (१९६७) या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या. दक्षिण भारतीय उच्च वर्गीयांच्या विसंगतींवर त्यांच्या कादंबर्‍यांतून मार्मिकपणे बोट ठेवलेले आढळते. गांधीवादी क्रांतीबद्दलच्या प्रतिक्रिया वेटिंग फॉर द महात्मामध्ये दिसतात. त्यांच्या काही कादंबर्‍यांची कथानके ‘मालगुडी’ या एका काल्पनिक गावाभोवती गुंफलेली आहेत. त्यांच्या आकर्षक शैलीने त्यांनी त्या काल्पनिक गावात वस्तुस्थितीचा जिवंतपणा आणला आहे. दिलीपकुमार रॉय यांच्या कवितेप्रमाणेच त्यांच्या कादंबरीतही आध्यात्मिकता आलेली आहे (द अपवर्ड स्पायरल, १९४९). भारतीय पार्श्वभूमीवर दर्जेदार कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखिका म्हणून कमला मार्कंडेय यांनी आपले वैशिष्ट्येपूर्ण स्थान निर्माण केले आहे. नेक्टर इन अ सिव्ह (१९५४), सम इनर फ्यूरी (१९५६), हँडफुल ऑफ राइस (१९६६) या त्यांच्या कादंबर्‍यांत भारतीय जीवनपद्धतीचे उत्कट चित्रण आहे. यांशिवाय भवानी भट्टाचार्य (सो मेनी हंगर्स, १९४८,ही टू राइड्स अ टायगर, १९५४), खुशवंत सिंग (ट्रेन टू पाकिस्तान, १९५६), वेणू चितळे (इन ट्रांझिट, १९५१), भारती साराभाई (टू विमेन, १९५२), मेनन एस्. मारथ (द सेल ऑफ ॲन आयलंड, १९६८), के. नागराजन् (अथावर हाऊस), आर्. प्रवेर झाबवाला (टू हूम शी विल), अनिता देसाई (व्हॉइसिस इन द सिटी, १९६५), अरूण जोशी (द फॉरिनर, १९६७) हे कादंबरीकारही इंडो-अँग्‍लिअन कादंबरीच्या संदर्भात उल्लेखनीय आहेत. अनिता देसाई आणि अरुण जोशी यांनी व्यक्तीचे एकाकीपण आणि भ्रमनिरास हे विषय हातळले. आहेत. ⇨ मनोहर माळगावकर (१९१५–    ) यांच्या भारतीय संस्थानाच्या वातावरणावर आधारलेल्याप्रिन्सेस (१९६३) या कादंबरीला आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त झाली आहे. माळगावकरांनी कथालेखनही केले आहे. के. ए. अब्बास (१९१४–    ) यांच्या कथांचे राइस अँड अदर स्टोरीज (१९४३), इन्किलाब (१९५४) यांसारखे कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.

नाटक : इंडो-अँग्‍लिअन साहित्यात नाटककारांचे प्रमाण बरेच कमी आढळते. रवींद्रनाथांनी आपल्या काही बंगाली नाटकांचे इंग्रजी अनुवाद केले. तथापि द चाइल्ड (१९३१) हे नाटक त्यांनी मुळातच इंग्रजीत लिहिले. या नाटकात इब्सेनच्या नाट्यतंत्राचा अवलंब केलेला दिसतो. अरविंद घोष यांनी पर्सियस द डिलिव्हरर (१९५५) हे एक निर्यमक छंदातील पद्य-नाटक लिहिले. तथापि हे नाटक प्रयोगक्षम मात्र नाही. व्ही. व्ही. श्रीनिवास अयंगार (ड्रॅमॅटिक डायव्हर्जिमेंट्स), फैझी रहमीन (डॉक्टर ऑफ इंद), पुरुषोत्तमदास त्रिकमदास (सॉस फॉर द गूज), मृणालिनी साराभाई (कॅप्टिव्ह सॉइल) हे काही इंडो-अँग्‍लिअन नाटककार होत. इंडो-अँग्‍लिअन नाटककारांना फारसे यश प्राप्त झाले आहे, असे वाटत नाही. शांताराम राव यांचे ए पॅसेज टू इंडिया (१९६०), निसीम इझिकेल यांचे थ्री प्‍लेज (१९७०) आणि प्रताप शर्मा यांचे ए टच ऑफ ब्राइटनेस (१९६८) यांसारख्या काही नाटकांनी इंडो-अँग्‍लिअन नाटकांबद्दल आशा निर्माण केली आहे.

