इंचॉन: दक्षिण कोरियाचे प्रसिद्ध बंदर व औद्योगिक केंद्र. दुसरे नाव चेमुल्पो व पूर्वीचे जीनसेन. लोकसंख्या ५,२८,५७९ (१९६९). हे सेऊलच्या पश्चिमेस ४० किमी., हान नदीच्या मुखाशी, पीत समुद्रावर वसले आहे. बर्फमुक्त बंदर असल्यामुळे याची वाढ झपाट्याने झाली. १८८३ मध्ये हे खुले बंदर म्हणून जाहीर झाले. येथे पोलाद, काच, रसायने यांचे कारखाने तसेच लाकूड, कापड यांच्या व तांदूळ सडण्याच्या गिरण्या आहेत. येथून तांदूळ, सोयाबीन इत्यादींची निर्यात होते. १९५० साली कोरियन युद्धात संयुक्त राष्ट्रांची सेना प्रथम येथेच उतरली होती.
ओक, द. ह.