चरित्रे व आत्मचरित्रे : भारतातील नामवंत व्यक्तींची चरित्रे व आत्मचरित्रे इंडो-अँग्‍लिअन साहित्यात आहेत. त्यांत राजकीय व्यक्तींच्या चरित्रांचे व आत्मचरित्रांचे प्रमाण मोठे आहे. सर रूस्तुम मसानी (दादाभाई नौरोजी, १९३९), सर होमी मोदी (फिरोजशाह मेहता, १९२१), पद्‌मिनी सेनगुप्ता (सरोजिनी नायडू, १९६६), नरहरी पारीख (सरदार वल्लभभाई पटेल, २ खंड, १९५३, १९५६), हेमेंद्रनाथ दासगुप्ता (चित्तरंजन दास, १९६०), डी. बी. माथुर (गोपाळ कृष्ण गोखले, १९६६), धनंजय कीर (डॉ. आंबेडकर, लाइफ अँड मिशन, १९५४ लोकमान्य टिळक, १९५९ महात्मा फुले, १९६६ वीर सावरकर, १९६६), टी. जे. एस्. जॉर्ज (कृष्ण मेनन, १९६४), के. ए. अब्बास (इंदिरा गांधीरिटर्न ऑफ द रेड रोझ, १९६६), एस्. के. बोस (सुरेंद्रनाथ बॅनर्जी, १९६८) ही काही उल्लेखनीय चरित्रे. डी. जी. तेंडुलकर यांनी लिहिलेले महात्मा (१९५१–१९५४) हे महात्मा गांधींचे अष्ट-खंडात्मक चरित्र विशेष उल्लेखनीय आहे. महात्मा गांधींच्या जीवनातील बारीकसारीक तपशील मोठ्या परिश्रमाने गोळा करून तेंडुलकरांनी त्यांचे जीवन अतिशय सुंदर शैलीत समग्रपणे मांडले आहे. प्यारेलाल यांनी लिहिलेला लास्ट फेज (१९५६, १९५८) हा द्विखंडात्मक गांधीचरित्रपर ग्रंथही महत्त्वपूर्ण आहे.

आत्मचरित्रलेखनात पंडित जवाहरलाल नेहरूंची ऑटोबायग्राफी (१९३६) आणि महात्माजींच्या आत्मकथेचा द स्टोरी ऑफ माय एक्स्परिमेंटस विथ ट्रूथ हा महादेवभाई देसाई यांनी केलेला अनुवाद (१९२७) जागतिक आत्मचरित्रवाङ्‌मयातही मान्यता पावला आहे. यांशिवाय निरद सी. चौधरी (द ऑटोबायग्राफी ऑफ ॲन अन्‌नोन इंडियन, १९५१), प्रकाश टंडन (पंजाबी सेंच्युरी, १९६१), के. पी. एस्. मेनन (मेनी वर्ल्ड्‌स, १९६५), मौलाना अबुल कलाम आझाद (इंडिया विन्स फ्रीडम, १९५९) यांसारखी आत्मचरित्रे लिहिली गेली आहेत.

समीक्षा : काही भारतीयांनी इंग्रजीत समीक्षात्मक लेखनही केले आहे. द फ्यूचर पोएट्री (१९५३) या आपल्या प्रबंधात अरविंद घोष यांनी भविष्यकालीन काव्याच्या व्यापकतेचे चित्र रेखाटले आहे. टागोरांनी चित्र-शिल्पादी ललित कलांच्या संदर्भात साहित्याचा विचार केला आहे. कन्स्ट्रक्शन व्हर्सस क्रिएशन आणिक्रिएशन आणि क्रिएटिव्ह आयडिअल हे त्यांचे निबंध त्या दृष्टीने वाचनीय आहेत. शेक्सपिअर-समीक्षेच्या बाबतीत अमरनाथ झा, अमिय चक्रवर्ती आणि सी. नारायण मेनन यांची नावे उल्लेखनीय आहेत. ⇨ आनंद कुमारस्वामी (१८७७–१९४७) यांचे इंट्रोडक्शन टू आर्ट (१९२३), हिस्टरी ऑफ इंडियन अँड इंडोनेशियन आर्ट (१९२७) आणि द डान्स ऑफ शिव (१९४८) हे कलासमीक्षात्मक ग्रंथ त्यांच्या स्वतंत्र प्रज्ञेचा आणि प्रगाढ व्यासंगाचा प्रत्यय आणून देतात. अलीकडच्या काळात बा. सी. मर्ढेकर यांनी आर्ट्‌‌‌‌‌‌‌स‍‌ अँड मॅन (१९६०) या पुस्तकात आपल्या कलासाहित्या-विषयक विचारांचे प्रतिपादन केले आहे. मुल्क राज आनंद ह्यांचे हिंदू व्ह्यू ऑफ आर्ट (१९३३) हे पुस्तकही उल्लेखनीय आहे.

संकीर्ण : याशिवाय इतिहास, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षण इ. विविध विषयांसंबंधी भारतीयांनी इंग्रजीत लेखन केले आहे. न्यायमूर्ती रानडे (राइज ऑफ द मराठा पॉवर, १९००), रमेशचंद्र दत्त (ए हिस्टरी ऑफ सिव्हिलिझेशन इन एन्शंट इंडिया, १८९० इकॉनॉमिक हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया,१९०२), लोकमान्य टिळक (ओरायन, १८९३), सर जदुनाथ सरकार (शिवाजी, १९१९), पंडित जवाहरलाल नेहरू (डिस्कव्हरी ऑफ इंडिया, १९४५) ग्‍लिंप्सेस ऑफ द वर्ल्ड हिस्टरी, २ खंड, १९३४, १९३५), अरविंद घोष (एसेज ऑन द गीता, १९४९ द आयडिअल ऑफ ह्यूमन युनिटी, १९४९ द सिंथेसिस ऑफ योग, १९५५), रवींद्रनाथ टागोर (रिलिजन ऑफ मॅन, १९३१ पर्सनॅलिटी, १९४८), एस्. राधाकृष्णन् (ॲन आयडिआलिस्ट व्ह्यू ऑफ लाइफ १९३२ हिंदू व्ह्यू ऑफ लाइफ, १९२७ द कन्सेप्ट ऑफ मॅन, १९६० रिलिजन अँड सोसायटी, १९४७ इ.), मानवेंद्रनाथ रॉय (इंडिया अँड वॉर, १९४२ रीझन, रोमँटिसिझम अँड रेव्होल्यूशन, २ खंड, १९५२, १९५५), आर्. डी. रानडे (श्री भगवद्‌गीता ॲज अ फिलॉसॉफी ऑफ गॉड रिअलायझेशन, १९५८‌ कन्स्ट्रक्टिव्ह सर्व्हे ऑफ उपनिषदिक फिलॉसॉफी, १९२६), आर्. सी. मजुमदार (क्‍लासिकल अकाउंट्स ऑफ इंडिया, १९६० हिस्टरी अँड कल्चर ऑफ द इंडियन पीपल, ११ खंड, १९५१–१९६९) अशा अनेक नामवंत व्यक्तींची नावे या संदर्भात देता येतील.

इंडो-अँग्‍लिअन साहित्याचा प्रवाह अद्याप अकुंठितपणे चालू आहे. विविध इंग्रजी वृत्तपत्रांच्या रविवार-आवृत्त्या आणि इलस्ट्रेटेड वीक्‌लीसारखी साप्ताहिके इंडो-अँग्‍लिअन साहित्यास उपकारक ठरली आहेत. इंडो-अँग्‍लिअन साहित्यिकांच्या इंग्रजी लेखनातून आढळणाऱ्या शैलीवर एक प्रकारचा भारतीय ठसा जाणवतो. ललित साहित्यकृतींच्या बाबतीत हे विशेषत्वाने जाणवते कारण वाङ्‌मयीन अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून इंग्रजीचा स्वीकार केल्यानंतर ती भाषा भारतीय अनुभवांशी जुळवून घेण्याचा प्रश्न निर्माण होतो. मुल्क राज आनंद, आर्. के. नारायण, राजा राव यांसारख्या काही लेखकांनी या बाबतीत लक्षणीय यश संपादन केले आहे. अशा प्रकारच्या इंडो-अँग्‍लिअन साहित्यातूनच हळूहळू ‘भारतीय इंग्रजी’ उत्क्रांत होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अशी भाषा व्याकरणाच्या दृष्टीने मूळ इंग्रजीशी अतूटपणे निगडित राहिली, तरी तिचा गाभा भारतीयच असेल. तसेच भारतीय मन आणि वातावरण यांची सहजाभिव्यक्ती करण्याचे सामर्थ्य तिच्या असेल. तथापि इंग्रजीलाच भविष्यकालीन भारतात काय स्थान राहील, यावरही या साहित्याचे भवितव्य अवलंबून आहे.

संदर्भ : 1. Basu, Lotika, Indian Writers of English Verse, Calcutta, 1933.

2. Iyengar, K. R. Srinivas, Indo-Anglian Literature, Bombay, 1943.

3. Iyengar, K. R. Srinivas, The Indian Contribution to English Literature, Bombay, 1945.

4. Iyengar, K. R. Srinivas, Indian Writing in English,Bombay, 1962.

5. McCutchion, David, Indian Writing in English, Calcutta, 1968.

6. Naik, M. K.; Desai, S. K.; Amur, G. S. Ed. Critical Essays on Indian Writing in English, Dharwar, 1968.

7. Nandakumar, Prema, A Study of Savitri, Pondicherry, 1962.

8. Spencer, M. D. Indian Fiction in English, Philadelphia, 1960.

9. Verghese, C. Paul, Problems of the Indian Creative Writer in English, Bombay, 1971.

वर्गीज, सी. पॉल (इं.); कुलकर्णी, अ. र. (म.)